पावसाळ्यातील दुर्घटनांचे सभागृहात पडसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |

नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर 

 

 
 
मुंबई : पावसाच्या सुरुवातीलाच मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरु झाली असून आतापर्यंत विविध घटनांमध्ये १२ जणांचा बळी गेला आहे. याचे पडसाद शुक्रवारी पालिका सभागृहात उमटले. प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले.
 
मुंबईत पहिल्याच पावसामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे प्रशासनाचे पाणी साचणार नाही, हे दावे फोल ठरल्याने पालिका प्रशासन टीकेचे लक्ष्य बनले आहे. विरोधीपक्ष नेते रवी रा़जा यांनी यावर निवेदन करून प्रशासन, सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडसावले. आतापर्यंत झालेल्या पावसांमध्ये झाडे पडणे, घरांच्या भिंती कोसळणे, इमारत खचणे, साथीचे आजार अशा दुर्घटनांत आतापर्यंत १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. अशा दुर्घटनांच्या मालिका सुरु असल्याने मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे राजा यांनी सांगितले. झाड अंगावर पडण्याच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे. गेल्यावर्षी मॅनहोलमध्ये पडून एका एका डॉक्टराचा मृत्यू झाल्यानंतर यंदाच्या पावसांत मॅनहोल सुरक्षित असतील अशी अपेक्षा मुंबईकरांना होती, मात्र यंदाच्या पावसांत ही अपेक्षाही फोल ठरली आहे, नाल्यात व मॅनहोलने यंदाही बळी घेतला. थोड्या पावसांमध्येही तुंबणाऱ्या पाण्यामुळे घाण व दुर्गंधी पसरून साथीचे आजारांनी डोके वर काढले आहे. लेप्टोने आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे जमिनी खचण्याचे प्रकार घडत आहेत. वडाळा येथे जमीन खचल्यामुळे दोस्ती एकर्स व लॉईड् इस्टेट संकुलामधील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते आहे. इमारतींना मोठे तडे गेल्याने कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रस्त्यात खड्डे पडून अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पहिल्या पावसांतच मुंबईकरांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असल्याचे सांगत नगरसेवकांनी लक्ष वेधले.
 
दोस्ती एकर्स व लॉईड् इस्टेट संकुलाबाबत पदनिर्देशित अधिकाऱ्यानेही दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली त्यामुळे त्याच्यावर कारवाई करा. तसेच काही अधिकारी ५ ते ६ वर्ष एकाच विभागात काम करत आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी भाजप गटनेते मनोज कोटक यांनी केली.
 
आयुक्तांच्या खुलाशानंतर सभागृहात गदारोळ
  
मुंबईत गुंतागुंतीच्या समस्या आहेत. प्रशासन त्या समक्षपणे सोडवते. त्यामुळे पालिका काम करत नाही, असा आरोप करणे चूकीचे आहे. मुंबईत यंदा पाणी साचले, मात्र तुंबले नाही, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी विरोधपक्ष नेत्यांच्या निवदेनावर केला. गेल्या काही दिवसांत ७५० मिमी पाऊस पडला. वर्षभराच्या सरासरीत तो ३९ टक्के आहे. लोकांना या कालावधीत त्रास होऊ नये, यासाठी सुमारे ६५० अधिकारी उतरले होते, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. तसेच वडाळ्यातील दोस्ती एकर इमारत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत बोलणे टाळले.
 
@@AUTHORINFO_V1@@