प्लास्टिकचा ‘स्मार्ट’ वापर हवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




‘Say No to Plastic, Ban Plastic’ असे नारे दिले जातात. आता तर राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदीही लादली आहे. पण, प्लास्टिकचा योग्य प्रकारे विनियोग करुन घेतला, तर ‘Plastic can be a good friend of Mankind and even helps to conserve plants, nature,’ हे आपल्याला साध्य करता येईल. तेव्हा, प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या ‘स्मार्ट’ वापराविषयी...

 

आपल्याकडे फार पूर्वीपासून दिवेलागणीला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुद्धि विनाशाय दीपः ज्योति नमोस्तुते।’ अशी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. दिवसभराच्या दगदगी-धावपळीनंतर दिव्याच्या शांत ज्योतीकडे पाहून डोळ्यांना व मनालाही शांत वाटते. उत्तम आरोग्यरुपी धन, समाधान लाभावे व शत्रुत्वाची भावना लोप पावावी ही इच्छा या प्रार्थनेतून व्यक्त केली जाते. सर्वांशी मैत्र प्रस्थापित करावे, पण कसे? समोरच्याचे गुण, जमेच्या बाजू ध्यानात घेतल्या की, हे सहज जमू शकते. जी गोष्ट व्यक्तीबाबत तीच अन्य प्राणिमात्र, वनस्पती इतकेच काय वस्तूंबद्दलही बाळगली तर हे सहज जमण्यासारखे आहे. सध्या प्लास्टिकच्या वापराबाबत एकदम नकारात्मक विचार फार प्रसारित होत आहेत. कारण, २६ जुलै वा तत्सम घटना घडल्या. विघटन होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागत असल्याने कचऱ्याचे ढीग फक्त मोठेच व त्रासदायक होतात. जाळून नष्ट करावे तर विषारी, घातक वायू याच्या ज्वलनातून तयार होतात आणि दमा, मज्जेचे रोग वगैरे उद्भवतात. साहजिकच, ‘Say No to Plastic, Ban Plastic’असे नारे दिले जातात. पण, वर सांगितल्याप्रमाणे प्लास्टिककडे पाहिले व तसा त्याचा विनियोग करुन घेतला तर ‘Plastic Can be a good friend of Mankind and even helps to conserve plants, nature’हे आपल्याला साध्य करता येईल.

 

प्लास्टिक हा पदार्थ निसर्गात आढळत नाही. हा बुद्धिमान माणसानेच बनविला आहे. याच्या उपयुक्ततेची यादी खूपच मोठी होईल. प्लास्टिक, पॉलीमर, नायलॉन, बेकेलाईट असे अक्षरशः हजारो प्रकार प्लास्टिकचे आहेत. पारदर्शी, अपारदर्शी, रंगीबेरंगी, नरम, कडक, ठिसूळ, लवचिक असे अनेक प्लास्टिकच्या त्या त्या प्रकारानुसार आढळतात व तसा त्यांचा वापर केला जातो. प्लास्टिक वा तत्सम प्रकार कुठे कुठे वापरले जातात? स्टेशनरी, जेवणाची भांडी, फर्निचर, पाणबुडी ते अवकाशयान, खेळणी, इलेक्ट्रॉनिक उपरणे, रेडिओ, दूरदर्शन, ध्वनिमुद्रिका, मोबाईल इत्यादी. यादी तर लांबत जाणारी आहे. अगदी वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रियेची साधने, दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेत लागणाऱ्या नळ्या, इतकेच काय हृदयाच्या झडपा, सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनच्या नळ्या, जयपूर फूट व अवयव रोपण अशी माणसाला जीवदान देणारी संजीवनी ठरावीत अशी अगणित साधने प्लास्टिकच्या रुपाने आपल्या उपयोगी पडतात. असे असूनही या प्लास्टिकमुळे एवढा हाहाकार का माजला? कारण पुन्हा बुद्धिमान पण बेफिकीर, अविवेकी, बेशिस्त माणूसच! आपण बाजारातून डाळ, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ आणत असतो. एकाच पिशवीत डाळ, तांदूळ इतर भरतो का? नाही, कारण ते निवडून वेगळे करणे कठीण, गैरसोयीचे अकारण वेळखाऊ ठरते ना! पिशवीतून दूध, तेल, सरबत आणणे मूर्खपणाचे अव्यवहार्य आहे, म्हणून आपण कॅन, बाटल्या असे वापरतो. जर आपण या गोष्टी करतो, तर कचरा, टाकाऊ म्हणून फेकतानाही काच, प्लास्टिक, भाज्या-फळांच्या साली काड्या, कागद इ. जर वेगळे करुन टाकले तर निसर्गाला, काच-प्लास्टिक रिसायकल करणाऱ्यांना किती सोपे होईल ना!

 
 

 

 

आजकाल खाद्यवस्तू विकत आणण्याचे प्रमाण शहरीकरणामुळे, महिलाही अर्थार्जन करत असल्याने व विभक्त कुटुंब वाढत असल्यामुळे वाढत आहे. अशावेळी पदार्थ स्वतःच्या डब्यातून आणणे चांगले, त्यामुळे साहजिक कचऱ्याचे प्रमाण घटेल. आरोग्यपूर्ण, स्वच्छ वातावरण तयार होईल. पिकनीकला जाताना disposable थर्मोकोल, कागदी प्लेट्स न वापरता प्लास्टिक हलक्या Food Grade व फेकून न देता पुन्हा साफ करुन वापरता येतील अशा ताट-वाट्या वापराव्यात. मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये पाण्याचे ग्लास न देता सरळ बाटली द्यावी, प्रसादासाठी कागदी द्रोण वापरावे. अशा चांगल्या सवयी लावून घेतल्यास ‘आस्ते-आस्ते आसमंत।’ प्रसन्न होईल. अगदी टाकाऊ प्लास्टिक असेल तर एखाद्या मोठ्या पिशवीत रिफिलपासून डब्यापर्यंत जमा करुन प्लास्टिक गोळा करणाऱ्यांना द्यावे.
 

प्लास्टिक उत्तम जलरोधक आहे. घरांच्या, इमारतींच्या छपरावर उत्तम आच्छादन करुन पावसापासून वास्तूचे रक्षण होते. प्लास्टिकच्या थैलीत, पेटीत ठेवलेल्या वस्तूंचे धुळीपासूनही चांगले रक्षण होते. आघात सहन करण्याची क्षमता असल्याने धक्का लागून लगेच तडकणे, फुटणे टाळता येते. गंज, कीड, वाळवी लागत नाही. कुजणे नाही. बऱ्याचशा रासायनिक पदार्थाचा यावर परिणाम होत नाही. प्लास्टिक फर्निचरमुळे लाकूड बचत व लाकूडतोडही कमी होते. प्लास्टिकच्या कुंड्या, बादल्या, डबे, पाईपलाईन अधिक टिकाऊ असतात. थोडक्यात विचारपूर्वक, नेमकेपणाने वापरल्यास प्लास्टिक शत्रू (घातक) न ठरता उपयुत्त मित्र बनू शकते.

- निशा बर्वे

9987256704

@@AUTHORINFO_V1@@