मुळात दुखणे निराळेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |



 

 
सुपरकॉप म्हणून ओळखले जाणारे जुलियो रिबेरो आता यात उतरले आहेत. आपल्या लांबलचक लेखात त्यांनी जे लिहिले आहे. ते वाचले की धक्काच बसतो आणि मार्क्सचा धर्माविषयीचा युरोपीय दृष्टिकोन आठवायला लागतो. धर्म ही अफूची गोळी आहे असे मार्क्स म्हणत असे आणि ती कशी काम करते हे पाहायचे असेल, तर रिबेरोंचा लेख वाचला पाहीजे.
 

वस्तुत: काही ठराविक लोकांच्या मतांवरून एखाद्या समाजाविषयी किंवा त्यांच्या उपासनापद्धतीवर मत निश्चित करणे अयोग्यच. कारण धर्म ही मानवी संस्कृतीबरोबरच विकसित होत गेलेली बाब. मानवी प्रजातीची जैविक उत्क्रांती एका निश्चित टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर सामाजिक उत्क्रांतीला सुरुवात झाली. धर्माने सर्वसामान्य मानवाला त्याच्या त्याच्या उपासनापद्धतीनुसार एक निश्चित आकृतिबंध दिला. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक रचना निर्माण झाल्या. या सगळ्या प्रकारच्या विकास प्रक्रियांनी मानवी जीवनावर कमालीचा प्रभाव टाकला. ज्या उपासनापद्धती प्रवाही नव्हत्या, त्या रुढीबद्ध होऊन, नकोशा झाल्या. ज्या प्रवाही होत्या, मानवी उत्क्रांतीसोबत बदलत गेल्या लोकप्रिय व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणार्‍या झाल्या. विधी, सांस्कृतिक मूल्ये, उपचार या सगळ्यातून धर्म पाझरत, मानवी मनाच्या अगदी तळाच्या कोपर्‍यातसुद्धा जाऊन पोहोचला. धर्माचे महत्त्व व इतके गाढे व सखोल आहे. कुठलाही धर्म हा खरे तर मूल्यांचीच शिकवण देणारा मात्र त्यात मानवनिर्मित दोषांची भर पडली की, त्याचे परिणाम सर्वात आधी तो अनुसरण करणार्‍यांना आणि नंतर इतर समाजाला भोगावे लागतात.

चातुर्वर्ण्यात आलेली विषमता आणि उच्च नीचतेचा अभिभाव हा हिंदू धर्मातील दोन गटांत विषमता व द्वेष निर्माण करणारा ठरला. इस्लाम व ख्रिस्ती धर्मांमधला अंतस्संघर्ष मात्र निराळाच ठरला. एकाने मोहम्मदालाच अंतिम प्रेषित मानले आणि दुसर्‍यामध्ये पोप ही संकल्पना रूढ झाल्याने धर्माचे स्थित्यंतर धर्मसत्तेत झाले. पोप हा धर्मप्रमुख न राहता, तो धर्मसत्तेचा प्रमुख बनला. सत्ता, मग ती कुठल्याही स्वरूपातली असो, ती तिचे गुणदोष घेऊनच येते. कारस्थाने करणे, सर्व प्रकारची संसाधने स्वत:कडे एकवटून ठेवणे, इतरांचा दुस्वास करणे, सतत असुरक्षिततेच्या भयगंडाने पछाडलेले राहणे ही सत्तेचीच काही रूपे आहेत. चर्च आणि राजसत्ता, चर्चा आणि विचारवंत, चर्च आणि सर्वसामान्य लोक हा संघर्ष अखिल युरोपात इतका गाजलेला आहे. या संघर्षातूनच पर्याय म्हणून लोकशाहीचा जन्म झाला असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये. भारतात अशी स्थिती कधीच आली नाही, याचे कारण हिंदू धर्मात अशी सत्तालालसा धर्माचे अनुसरण करणार्‍यांमध्ये निर्माण झाली नाही. ती निर्माण न होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यामध्ये हिंदू धर्माचा बहुआयामी स्वभाव हासुद्धा मानावा लागेल. त्यामुळे अन्य धर्माबाबतची सहिष्णुता हादेखील त्याचाच एक भाग मानावा लागेल.

किती तरी धर्म या देशात आले रुजले, राहिले, निघून गेले, ते याच मुळे. अन्य कुठल्याही देशात अशा प्रकारे अन्य धर्मांना रुजण्याची मुभा दिली गेली नाही. हा सगळा मामला आता पुन्हा मांडण्याचे कारण म्हणजे सध्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी घेतलेल्या उघड उघड सरकारविरोधी भूमिका. अनेकांना यात नवल वाटत असले, तरीही राजकारण करणे हा सेमेटिक धर्मांचा मूळ स्वभावच असल्याचे हे धर्म ज्या भूमीत जन्मले तिथला इतिहासच सांगतो. आज आपल्याकडे अशा मंडळींकडे दुर्लक्ष्य न करता यांना उत्तर देणारे लोक उभे राहिले आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या सर्वसमावेशकतेच्या व सहिष्णूतेच्या मूल्यांचाच अंत पाहण्याचे काम आता सुरू झाले आहे. २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षपणे मोदींना मतदान करू नका’ असे सांगितले. त्यानंतर गोव्याच्या धर्मगुरूंनी त्यांच्या मनोहर पर्रीकरांना निवडून येऊ देऊ नका असे सांगितले. गुजरात आणि नंतर दिल्लीच्या आर्चबिशपांनीसुद्धा नंतर त्याच सुरात सूर मिसळला. ही सगळी मंडळी आता उघडपणे या सरकारच्या विरोधात बोलू लागली आहेत. त्याचे मुख्य कारण वेगळेच आहे. यांच्या संस्कारात सहिष्णूता नाहीच, पण त्याचबरोबर सर्वसमावेशकतासुद्धा नाही. परदेशातून निधी स्वीकारणार्‍या संस्थांचे तपशील व परदेशातून त्यांनी स्वीकारलेल्या निधीचे तपशील इथे त्यात दिलेले आहेत. परदेशातून निधी स्वीकारणे गैर नाही. यात कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेण्याचेही कारण नाही. केंद्र सरकारने केवळ घेतलेल्या निधीचा विनियोग कसा केला याची विचारणा केली आणि कायदा दाखविला. यानंतर सगळ्या संस्था एकाएकी सरकारविरोधी झाल्या आहेत. मुद्दा हाच की, ज्यांनी आपले हिशोब नीट दिले, पण त्यांना आजही निधी गोळा करण्याची मुभा आहे. मात्र एकदा का आपण इतरांच्या विरोधात उभे राहायला लागलो, की मग काय घडू शकते त्याचा परिचय सध्या इथे मिळत आहे.

गोव्यासारख्या लहान राज्यात चालणारे राजकारण लक्षात घेतले, की जे काही पर्याय समोर येतात आणि त्यात स्वत:चे राजकारण पाहिले की चर्चच्या पाठिंब्यावर निवडून येणारे उमेदवार समोर यायला लागतात. त्यांचे व्यवसाय, राजकारण करण्याची पद्धत, गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चला जगजाहीर असते. आकाशातल्या बाप्पाच्या नावावर मूल्यांचा उद्घोष करणारे किती दांभिक वागू शकतात, हे गोव्यात पाहायला मिळते. मनोहर पर्रीकरांसारखा माणूस, ज्याच्या प्रामाणिकपणाविषयी त्याचे विरोधकही साधी शंका घेऊ शकत नाहीत, अशा माणसाला चर्च विरोध करते आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी निवडून येण्यासाठी प्रयत्न करते. आता हाच डाव संपूर्ण देशाच्या स्तरावर सुरू आहे. शुक्रवारी प्रार्थना केल्याने हे सरकार पराभूत होईल असे जर का चर्चमधील सत्ताकेंद्रांना वाटत असेल, तर युरोपात जे झाले तेच इथेही होईल मग इथल्या मंडळींच्या सहिष्णूतेवर प्रश्नचिन्हे कशी निर्माण करता येतील? सुपरकॉप म्हणून ओळखले जाणारे जुलियो रिबेरो आता यात उतरले आहेत. आपल्या लांबलचक लेखात त्यांनी जे लिहिले आहे. ते वाचले की धक्काच बसतो आणि मार्क्सचा धर्माविषयीचा युरोपीय दृष्टिकोन आठवायला लागतो. धर्म ही अफूची गोळी आहे असे मार्क्स म्हणत असे आणि ती कशी काम करते हे पाहायचे असेल, तर रिबेरोंचा लेख वाचला पाहीजे. रिबेरोंना या देशात मानसन्मान आणि आदराचे स्थान मिळाले ते ख्रिश्चन म्हणून की त्यानी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी? अर्थात त्यांच्या पराक्रम आणि निष्ठेसाठी. मात्र आता हेच रिबेरो ख्रिस्ती असल्याने आपण दुय्यम दर्जाचे नागरिक कसे होणार आहोत याच्या शोकांतिका आळवत आहेत. या मंडळींचे खरे दुखणे काय हे जाहीर आहे. मात्र सेक्युलॅरिझमचे सगळे बुरखे पूर्णपणे फाटत नाहीत, तोपर्यंत हे चालतच राहणार.

@@AUTHORINFO_V1@@