सुखोई विमान अपघाताच्या चौकशीस सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |





नाशिक : निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात बुधवारी सकाळी सुखोई ३० हे लढाऊ विमान कोसळले होते. त्यानंतर एचएएलच्या विशेष पथकाकडून सुखोई ३० च्या झालेल्या अपघाताची विभागीय चौकशीस सुरुवात झाली आहे. अपघातानंतर प्राप्त झालेल्या ब्लॅक बॉक्समधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले जात असून त्यातून अपघाताची कारणे स्पष्ट होण्यासाठी मदत होणार असल्याचे एचएएलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दिवसभर एचएएलचे अधिकारी व कर्मचार्‍यांकडून घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त विमानाचे विखुरलेले अवषेश गोळा करण्याचे कार्य सुरू होते. सर्व अवशेषांची नोंद अधिकारीवर्ग घेत असून त्या प्रत्येक भागाला लेबल लावले जात होते. अपघाताची कोणतीही माहिती इतरत्र जाऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी सर्व गुप्त राखण्याच्या सूचना दिलेल्या असल्याचे समजते. बुधवारी सकाळी तालुक्यातील गोरठाण व वावी परिसरात ओझर येथून उड्डाण घेतलेले लढाऊ विमान कोसळले होते.

 

त्यातील दोन वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुरक्षित उतरले. ही घटना घडताच तातडीने अधिकार्‍यांची पथके तेथे दाखल झाली. बुधवारी दिवसभर वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळ सील केले होते. तेथे सर्वसाधारण नागरिकांना प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. तरीही अनेक बघ्यांनी अपघात स्थळीे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी रोखल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. बुधवारी रात्रभर सुमारे १०० कर्मचारी व अधिकारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या अवशेषांचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी १५ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सापडलेल्या भागांना लेबल लावण्याचे काम येथे सुरू असल्याची माहिती स्थानिक शेतकर्‍यांकडून मिळाली आहे. विमान अपघाताच्या गोपनीयतेसाठी गोरठाण, वावीमधील शेतीपरिसर एचएएलकडून सील करण्यात येऊन बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@