परिपत्रक, की पत्र? शिवसेना पडली तोंडघशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |





मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. असे असताना प्रशासनाला पाठीशी घालणार्‍या शिवसेनेचाच परिपत्रकाच्या दाखल्यावरून चांगलाच पचका झाला. हे परिपत्रक नसून एका विशिष्ट प्रकरणातील पत्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेवर सारवासारव करण्याची वेळ आली. त्यामुळे मनपाच्या सभागृहात आज शिवसेना तोंडघशी पडल्यानंतर अशी चर्चा सुरू होती.

 

पावसाळ्यात झालेल्या विविध घटनांमध्ये पालिका प्रशासन कसे अपयशी ठरले, हे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी आपल्या निवेदनातून मांडले. त्यानंतर भाजपचे गटनेते मनोज कोटक, सपाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पावसाळ्यात घडलेल्या दुर्घटनांवर प्रकाश टाकत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच प्रशासनाने केलेला दावा किती फोल होता, हे दाखवून दिले. सत्ताधारी शिवसेनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. राऊत यांनी सत्ताधार्‍यांची बाजू मांडताना आपल्याकडे मुख्य अभियंत्याचे एक परिपत्रक आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींसोबत अधिकार्‍यांनी जाऊ नये,असे सांगितले. तसेच नगरसेवक सचिन पडवळ यांना हे पत्र दाखवून अधिकार्‍यांनी पाहणी करण्यास नकार दिला होता, असे सांगत आयुक्तांनी हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी केली.

 
त्यावर खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त ए. आय. कुंदन यांनी हे परिपत्रक पालिका कायद्यानुसार योग्यच असून पालिका नियमांतर्गत ते मागे घेता येणार नाही. असे सांगितले. त्यावरून शिवसेनेने तसेच विरोधी पक्षांनीही गोंधळ घातला. उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी तुम्ही आयुक्तांचे प्रतिनिधित्व करत असून यावर निर्णय घ्यायलाच हवा, असे कुंदन यांना सांगितले. त्यावर आपण आयुक्तांना याबाबत माहिती देऊ असे सांगितले.परंतु सभागृहात गोंधळच सुरू होता. हा गोंधळ सुरू असतानाच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे परिपत्रक नसून एका प्रकरणात दिलेले पत्र आहे, असा खुलासा करत ते पत्र इतर ठिकाणी लागू पडणार नाही, असे स्पष्ट करावे, अशी कुंदन यांच्याकडे मागणी केली. त्यावर हे पत्र सर्व ठिकाणी लागू होणार नाही, असे कुंदन यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@