बालेकिल्ला पुन्हा जिंकला, कार्यकर्त्यांचा जल्लोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |



 

कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे विजयी

 

मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला भाजपने पुन्हा एकदा हस्तगत केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी २ हजार ९८८ मतांच्या मताधिक्क्याने विजय मिळवत कोकणात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलवले आहे.

 

डॉ. अशोकराव मोडक, संजय केळकर आदी अनेकांनी प्रतिनिधित्व केलेला कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक गड. मात्र, यापूर्वी झालेल्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनीच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत भाजपच्या तत्कालीन आमदार संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत हा बालेकिल्ला पुन्हा हस्तगत करायचाच, असा विडाच भाजपने उचलला होता. यावेळी भाजपने थेट निरंजन डावखरे यांनाच भाजपमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली. तर डावखरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे लढत होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेचीही मानली गेली. मात्र, निरंजन डावखरे यांचे गेल्या सहा वर्षातील काम, त्यांची शांत व स्वच्छ प्रतिमा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर आदींसह अनेकांनी या निवडणुकीसाठी पक्षसंघटनेद्वारे केलेली अविश्रांत मेहनत आणि या सर्वांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व या सर्वांच्या बळावर भाजपने विजयश्री खेचून आणली. तसेच, कोकणासारख्या शिवसेनेसाठी व अलीकडे काही प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीही महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रदेशातदेखील भाजप जोरदार मुसंडी मारू शकतो, असा आत्मविश्वासदेखील निरंजन डावखरेंच्या या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे दिसत आहे.

 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तीनही जिल्ह्यांमधील मतदारसंघांमध्ये भाजपचे केवळ प्रशांत ठाकूर हेच पनवेलमधून विजयी होऊ शकले. बाकी कोकणात भाजपची पाटी कोरीच राहिली. आता गेली चार वर्षे सातत्याने परिश्रम केल्यानंतर, पक्षसंघटनेला नवी दिशा दिल्यानंतर आणि संपूर्ण ताकदीने रणांगणात उतरल्यानंतर शिवसेनेसोबतच्या युतीशिवायदेखील भारतीय जनता पक्ष कोकणात जिंकू शकतो, हेच या निवडणुकीतून भाजपने दाखवून दिले असून यामुळे तमाम कोकण भाजप सध्या ‘सेलिब्रेशन’च्या मूडमध्ये दिसत आहे.

@@AUTHORINFO_V1@@