प्लास्टिक पासून इंधन बनविण्याचा प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |




नाशिक: हल्ली प्लास्टिक बंदीमुळे सगळीकडे रणकंदन माजलेले आहे. प्लास्टिक उद्योजक तसेच ज्यांना त्याचा वापर करावा लागतो ते व्यापारी याबाबत पर्याय मागत आहेत. तर सर्वसामान्यांना देखील प्लास्टिकची झालेली सवय मोडून आता पुन्हा एकदा कापडी पिशव्या आणि अन्य पर्यायांकडे वळावे लागणार असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत निकामी प्लास्टिकचा वापर करून इंधन बनविता येत असेल तर ही योजना मनपा,उद्योग संस्था आणि सर्वसामान्यांना अमलात आणण्यास योग्य ठरणार आहे यात शंकाच नाही. विशेष बाब म्हणजे नाशिकमध्ये असा प्रकल्प कार्यान्वित आहे आणि त्याचा आदर्श घेवून अन्य ठिकाणी असा प्रकल्प उभारणे श्रेयस्कर ठरू शकणार आहे. पुण्याचे केमिकल इंजिनियर श्रीरंग भातखंडे आणि मुळचे नगर जिल्ह्यातील पारनेर येथील असलेले आणि सध्या नाशिकमध्ये कार्यरत असलेले क्षितीज झावरे हे या प्रकल्पाचे संचालक आहेत. एकीकडे पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या प्लॅस्टिकवर शासनाकडून बंदी घातली गेली असतांनाच कचर्यातील प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करण्याचा अभिनव प्रकल्प नाशिकच्या खत प्रकल्पात कार्यान्वित असून या प्रकल्पात दररोज २७०० ते ३००० लिटर फरनेस ऑईलची निर्मिती केली जात आहे.

 
अशी माहिती या प्रकल्पाचे संचालक क्षितीज झावरे यांनी मुंबई तरुण भारतला दिली. प्लास्टिक ही आज मोठी समस्या झाली असली तरी प्लास्टिक बंदी हा त्यावर उपाय नाही. पूर्णपणे प्लास्टिक बंदी होणे अवघड आहे. त्यासाठी अमेरिका,ऑस्ट्रेलिया या सारख्या देशात विविध मार्ग शोधले जातात तसे आपण देखील शोधले पाहिजेत असे झावरे म्हणाले. प्लास्टिक पासून इंधन बनविताना ते खूप मोठ्या प्रमाणावर बनविले जावू शकत नाही, ते टाकाउ पदार्थांपासुन बनविले जात असल्याने त्याची किमत परवडणारी आणि अन्य इंधनाच्या किमतीच्या तुलनेत कमी ठेवणे शक्य आहे. तसेच वाहनांसाठी इंधन लागते त्यापेक्षा जास्त इंधन औद्योगिक वापरासाठी लागते हे लक्षात घेतले तर प्लास्टिक पासून बनविलेल्या इंधनाला चांगले भवितव्य आहे. हे सहज समजेल असे झावरे व भातखंडे या द्वयींनी सांगितले.
 

प्लास्टिक पासून इंधन बनविले जावू शकते याबाबत हिटलरच्या काळात देखील संशोधन करण्यात आलेले होते. प्लास्टिक जाळले असता त्यातून विषारी वायू उत्सर्जित होतोे जो ओझोन वायुला मारक ठरतो. त्यामुळे प्लास्टिक जाळण्यास बंदी आहे. मात्र योग्यरितीने त्यावर प्रक्रिया केल्यास ज्या मूळ स्वरूपापासून प्लास्टिक बनते त्यात त्याचे रुपांतर करता येणे सहज शक्य होते. ते मूळ स्वरूप म्हणजे फरनेस ओईल होय अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या इंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनविताना वक्स जमा होत नाही. तसेच हे इंधन पूर्णपणे अन्य इंधनांसारखे असते. नाशिकमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे त्या धर्तीवर राज्यातील अन्य महापालिकांनी देखील राबविल्यास टाकावू प्लास्टिक ची मोठी समस्या दूर होण्यास मदत होईल असा आशवाद या युवा उद्योजकांना वाटतो.

 

नाशिक मधून दररोज २१२ घंटागाडीतून गोळा होणार्या शहरातील सर्व प्लॅस्टिक कचर्यासह नाशिक मधील अंबड,सातपूर,गोंदे, सिन्नर,मुसळगाव,दिंडोरी, येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधून निघणार्या निरुपयोगी प्लास्टिक पासून ऑइल निर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याने हा प्रकल्प नाशिकच्या प्लास्टिक संकटावर वरदान ठरणार आहे. प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची दाहकता प्रकर्षाने जाणवल्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी शासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्लॅस्टिकची काही उत्पादने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरात प्लॅस्टिक कचर्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न आ वासून उभा आहे. या प्रश्नाला ऑइल निर्मितीचा समर्थ पर्याय असल्याचे नाशिक प्रकल्पामूळे सिद्ध झाले आहे. शहर व कारखान्यांमधून गोळा होणार्या प्लॅस्टिक पासून निर्माण केलेल्या फरनेस ऑइल मध्ये डिझेलचे गुणधर्म असल्याने त्याचा वापर इंधन म्हणून केला जाऊ शकतो. या प्रकल्पामुळे हजारो टन प्लॅस्टिक कचर्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटला आहे.

@@AUTHORINFO_V1@@