महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवीरांनी घेतली पंतप्रधानांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील एव्हरेस्ट सर करणाऱ्या वीरांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मिशन शौर्य मध्ये भाग घेणाऱ्या चंद्रपूर येथील आश्रम शाळेतील या मुलांपैकी ५ मुला-मुलींनी मे मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यांच्या असीम शौर्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाप्रित्यर्थ्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील उपस्थित होते.
 
आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्षमतांची ओळख करून त्यांना मोठी स्वप्न पाहण्याचे, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला. शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ‘आंतरिक सामर्थ्याची सिध्दी, अर्थात मिशन शौर्य’ या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व चंद्रपूर प्रशासनाच्या मदतीने चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेच्या ५० विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड केली. पुढे वेगवेगळ्या चाचण्यांनंतर अंतिम फेरीत १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
 
 
 
 
 
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांमधील उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी देशातील प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित केले. या खडतर प्रवासात अंतिमत: मनीषा धुर्वे, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, आणि प्रमेश आडे या ५ विद्यार्थ्यांनी १६ मे २०१८ रोजी एव्हरेस्ट सर करीत महाराष्ट्रासह, भारत देशाचे नाव इतिहासात कोरले. त्यांच्या या धाडसाची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली.
 
गेल्या आठवड्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील या विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती, त्यावेळी "दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर जगातील सर्वात उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणारे चंद्रपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे." अशा भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या होत्या.
@@AUTHORINFO_V1@@