अमृततुल्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018   
Total Views |




चहावर आतापर्यंत सर्वात जास्त लिखाण चीनमध्ये झालं आहे आणि लु यू याने लिहिलेलं ‘क्लासिक ऑफ टी’ हे पुस्तक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता पावलं आहे. चहाची लागवड, तोडणी, प्रत अशा अनेक गोष्टींची यात नोंद घेतली गेली आहेच, पण चहा कसा बनवावा आणि कसा प्यावा, याचं अतिशय काव्यमय वर्णन लु यू याने लिहिलेल्या ‘क्लासिक ऑफ टी’ या पुस्तकात दिलं आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या चहाबद्दल आजचे उदरभरण...

गरात दडी मारून बसलेला पाऊस अखेर शहराकडे परतला आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना तृप्त करू लागला आहे. पाऊस पडू लागल्यावर हवेत एक वेगळाच गारवा पसरतो आणि मग आठवतो गरमागरम, वाफाळता चहा. धावत्या मुंबईला क्षणभर विश्रांती घ्यायला लावणारा हाच कटिंग चहा. एक कटिंग चाय...म्हणतच मुंबईचा दिवस सुरू होतो. चहाचे वेड आपल्याकडे अगदी इ.स. ७५० पूर्वपासून आहे. ईशान्य भारतात निलगिरी पर्वतरांगांत बौद्ध भिक्खू सुमारे २००० वर्षांपूर्वीपासून चहाची शेती करतात, असे दस्तावेज आपल्याकडे आहेत.हे चहाप्रेम तेव्हा लागले आणि ते अगदी आपण अंगी भिनवले. लहानांपासून म्हातार्‍यांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा हा चहा. ज्याचे आज विविध प्रकार अस्तित्वात आहेत. ग्रीन टी सारखा आरोग्यास हितकारक चहादेखील आहेच. एकेकाळी चहावर ‘श्रीमंती पेय’ असा शिक्का बसला होता. अशा या श्रीमंती पेयाचा शोधही एका सम्राटाने लावला होता. सम्राट शेन नुंग असं त्याचं नाव होतं. एकंदरीतच इतिहासाची पानं उलटली तर चहाला सम्राटांचा चांगलाच वरदहस्त लाभला होता, हे लक्षात येतं.

 

सकाळच्या वाफाळत्या चहाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि दिवसभरही आपली गाडी चालू राहण्यासाठी चहाचं इंधन टाकतच राहावं लागतं. मरगळलेल्या मनाला तरतरी येण्यासाठी या अगदी प्राथमिक गुणापासून ते चहाचे अनेक औषधी गुण, अशा चहाच्या उपयोगांच्या निमित्ताने चहा कायम चर्चेत असतो. त्याचबरोबर चहातील अपायकारक घटकांबद्दलची चर्चाही सातत्याने डोकं वर काढत असते. अर्थात याचा अट्टल चहाबाजांवर ढिम्म परिणाम होतो, ही गोष्ट अलहिदा. त्यामुळे चर्चा करणारे आणि न करणारे आकंठ चहात बुडालेले असतात. चहा हा असा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. कुठेही, कधीही चहा आपल्यासमोर हजर होत असल्यामुळे चहाचं तसं अप्रूप मनात नसतं. तर मग चहाविषयी विशेष काय, अशी उत्सुकता तुम्हाला लागली असेलच, ती म्हणजे मलई चहा. हो, चहाच पण मलई असलेला.

 

उल्हासनगर शहर व्यापारासाठी प्रसिद्ध आहेच तसं ते विनोदाचाही भाग बनत असते, हे खरे असले तरी याच शहरात मिळतो मलई चहा. येथे मलई चहा मिळणारी बरीच ठिकाणे आहेत पण त्यात विशेष असे ’सनम टी हाऊस’ हे आहे. गजानन मार्केट हे सर्वत्र परिचयाचे आहे. याच चौकात आहे ’सनम टी हाऊस.’ १९७२ साली सुरू करण्यात आलेले हे दुकान. आता रोतानी हा व्यवसाय सांभाळतात. पितळेच्या मोठ्या किटलीत चहा उकळत असतो आणि बाजूला असते मलईदार दूध. १० वर्षांपूर्वी येथे मलई चहाची सुरुवात झाली.

 

आधी कपात जाड मलई घातली जाते आणि त्यात कोरा चहा ओतण्यात येतो. हा चहा आपल्या इतर चहापेक्षा जरा घट्ट असतो. वर घट्ट मलई आणि कडक चहाची एक सीप, बाहेर बरसणारा पाऊस यापेक्षा अजून वेगळं काय हवं? याचसोबत इथे उकाळा, साधा चहा ही पेयदेखील अप्रतिम मिळतात. मलई चहाचं खरं रहस्य म्हणजे भेसळ न करता वापरण्यात येणारं दूध. तसेच अगदी पूर्वीपासून येणारे काही ग्राहक आजही न चुकता येथे येतात. एका मलई चहाची किंमतही फार नाही. ग्राहकांच्या प्रेमामुळेच हे सुरू आहे. काही वर्षांपूर्वी इथे कचोरीदेखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कचोरी आणि चहा याचा आस्वाद, पावसात भिजल्यावर घ्यायला काहीच हरकत नाही.

 

चहावर आतापर्यंत सर्वात जास्त लिखाण चीनमध्ये झालं आहे आणि लु यू याने लिहिलेलं ‘क्लासिक ऑफ टी’ हे पुस्तक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून मान्यता पावलं आहे. चहाची लागवड, तोडणी, प्रत अशा अनेक गोष्टींची यात नोंद घेतली गेली आहेच, पण चहा कसा बनवावा आणि कसा प्यावा, याचं अतिशय काव्यमय वर्णन लु यू याने लिहिलेल्या ‘क्लासिक ऑफ टी’ या पुस्तकात दिलं आहे, ते असं, ‘चहाचे पाणी उकळत असते तेव्हा माशाच्या डोळ्यांसारखे दिसले पाहिजे. पाणी उकळत ठेवलेल्या भांड्याच्या कडेला एखादा झरा वाहताना जसा मंद खळखळतो, तसा मंद आवाज आला आणि उकळणार्‍या पाण्यात येणारे बुडबुडे एखाद्या मोत्याच्या मालेप्रमाणे दिसले म्हणजे ओळखावे की ते दुसर्‍या स्तरावर पोहोचले आहे. जेव्हा उकळणारे पाणी भारदस्त लाटेप्रमाणे उसळते आणि भरतीच्या फुगलेल्या लाटेप्रमाणे आवाज करते तेव्हा ओळखावे की पाणी त्याच्या परमोच्च स्थितीला पोहोचले आहे. यापेक्षा जास्त उकळले गेले तर ते वापरू नये. यातून चहा तयार करण्याची एक अत्यंत सुंदर आणि रमणीय अशी प्रतिमा निर्माण झाल्याखेरीज राहात नाही आणि चहातलं काव्य जाणवल्याखेरीज राहत नाही. या पार्श्‍वभूमीवर आताचा टपरीवर तयार होणारा चहा डोळ्यासमोर आला की ‘कोण होतास तूकाय झालास तू,’ असं खेदाने म्हणावंसं वाटतं.

@@AUTHORINFO_V1@@