नवी दृष्टी देणारी उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018   
Total Views |




आम्ही इतर कुठल्याही आयुर्वेदिक ब्रँडबरोबर स्पर्धा करत नाही. सर्व ब्रँड्सनी चांगल्यात चांगली उत्पादनं आणून आयुर्वेद पुढे न्यावा.”


संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणार्‍या ‘तन्वी हर्बल्स या आयुर्वेदिक औषध कंपनीच्या सर्वेसर्वा डॉ. मेधा मेहेंदळे या संस्कृत विद्यावाचस्पती प्रा. डॉ. सी. ग. देसाई यांच्या सुकन्या. प्रा. डॉ. सी. ग. देसाई हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या अणसुरे गावचे रहिवासी. शिक्षणानिमित्त मुंबईत येऊन नंतर इथेच स्थायिक झालेले. मुंबईत त्यांनी माधुकरी मागून शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला रुपारेल आणि नंतर मिठीबाई महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. संस्कृत भाषेचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचंड व्यासंग, ५० पेक्षा जास्त स्वतःची ग्रंथसंपदा, चरित्रलेखन, मुद्‍गलपुराणाचं मराठी भाषांतर, यामुळे ते संस्कृत पंडित म्हणून प्रसिद्ध होते. सुधीर फडकेंसारखी दिग्गज मंडळी त्यांच्याकडे संथा घ्यायला येत. अशा एका शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध घराण्यात मेधाताईंचा जन्म झाला.

 

वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या मेधाताईंनी आयुर्वेदाचार्य डॉ. सुधीर रानडे यांच्याकडे आयुर्वेदाचं मुळापासून शिक्षण घेतलं. त्याचबरोबर निसर्गोपचाराची पदवी घेतली. यामधून त्यांची आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचविण्याची कल्पना रूजत गेली. आज 'तन्वी हर्बल्स च्या रूपाने आपण त्या कल्पनेचा मोठा वृक्ष झालेला पाहतो. त्यांनी औषधं तयार करण्याची स्वतःची एक पद्धत विकसित केली, जी ’तन्वी पॅथी म्हणून ओळखली जाते. यामध्ये औषधी वनस्पतींचा एक दशांश अर्क काढला जातो, ज्यामुळे त्याचा परिणाम दहापट वाढतो. म्हणून ’तन्वीची औषधं चटकन रक्तात मिसळून त्वरित अपेक्षित परिणाम साधतात आणि संजीवनीसारखं काम करतात. १९९४ साली त्यांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला. आज ३२ निरनिराळी आयुर्वेदिक औषधं ’तन्वी हर्बल्स च्या कारखान्यात बनवली जातात.

 

रोगप्रतिकारशक्ती आणि ताकद वाढवणारं, माणसाला सतत उत्साही आणि ताजतवानं ठेवणारं 'तन्वीशता, अंगदुखी कमी करणारं 'वातशांती, शांत झोप देणारं आणि मनाची एकाग्रता वाढवणारं 'ओजस, उंची वाढवणारं 'अश्वयष्टी, रक्ताभिसरण चांगलं ठेवणारं 'शतजीवन्ति, दात स्वच्छ ठेवणारं 'धवलदंती मंजन, केसांचं आरोग्य चांगलं ठेवणारं ‘केशबाला तेल, वजन कमी करणारं 'स्वीट स्लीम, कफावर गुणकारी ‘तन्वीज्येष्ठा इत्यादी ’तन्वी हर्बल्स च्या औषधी उत्पादनांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. मेधाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ग्राहकांशी व्यक्तिशः संपर्क ठेवला आहे. ग्राहकांच्या सकारात्मक अभिप्रायावरच आज एवढी मोठी झेप घेतल्याचं मेधाताई सांगतात. दादर आणि ठाण्याला ’तन्वी हर्बल्स ची मुख्य क्लिनिक्स असून संपूर्ण महाराष्ट्रात १०० सेंटर्स आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये वैद्यांकडून मोफत तपासणीची सुविधा पुरवलेली आहे. मेधाताईंच्या मानसी आणि ऋचा या दोन्ही मुली आयुर्वेदिक डॉक्टर असून त्या ’तन्वी मध्येच काम करतात. मेधाताईंचं जवळजवळ सगळं कुटुंबच या व्यवसायात उतरलं आहे. सध्या त्या फक्त देखरेखीचं काम करतात. त्यांच्या दोन मुली आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांनी ही उद्योगगंगा पुढे नेली आहे. अनेक महिलांना यातून रोजगार मिळाला आहे. उद्योगक्षेत्रातल्या मेधाताईंच्या या यशाबद्दल त्यांना १९९८ सालचा ’आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार मिळाला. याशिवाय ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजक पुरस्कार आणि गंगाधर गाडगीळ यांच्या हस्ते ’उद्योगश्री हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

 

आश्चर्याची बाब म्हणजे मेधाताई या चित्रपट निर्मात्याही आहेत. 'गोजिरी, 'आयुष्यमान भव 'डॉटर या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. याशिवाय गेली दहा वर्षं त्या 'आनंद गुरुकुल नावाची शाळा चालवतात. या शाळेत आज दोन हजार विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतात. मुलांना सुट्या असतात, तेव्हा मेधाताई आपल्या घरी ’छंदवर्ग आयोजित करतात. यामध्ये मुलांना विविध कला, क्रीडा, बँकेचे व्यवहार असं दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं ज्ञान दिलं जातं. हीच मुलं जेव्हा मोठी होऊन समाजात मानाने वावरतात तेव्हा मेधाताईंची जरूर आठवण काढतात.

 

मेधाताईंचा मला विलक्षण भावलेला गुण म्हणजे त्या इतर आयुर्वेदिक ब्रॅण्ड्सना प्रतिस्पर्धी मानत नाहीत. सामान्यपणे उद्योगक्षेत्रात स्पर्धा ही अपरिहार्य मानली जाते. ‘बाकीचे ब्रॅण्ड्स कसे फालतू आणि माझाच ब्रँड कसा चांगला हेच प्रत्येक उद्योजक ठासून सांगत असतो. मेधाताई त्याला अपवाद आहेत. "मी आनंदासाठी उद्योग करते. आम्ही इतर कुठल्याच आयुर्वेदिक ब्रॅण्डशी स्पर्धा करत नाही. सर्व ब्रँड्सनी चांगल्यात चांगली उत्पादनं आणून आयुर्वेद पुढे न्यावा. आयुर्वेद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे,” असं त्या आवर्जून सांगतात. केवळ उद्योगासाठी आयुर्वेद साधन म्हणून न वापरता आयुर्वेदासाठी उद्योग करणारी मेधाताईंसारखी ‘माणसं प्रत्येकालाच नवी दृष्टी देणारी आहेत.

@@AUTHORINFO_V1@@