जि.प.च्या बांधकाम विभागातील सी.एस.पाटील यांना अभय कोणाचे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

कृषी विभागात ३ महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतरही पदभार घेईनात?
अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या तक्रारीला प्रशासनाची केराची टोपली

जळगाव :
जिल्ह्याची मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक सी.एस. पाटील यांची कृषी विभागात पदोन्नतीने वरिष्ठ सहाय्यकपदी पदस्थापना करण्यात आली आहे. मात्र, पाटील यांना तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही. यासंदर्भात जि.प. अध्यक्षांसह सदस्यांनी तक्रारी केल्यात. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने अध्यक्षांच्या तक्रारीला प्रशासनाकडून ‘केराची टोपली’ दाखविण्यात आली असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सी.एस.पाटील यांना ‘अभय’ कोणाचे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याबाबत प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.
 
 
सी.एस. पाटील यांना बांधकाम विभागातून २८ फेब्रुवारीला कार्यमुक्त करण्यात आले होते. परंतु मार्च अखेरची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाटील यांना मार्च अखेरपर्यंत बांधकाम विभागात उपलब्ध करुन देण्याचे आदेश अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी १६ मार्च रोजी कृषी अधिकार्‍यांना दिले होते. आता मार्च उलटून जून संपण्यात आला तरीही त्यांनी आपला पदभार घेतला नाही. यामागचे गौडबंगाल काय? त्याचाही शोध घेणे गरजेचे झाल्याची अपेक्षा संबंधितांकडून व्यक्त होत आहे.
 
सीईओंना द्यावे लागतात पैसे
वरिष्ठ सहाय्यक सी.एस. पाटील हे बिलांसाठी १ लाखाला दोनशे रुपये तर कधी पाचशे रुपये सुध्दा मागणी करीत असल्याचा आरोप मुक्ताईनगर अभियंता रवींद्र सोनवणे यांनी केला असून सीईओंना निवेदन दिले आहे. तसेच बांधकाम विभागात कामांसाठी सीईओ, वरिष्ठ अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागत असल्याचेही पाटील सांगतात. कामांच्या शिफारससाठी २ टक्के मागणी केली जात असल्याचे सोनवणे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
 
 
अध्यक्षांच्या तक्रारीला ‘केराची टोपली‘
याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी देखील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. यात सी.एस.पाटील यांना पदोन्नतीच्या ठिकाणी त्वरित रवाना करुन त्यांच्याकडील कार्यभार नव्याने रुजू झालेल्या कर्मचार्‍यास सोपविण्याची मागणी केली आहे. परंतु तक्रार करुनही जि.प.प्रशासनाने अध्यक्षांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
 
बांधकाम विभागात दररोजचे २५ हजाराचे कलेक्शन
बांधकाम विभागात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणीसाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी करीत असतात. दिवसाला २० ते २५ हजार गोळा करीत असल्याचा आरोप रवींद्र सोनवणे यांनी केला आहे. याबाबत जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांनी तक्रार केली होती. परंतु त्यांना कार्यकारी अभियंता पवार व एसीईओ म्हसकर यांचे पाठबळ असल्याचा आरोप रवींद्र सोनवणे यांनी केला असून आयकर विभागातर्फे त्यांची चौकशीची मागणी केली आहे. सी.एस. पाटील यांच्या जागी वरिष्ठ सहाय्यक आर.जी. शिरसाठ यांना पदभार देण्यात आला आहे. मात्र, पाटील हे पदभार सोडत नसल्याने शिरसाठ यांनी बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले असून सी.एस. पाटील यांचा पदभार सोपविण्याची मागणी केली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@