छतदुरुस्तीच्या कामाला अधिकचे सहा महिने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |





कल्याण : कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या महासभेच्या सभागृहाचे छत कोसळून वर्षाचा कालावधी उलटला असूनही त्याच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. तब्बल वर्षभरानंतर आर्थिक चणचणीमुळे रखडलेल्या या कामामुळे महापालिकेला लोकप्रतिनिधींच्या जीवाची किंमत नसल्याची चर्चा रंगत आहे.

 

कडोंमपा मुख्यालयातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे ’प्लास्टर ऑफ पॅरिस’चे संपूर्ण छत गेल्या वर्षी ११ जुलैच्या मध्यरात्री कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सभागृहातील टेबल खुर्च्यांसह नगरसेवकांचे डेस्क, विजेच्या साहित्यासह इतर सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होते. यावेळी विधिमंडळाच्या महिला हक्क समिती आयोगाच्या सदस्यांच्या भेटीनिमित्त सभागृहाची सफाई करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचार्‍यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर ही बैठक स्थायी समितीच्या सभागृहात घेण्याची नामुष्की ओढवली होती .

 

दरम्यान, हे सभागृह २००१ साली उभारण्यात आले आहे. त्यानंतर अनेकदा या सभागृह दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला होता. पालिकेतील लोकप्रतिनिधी पालिका क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याची महासभा याच सभागृहात होते. या दुर्घटनेची चौकशी करण्याची जबाबदारी पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र या समितीकडून अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई झाल्यानेही या छताच्या दुरुस्तीच्या कामाला उशीर झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. लवकरच या घटनेला येत्या १२ जुलै रोजी वर्षपूर्ती होणार आहे, तरी हे पीओपीचे काम पूर्णत्वास आलेले नाही.

 

येत्या आठवड्यात या कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण होईल. महापालिकेच्या आर्थिक चणचणीमुळे हे काम रखडले होते मात्र, याची निविदाप्रक्रिया पुरी होताच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याची माहिती बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@