आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देविदासला व्हायचेय पोलीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत कुटुंबाला लावतोय हातभार

 
 
जळगाव :
शहरातील नूतन मराठा शाळेत दहावीत शिकणारा देविदास राजेंद्र वाणी.... शिक्षणाची प्रचंड जिद्द...घरची परिस्थिती बेताची असल्याने येणार्‍या प्रत्येक संकटाला सामोरे जात शाळा सुटल्यावर कटलरी वस्तू तसेच प्रत्येक सणानुसार लागणारे साहित्य विक्री करतो. घरची आर्थिक स्थिती बदलली पाहिजे ही आईची इच्छा असल्याने मला पोलीस व्हायचे असल्याचे देविदास सांगतो....
 
 
तुकारामवाडी भागात देविदासचे लहानशे घर आहे. या घरात त्याची आई वडील, आजोबा आणि देविदास हे सदस्य राहतात. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. वडील राजेंद्र वाणी आजारी असतात. त्याची आई मनिषा चार घरची धुणीभांडी करून कुटुंबाचा रहाटगाढा ओढतात.
 
 
घरातील रोजच्या खर्चाचे गणित जुळवतांना दोघांची आर्थिक ओढाताण होते. शाळेची वेळ दुपारी १२ वाजेची असल्याने सकाळी ९ ते ११ या वेळात आईला घरकामात मदत करून हाती येईल ते काम करतो. तसेच दिवाळी, वटपौर्णिमा, हरतालिका, रक्षाबंधन आदी सणानुसार विविध साहित्य विक्री करतो. शाळेतून घरी आल्यावर पुन्हा आईला मदत करतो. यानंतर रात्रीच्यावेळी अभ्यास करतो. असे असले तरी अभ्यासात तो कमालीचा हुशार आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने या दिवशी कटलरी प्रकारातील साहित्याची पूर्ण दिवस विक्री करतो. यातून दोन पैसे अधिक मिळतात. त्यामुळे वडील आजारी असल्याने घरीच असतात. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद पहायला मिळावा, यासाठी देविदास आई बाबांसाठी तो त्यांच्या आवडता खाण्याचा पदार्थ घरी घेवून जातो. अतिशय लहान वयात परिवारासाठी श्रम करण्याची जिद्द, अभ्यासातील जिद्द, मनमिळावू स्वभाव, समजूतदारपणाचे सर्व नातेवाईक कौतूक करतात. मात्र, आर्थिक मदत कोणीच करीत नाही. त्याचे त्याला दुःख काहीच वाटत नाही.
 
 
मदत, सहकार्याची गरज
घरची आर्थिक स्थिती बदलली पाहिजे आणि आईला त्याचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे, यासाठी देविदासला पोलीस व्हायचे आहे. यासाठी त्याने आतापासून प्राथमिक तयारी सुरु केली असून दररोज सकाळी ६ ते ६.३० या वेळेत तो धावण्याचा सराव करतो. पण यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि खाजगी क्लासची गरज आहे. यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींचे हात सरसावणे गरजेचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@