दुटप्पीपणाचा कळस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |



 

दहशतवादाला धर्म नसतो,’ ही जुनीच पुंगी वाजविणारे लोक ख्रिस्ती मंडळींच्या बाबतीत तेही म्हणायला तयार होत नाहीत. स्वत:ला लोकमान्यम्हणविणार्‍या दैनिकांच्या तथाकथित दिग्गज संपादकांपासून ते एरव्ही रोहिंग्यांसाठी पान्हा फुटणार्‍या नट-नट्यांपर्यंत कुणीही या विषयावर बोलायला तयार नाही. वैचारिक विश्‍वातील ही दांभिकता धक्कादायक तर आहेच, पण ज्या मानवतेच्या नावाखाली ही पोपटपंची केली जाते, त्यासाठीही घातक आहे.

 

समाजवादाची थट्टा करताना एक वाक्य वापरले जायचे ते म्हणजे, ‘आपण सगळेच समान आहोत आणि काही लोक थोडे अधिक समान आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे, समाजवादाची संकल्पना पचनी पाडून जिथे जिथे राज्यकर्ते निर्माण झाले तिथे तिथे नंतर दांभिकताच ओसंडून वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले. हा तपशील आता आठवण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, केरळमधील पाद्य्रांचे चर्चमधील बलात्काराचे प्रकरण आणि दुसरे म्हणजे आपल्याकडील माध्यमांचे आणि विचारवंतांचे या विषयातील मौन. बातमीच इतकी भयंकर होती की, ती दडपता आलीच नसती. पण, या बातमीचे विश्‍लेषण करण्यात माध्यमे अद्याप पुढे सरसावलेली नाहीत. असमानता नाकारणार्‍या, सेवेचा भाव प्रमुख मानणार्‍या ख्रिस्ती धर्माचे साहित्य काय सांगते आणि त्याचा अनुनय करणारे काय करतात यात नेहमीच फरक राहिला आहे. धर्माच्या बाबतीत तसे असणे साहजिकच असते, कारण धर्म नवे प्रवाह स्वीकारणारा नसला की त्यात विकृती निर्माण होतातच. या विकृती बाहेरून निर्माण होत नाहीत, तर त्या धर्माच्या अनुयायांकडूनच निर्माण झाल्याचे दिसते. सेमेटिक धर्माच्या बाबतीत या शक्यता नव्हे, तर वास्तवच असल्याचे लक्षात आले आहे. बायबल किंवा कुराणात जे काही लिहिले आहे, त्याच्यापेक्षा निराळेच वागत असल्याचे आपल्या लक्षात येईल. अर्थात, हिंदू धर्माशी संबंंधित मंडळींवर असे आरोप होत नाहीत, असे मुळीच नाही. मात्र, त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण हिंदू समाज उभा राहिल्याचे कधीही दिसत नाही. या उलट गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठीही धर्माचे आवरण कसे द्यायचे याचाच खटाटोप सुरू होतो.

 

केरळच्या प्रकरणातही तेच सुरू झाले आहे. तिरूअनंतपुरमच्या या प्रख्यात चर्चमध्ये एका महिलेने आपण केलेल्या पापांची कबुली देण्याच्या ख्रिस्ती पद्धतीनुसार कबुली दिली. आपल्यावरील अत्याचारांची ही कबुली होती. मात्र, ज्या पाद्य्राने ही कबुली ऐकून घेतली, त्यानेच महिलेचे लैंगिक शोषण केले. हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर त्याने अजून काही पाद्य्रांना आपल्या या कृत्याची माहिती दिली व त्यातून पुढे अजूनच गैरप्रकार घडले. महिलेच्या पतीने आठ धर्मगुरूंवर असे आरोप केले होते, त्यातील पाच जणांना चर्चने चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. केरळमध्ये ख्रिस्त्यांचा प्रभाव इतका आहे की, अद्याप या प्रकरणाची पोलिसांत साधी तक्रारही नोंदविली गेलेली नाही. धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार चर्चच्या आवारातच घडला होता. आता चर्चमधल्या उच्चपदस्थांकडून आणल्या जाणार्‍या दबावाची चर्चा दबक्या स्वरात केली जात आहे. या सार्‍याच प्रकरणांत पोलीस, प्रशासन, राज्य सरकार हातावर हात ठेऊन बसले आहेत. चर्चच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणूनही काही लोक या सगळ्याकडे पाहात आहेत. मात्र, मुद्दा असा की, इतकी गंभीर घटना घडल्यावरसुद्धा सगळीकडे असलेली शांतता. जम्मूमधील दोन गटांच्या भांडणात लहान मुलीचे झालेले प्रकरण मंदिरात तिला डांबल्याने गाजले होते. त्यात जे दोषी होते त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, यावर दुमतही असण्याचे कारण नाही. अनेक तथाकथित अभिव्यक्तीवाले, सामाजिक कार्यकर्ते व राजकारण्यांना त्यावेळी कंठ फुटला होता. महाराष्ट्रातील काही रिकामटेकड्या राजकारण्यांनी तेव्हा देव काय करीत होतावगैरे प्रश्‍न उपस्थित करून प्रसिद्धी मिळविली होती. मानवतेच्या नावाखाली त्या मुलीला न्याय कसा मिळाला पाहिजे, याची होर्डिंग्ज देशभर लावत होती. आता मात्र सर्वच कसे शांत आहे.

 

२०१४ नंतर सत्तेच्या आधारावर चालणारे धर्मांचे आणि त्याच्या अनुयायांचे लांगूलचालन बंद झाले. मात्र, काही लोकांच्या मनातून अद्याप ते गेलेले नाही. तोंडाने धर्मनिरपेक्षतेचे प्रवचन झोडत राहायचे आणि असे काही घडले की बिळात दडून बसायचे, असा हा शिरस्ता. जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात याच तिरूअनंतपुरमधील याच चर्चच्या माध्यमातून मालमत्तांसाठी वेगळ्या कायद्याची मागणी रेटली जात आहे. हा कायदा झाला तर उद्या अन्य राज्यांतील ख्रिस्ती समुदायही अशा प्रकारच्या कायद्यांची मागणी करणार आहेत. झारखंडच्या खुंटी सामूहिक बलात्कारप्रकरणी देखील असेच चालढकलीचे धोरण सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, या झारखंडच्या आरोपी धर्मगुरूच्या समर्थनार्थ बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाचे बिशप थियोडोर मास्करहान्स उतरले आहेत. खुंटी प्रकरणातील आरोपी फादर अलफान्सोंना पत्रकार परिषद घेऊन निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे काम त्यांनी केले आहे. कुठलाही संबंध नसताना पत्थलगढी चळवळीचा संदर्भ यात आणला आहे. नक्षली चळवळींना कंटाळलेल्या लोकांनी आता माओवाद्यांची साथ सोडायला सुरुवात केली आहे. नक्षलवादी आता निरनिराळे बुरखे वापरून यात उतरले आहेत. निवाडा करण्याच्या एका पद्धतीलाच सत्ताकेंद्र म्हणून विकसित करण्याचा व संविधानाला कस्पटा समान मानण्याचा हा नवमाओवादच आहे. आता एका धर्मगुरूचे या सगळ्याशी काय देणेघेणे असावे, हा मोठा प्रश्‍न आहे. पण, धर्मप्रसाराचे काम करणार्‍या या मंडळींच्या बाबतीत असे अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. त्याची उत्तरे मिळत नाहीत. दहशतवादाला धर्म नसतो, ही जुनीच पुंगी वाजविणारे लोक ख्रिस्ती मंडळींच्या बाबतीत तेही म्हणायला तयार होत नाहीत. स्वत:ला लोकमान्यम्हणविणार्‍या दैनिकांच्या तथाकथित दिग्गज संपादकांपासून ते एरव्ही रोहिंग्यांसाठी पान्हा फुटणार्‍या नट-नट्यांपर्यंत कुणीही या विषयावर बोलायला तयार नाही. वैचारिक विश्‍वातील ही दांभिकता धक्कादायक तर आहेच, पण ज्या मानवतेच्या नावाखाली ही पोपटपंची केली जाते, त्यासाठीही घातक आहे.

@@AUTHORINFO_V1@@