‘मेड इन चायना’ की ‘मेक इन इंडिया’?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |



 हिंदी-चिनी भाई-भाई चा नारा राजकीय पटलावर काही काळ दिला गेला, परंतु चिनी भाई कुठल्याकुठे निघून गेले आणि हिंदी भाई चिनी वस्तू विकत घेत राहिले
 
 
 
‘मेड इन चायना’ असे लेबल असलेल्या वस्तू आपल्या घराघरात सापडतात. दिवाळी असो अथवा गणेशोत्सव, चायनीज माल विकत घेऊ नका, अशी ओरड समाजमाध्यमांतून होत असते. चायनीज वस्तू विकत घ्यायची इच्छा नसतानाही, कधीतरी दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नाही म्हणून चायनीज वस्तू आपण विकत घेतो. लक्षात घेण्यासारखी बाब आहे की, अल्लादिनच्या जादुई दिव्यातील जिनी जसा त्याच्या आकाचा प्रत्येक हुकूम मानतो, आकाला हवे ते हजर करतो, तशाचप्रकारे तुम्हा-आम्हाला हवी ती ‘मेड इन चायना’ वस्तू हव्या त्या किमतीत, हव्या त्या रंगात-ढंगात बाजारात न मिळणे अशक्य. चायनीज वस्तूंचा पूर आपल्या बाजारात ओसंडून वाहत असतो आणि त्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा फायदा मात्र चिनी अर्थव्यवस्थेला होत असतो. विचार करण्याजोगी गोष्ट आहे की, एवढ्या प्रचंड प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करून त्या जगभरात विकणे आणि त्यातून राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करणे सहजासहजी शक्य झाले असेल का? चायनाच्या नावे बोटे मोडण्याऐवजी, एक महाकाय राष्ट्र चायना, क्या चीज है, हे समजून घेण्याची आज गरज आहे.
 

‘हिंदी-चिनी भाई-भाई’चा नारा राजकीय पटलावर काही काळ दिला गेला, परंतु चिनी भाई कुठल्याकुठे निघून गेले आणि हिंदी भाई चिनी वस्तू विकत घेत राहिले. केवळ भारतात नाही, तर अमेरिका आणि इतर अनेक देशांना चायनीज मालाने मिंधे केले आहे. चायनाने प्रचंड प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करण्याचे का ठरवले? ते साध्य कसे केले? आज चीनसमोर काय आव्हानं आहेत? चीनमध्ये राजकीय उलथापालथ झाली तर भारताचे धोरण काय असावे? चिनी मालाच्या तुलनेत भारतीय मालाचे स्थान काय आहे? अशा अनेक प्रश्नांवर ऊहापोह होणे गरजेचे आहे.

 

‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ एक महाकाय राष्ट्र म्हणून १ ऑक्टोबर १९४९ साली अस्तित्वात आले. चीनची औद्योगिक प्रगती त्यानंतर झाली आहे. एक राष्ट्र म्हणून जगभरात आपला दबदबा निर्माण करणे या मुख्य उद्देशाने झालेली चीनची वाटचाल दुर्लक्षित करता येत नाही. समाजवादी राजकीय विचारसरणीच्या आवरणाखाली काय घडते आणि त्याचे परिणाम काय झाले आहेत, हे सर्वश्रुत आहे. प्रचंड लोकसंख्या असल्याने लोकांना काम, रोजगार असणे अपरिहार्य होते व आजही आहे. बनवलेल्या मालाची निर्यात होणे तसेच सर्वसामान्य लोकांनी राजकारणात हस्तक्षेप न करणे, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेला औद्योगिक धोरणाआड न येऊ देणे, असे अनेक पैलू चीनच्या औद्योगिक प्रगतीला कारणीभूत आहेत. कामाशिवाय रिकामे हात कधी विद्रोहाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरतील याची खात्री नाही, हे चिनी राजकारण्यांनी वेळीच जोखले होते. राष्ट्रहिताच्या दूरगामी आणि महत्त्वाकांक्षी धोरणाच्या आड फारसे काही येऊ न देता (!!) द्रष्ट्या नेत्यांनी धोरण धरसोड केली नाही. त्याचबरोबर संशोधन करून असो अथवा नक्कल करून असो, बाजारात नवनवीन वस्तू आणण्याचा चिनी धडाका लावला. मालाची निर्यात करणार्‍या उद्योगांना सोयी, सवलती देऊन अमेरिकी डॉलरची गंगाजळी जमवली. सर्वसामान्य लोकांच्या हातात पैसा खेळता राहावा यासाठी चिनी युआनची आंतरराष्ट्रीय बाजारात कमी किंमत असणे, हाही कदाचित धोरणाचा भाग असू शकेल.

 

चिनी मालाला दुय्यम लेखण्याआधी आपण भारतीयांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. प्रचंड लोकसंख्या आज आपल्याकडेही आहे. नैसर्गिक साधने उपलब्ध आहेत. बाबूगिरी अथवा इतर राजकीय घडामोडींचा, निर्यात धोरणाचा, आर्थिक पाठबळाचा परिणाम आपल्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या निर्यातीवर होत असतो. मात्र, ग्राहक परदेशी असो अथवा देशांतर्गत असो, मालाची गुणवत्ता, वेळेत माल ग्राहकाकडे पोहोचणे या दोन मुख्य निकषांवर उद्योगाची वाढ अवलंबून असते. एकदाच माल निर्यात करणे त्यामानाने सोपे असते, परंतु परदेशी ग्राहकाने आपल्याकडून नियमित माल घ्यावा, अशी जर उद्योजकाची दूरदृष्टी असेल तर मात्र गुणवत्तेतील सातत्य, वेळेचे बंधन, कागदपत्रांची योग्य पूर्तता, पर्यावरणविषयक नियमाचे पालन आणि सर्वात महत्त्वाचे ग्राहकाशी नियमित सुसंवाद. या गोष्टींना पर्याय नाही. अनेकदा लघु आणि मध्यम उद्योजक समोर आलेली निर्यातीची संधी केवळ वेळ कमी पडतो, खूप मेहनत आहे, आता तर खूप कमी मागणी आहे, आपली क्वालिटी एक्स्पोर्टला चालणार नाही? इ. अनेक सबबी देऊन नाकारतात. आपला माल निर्यातीयोग्य करण्यासाठी उद्योगकाने स्वत:ची बलस्थानं ओळखली पाहिजे. आपल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात गरज आहे का? आज त्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात काय किंमत आहे? आपल्या उद्योगात, आपल्या कर्मचार्‍यांच्या कौशल्यात सुधारणेची गरज आहे का? हे सारे प्रश्‍न ध्यानात घेऊन निर्यातीचा विचार केल्यास निर्यात यशस्वी होऊ शकते.

 

संकुचित मनोवृत्तीतून बाहेर पडून सुबत्ता कशी येईल, हे उद्योजकाने जाणले पाहिजे. चीनच्या औद्योगिक प्रगतीला दुर्लक्षित करून, आपल्याकडे तसे घडू शकत नाही, असे मानणे म्हणजे आपल्याच हातांनी आपल्याच पायावर धोंडा मारण्यासारखे. धरसोड वृत्ती मागे सारून आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असल्यास निर्यात सहज शक्य आहे. परदेशी ग्राहक आज मोठ्या अपेक्षेने भारताकडे बघत आहेत. महिन्याला अगदी लाख, दोन लाख की शंभर-दोनशे नग योग्य गुणवत्तेचे, योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवायचे हे उद्योजकाने ठरवावे. ग्राहकाचा विश्वास संपादन करून आपला उद्योग वाढवणे, उद्योगकाचे ध्येय असले पाहिजे. अनेकदा उद्योजक परदेशी ग्राहाकाला बिचकतात, त्यांना वेगळी वागणूक देण्यास धडपडतात पण परदेशी ग्राहकाच्या अपेक्षा व्यवस्थित नमूद केलेल्या (Documented) असतात. आपला माल त्यांच्या गुणवत्तेच्या निकषांवर पास होणे हे सर्वात महत्त्वाचे असते. उद्योजकाने आधी कमी जोखमीचे काम स्वीकारून सुरुवात करणे कधीही हितकर. Make in india and sell your product in world

 

आपला माल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार आहे का? आपल्याला उद्योगाची वाढ करायची आहे का? त्यासाठी मेहनत घ्यायची आपली तयारी आहे का? आपल्या उद्योगवाढीचे टप्पे कसे असले पाहिजेत? एक उद्योग म्हणून आपली कुठली विशेष कौशल्यं ग्राहकांना फायदेशीर ठरू शकतात? निर्यातीसाठी लागणारी मानसिकता आपल्यात आणि आपल्या कर्मचार्‍यांमध्ये रुजवण्यास काय करावे लागेल? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उद्योजकाला द्यावी लागतील. आज आपल्या एका क्लिकसरशी माहिती, विश्लेषण आणि अनेक चांगले विषय तज्ज्ञ आपल्याला मदत करू शकतात. माहितीचे भांडार पुस्तकाच्या, इंटरनेटच्या, समाजमाध्यमाच्या, अनेक औद्योगिक संघटनांच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे. या माहितीचा अभ्यास करून, त्यावर मनन करून उद्योजक आंतरराष्ट्रीय बाजारात तयारीने उतरू शकतो. कुठेतरी वाचल्याचे आठवते, जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती अपेक्षेपेक्षा अधिक चांगले काम करतात आणि समोर आलेल्या संधीचा फायदा करून घेतात, तेव्हाच खरंतर मैलाचे दगड पार होतात. उद्योजकाने ग्राहकाला विश्वास दिला पाहिजे की, आम्ही तुमचे प्रोडक्टस इथे बनवू, जे तुम्ही जगात विकू शकाल. भारतीय उद्योजकाने हा धागा पकडून निर्यात क्षेत्रात पाऊल ठेवले तर ती उद्योजकासाठी आणि परदेशी ग्राहकासाठी थळप-थळप परिस्थिती ठरू शकते. ‘मेक इन इंडिया’ केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात आणायला लघु आणि मध्यम उद्योजकांनी सुसज्ज व्हायलाच हवे.

-ऋता पंडित

@@AUTHORINFO_V1@@