समतानगर अल्पवयीन बालिकेचा खून केल्याची आदेशबाबाची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

पुरेसा शास्त्रीय पुरावा मिळाला, नागरिकांचे सहकार्य लाभले, पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन

जळगाव, २८ जून :
शहरातील समतानगर परिसरातील ८ वर्षीय बालिकेचा गळा दाबून खून केल्याची आणि तिचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याची कबुली संशयित आरोपी आदेशबाबाने दिल्याची आणि त्याच्याविरोधात शास्त्रीय पुरावे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी एसडीपीओ सचिन सांगळे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पो.नि.रोहोम व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सुनिल कुर्‍हाडे उपस्थित होते.
 
 
१३ जून रोजी या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधलेला आढळून आल्याने समतानगर परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला गेला आहे. घटनेपासून आनंदा साळुंखे उर्फ आदेशबाबा फरार होता. त्यामुळे त्याच्यावर पोलीस आणि मृत बालिकेच्या कुटुंबियांचा संशय होता. खुन्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील २० - २५ लोकांची विचारपूस करण्यात आली. आदेशबाबावर संशय असल्याने तो पळून जावू नये म्हणून पोलीस प्रशासनाचे त्याच्यावर कडक लक्ष होते. संशयित कोठे लपू शकतो त्या सर्व जागांची तपासणी करण्यात आली. अखेर नागरिकांच्या सहकार्याने आदेशबाबाला ताब्यात घेण्यात यश आले. त्याची डीएनए टेस्ट करता ती मृत बालिकेच्या डीएनएशी जुळली आहे. आदेशबाबाच्या घरात सापडलेले टोस्ट व नानखटाई तसेच मृत मुलीच्या अंगावर व पोत्यात दिसून आलेले टोस्ट व नानखटाई एकच असल्याचा शास्त्रीय पुरावा मिळाला आहे.
 
अशी घडली होती घटना
घटनेच्या दिवशी आदेशबाबा (वय ६० ते ६५ वर्षे)घरी एकटाच होता. पीडित मुलगी त्या दिवशी सायंकाळी खेळण्यासाठी आदेशबाबाच्या घरी गेली, त्याने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याने मुलीस गळा दाबून ठार मारले. मृतदेह घरातच रात्री पोत्यात भरुन निर्जनस्थळी टाकून त्याने पलायन केले होते. या घटनेसंबंधी करण अहिरे म्हणून चिठ्ठी मिळाली होती. ती आदेशबाबानेच लिहिली असण्याचा संशय असून त्याबाबत हस्ताक्षर तज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
 
पोलिसांना नागरिकांचे सहकार्य
या घटनेनंतर नागरिकांचा प्रक्षोभ होऊ शकला असता. मात्र, नागरिकांनी संयम ठेवला आणि आरोपीस पकडण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.
 
पोलिसातील माणुसकी
पीडित मुलीच्या पालकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एसडीपीओ सचिन सांगळे स्वत: संबंधित विभागात गेले होते. मुलीच्या वडिलंाना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते शिक्षा भोगत आहेत. त्यांना अंत्यसंस्कारासाठी रजा मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पोलिसांनी केली. संबंधित विभागांनीसुध्दा यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
 
आनंदा साळुंखे उर्फ आदेशबाबा हा समतानगर येथे वास्तव्याला येण्यापूर्वी २० वर्षे वणी गडावर होता. या आदेशबाबावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. बोदवड येथील आदेशबाबा हाच असल्याचा संशय होता. परंतु, आनंद साळुंखे आणि बोदवड येथील आदेशबाबा वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आदेशबाबाकडे वन्य प्राण्याचे कातडे व शिंग मिळून आले. त्यासंदर्भातही कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस अधीक्षक कराळे यांनी शेवटी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@