प्लास्टिकबंदीची नेमकी माहिती खुद्द पालिका अधिकाऱ्यांनाच नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |




 

बंदी नसलेल्या प्लास्टिकवरही दंडवसुली, ‘आहार’चा गंभीर आरोप


मुंबई : राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता सर्व स्तरांतून त्याबाबत बऱ्यावाईट प्रतिक्रिया, तक्रारी येऊ लागल्या आहेत. मात्र, ज्यांनी या प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करायची आहे, अशा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच प्लास्टिकबंदीबाबत नेमकी माहिती नसल्याचा गंभीर आरोप मुंबईतील हॉटेल मालकांची संघटना ‘आहार’कडून करण्यात आला आहे. तसेच, त्यामुळे सरकारने बंदी न घातलेल्या व पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिकवरही हे पालिकेचे अधिकारी दंडवसुली करत असल्याची तक्रारही आहारने केली आहे.

 

प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी हॉटेल्स व इतरत्र धाडी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनाच नेमकी कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे आणि कशावर नाही, हे माहीत नसल्याचे आहारने म्हटले आहे. मुंबईतील वडाळा येथे आहारचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार आणि महापालिकेची यंत्रणा यांमध्येच प्लास्टिकबंदीवरून ताळमेळ नाही. दुसरीकडे, पर्यावरणरक्षणासाठी राज्यात करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीला 'आहार' संस्थेचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकच्या प्लेट्स, ग्लास व जे प्लास्टिक कंटेनर पुनर्वापर करण्यायोग्य नाहीत, त्यांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ज्या प्लास्टिक कंटेनरचा पुनर्वापर करता येतो (जाड प्लास्टिक) त्यावर सरकारने बंदी घातलेली नाही. हे सरकारकडून आम्हाला स्पष्टपणे कळवण्यात आले आहे. परंतु तरीही मुंबईतील हॉटेलांची तपासणी करून प्लास्टिकवापराची दंडवसुली करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाच हा फरक समजलेला नसून त्यामुळे त्यांनी पुनर्वापरायोग्य कंटेनर वापरणाऱ्या चेंबूरमधील काही हॉटेलांवर धाड टाकत त्यांना जबर दंड ठोठावला आहे. हे प्रकार योग्य नसून आम्ही कायदा पाळत असूनही आम्हाला का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल संतोष शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या या सर्व प्रतापांमुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक दहशतीत असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच, यानंतर आम्ही सर्व व्यावसायिक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन त्यांना आमची व्यथा सांगणार आहोत, असेही शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@