परमपावन पुण्यस्मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |





लोकांच्या प्रापंचिक समस्या दूर केल्या.लोकांना दासबोध, पांडवप्रताप, रामायण यासारखे ग्रंथ सोप्या शब्दांत समजावून सांगितले. हजारो लोकांना भक्तिमार्गाकडे प्रवृत्त केले. प्रवचनं, श्रीगुरुचरित्र पारायण, औदुंबर प्रदक्षिणा याद्वारे दत्तभक्तीचं महत्त्व पटवून दिलं.

 

संत भूलोकीचे चालते-बोलते ईश्‍वर असतात. संत सामान्य समाजाला सुखरूप जगण्यास सुयोग्य अशी मनोभूमिका तयार करतात. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालण्यास शिकवतात. नरदेहाचं सार्थक भक्‍तिमधून साधलं जातं, हे समजावून सांगतात. कोकण भागातील सावंतवाडीजवळील साखळी ग्रामी पटवर्धन घराण्यात गुरुनाथ बालकाचा जन्म माघ वद्य द्वादशी शके १८२२ ला झाला. इतिहासप्रसिद्ध पटवर्धन घराण्यात जन्मलेलं तेजस्वी बालक बालपणापासूनच आगळंवेगळं होतं. गुरुनाथांनी पुढे अनेकांना सनाथ केलं. निस्पृहता, निर्भयता हे गुण प्रारंभापासून, अगदी बालवयापासून त्यांच्यात दिसून येत. त्यांनी बालपणीच आकेरी (सावंतवाडी) येथील घराचा त्याग केला. बालवयात मातापित्याची माया दूर सारली. सुमारे ४२ वर्षे भारतभर परिभ्रमण केलं. अनेक तीर्थक्षेत्री नुसत्या तिर्थावर अनुष्ठाने केली. कुठे कोकण तर कुठे रामेश्‍वर? त्यांनी थेट देवभूमी असलेल्या हिमालयात तपश्‍चर्या केली.

 

अत्यंत पवित्र अशा काशीक्षेत्री त्यांना वयाच्या २२ व्या वर्षी प. पू. प्रज्ञानंदसरस्वतींकडून अनुग्रहाचा अमूल्य लाभ झाला. दत्तसंप्रदायातील परंपरेची गुरुशक्ती त्यांना प्राप्त झाली. त्यांनी या परिभ्रमणाच्या काळात समर्थ रामदास स्वामींप्रमाणे समाजाचं सूक्ष्म अवलोकन केलं. समर्थ रामदास स्वामींनीदेखील बालवयात घराचा त्याग केला. त्याचप्रमाणे प. पू. विष्णुदास महाराज (गुरुनाथ) यांनी घरदार सोडले. समर्थांना प्रभू दत्तात्रेयांनी दर्शन देऊन मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे गुरुनाथांना म्हणजे विष्णुदास महाराजांना भगवान दत्तात्रेयांनी वेळोवेळी दर्शन देऊन मार्गदर्शन केलं.सकल समाजाला दृष्टी प्रदान करणारे प. पू. विष्णूदास महाराज काशीक्षेत्री वाट चुकलेल्या पाटोळे नामक एका अंध गृहस्थाला त्याच्या गावी पोहोचविण्याच्या निमित्ताने १९५२ मध्ये विदर्भातील शेगावजवळील भांबेरी ग्रामी आले. हीच त्यांची कर्मभूमी ठरली. भांबेरी, गाडेगाव, तेव्हारा या परिसरात भुयारं, दत्तमंदिरांची स्थापना केली. अनेक सात्विकता टिकण्यासाठी बाहेरून कठोर राहणं आवश्यक असतं, याप्रमाणे प. पू. विष्णुदास महाराज होते.

 

नारळा अंतरी माधुरी। बाह्य कवच कठीणी ।

गुरू प्रेमळ अंतरी । कठोर कवच बाह्यात्कारी ॥

त्यांच्या अंत:करणात प्रेमाचा गोडवा तर वर्तनात अत्यंत कडकपणा होता. त्यांची राहणी साधी असूनही टापटीप होती. ते नेहमी पांढर्‍या रंगाची वस्त्रे वापरत.

शुभ्र जटाभार शिरी । तेजस्वी गौरवर्ण कांती ।

शुभ्र त्रिवस्त्र अंगी । गुरू श्री विष्णुदास ध्यानी ॥

 

त्यांच्या माथ्यावर शुभ्र जटा असून ते गौरवर्णाचे होते.तपाच्या तेजाने तेजस्वी असलेली त्यांची कांती झळकत होती. शुभ्र धोतर, सदरा आणि उपरणं अशी तीन वस्त्र धारण करणारे गुरू श्री विष्णुदास महाराज, ध्यानामध्ये निमग्न असलेले व शिष्यांना ध्यानात दर्शन देणारे होते. अंतर्बाह्य शुद्धीची झळाळी प्रत्येक शब्दातून, कृतीतून, उपदेशातून प्रतीत होत असे. एखाद्या ऋषिप्रमाणे त्यांचं आचरण होतं.

 

मनाची शक्ती, मनोलहरी अशक्य ते शक्य करू शकतात, हे त्यांनी शिष्यांना प्रयोग करण्यास प्रवृत्त करून प्रचितीस आणून दिले. अनेक शिष्यांच्या व्याधी नष्ट केल्या. त्यांना प्रत्येकाचा भूतकाळ, भविष्यकाळ ज्ञात असायचा.त्यानुसार ते शिष्यांची प्रगती साधत असत. त्यांनी अनेक शिष्यांची गंडांतरे टाळली. दारिद्य्र दूर केले. प.पू.विष्णुदास महाराजांच्या चरित्र-पोथीमधून वारंवार श्रीगुरुचरित्र ग्रंथातील घटनांचं स्मरण होतं. अत्यंत आध्यात्मिक अधिकारी असलेल्या प. पू. विष्णुदास महाराजांची साधी राहणी होती. ते प्रसिद्धीपासून दूर राहिले. स्वआचरणातून समाजासमोर त्यांनी आदर्श प्रस्थापित केला.

 

प.पू. विष्णुदास महाराजांना समस्त ग्रामस्थ व शिष्य प्रेमाने आधार देणारे म्हणून ‘बाबा’ म्हणत असत.श्रीगुरुचरित्र ग्रंथावर त्यांची अविचल निष्ठा, आत्यंतिक श्रद्धा होती. ते उंच, मजबूत बांध्याचे असून त्यांचा आवाज पहाडी होता. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये दत्तभक्ती रुजवली. अशा आध्यात्मिक अधिकारी, संत सत्पुरुष आणि ऋषितुल्य जीवन जगणार्‍या बाबांवर अलोट प्रेम करणारा फार मोठा जनसमुदाय आहे. त्यांचं कार्य, त्यांचे सत्शिष्य प. पू. सद्‍गुरुदास महाराज मोठ्या निष्ठेने करत आहेत. जपाच्या माळेत १०८ मणी असतात, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या शिष्यांद्वारा १०८ केंद्रांची स्थापना करून घेतली. या १०८ मण्यांच्या माळेतील प्रत्येक केंद्रात प.पू.विष्णुदास महाराजांचा जयघोष दुमदुमत असतो. त्यांना परमप्रिय असणारी व त्यांनी नेमून दिलेली दत्तउपासना सातत्याने चालते. श्रीगुरुचरित्राचे पारायण केलं जातं. विविध उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होतात.

 

दत्तसंप्रदायातील थोर, अलौकिक संत प. पू.विष्णूदास महाराज (गुरुनाथ पटवर्धन) यांच्या वंशजांचा शोध त्यांच्याच कृपेने लागला. त्यांच्या वंशजांना आज धन्य धन्य वाटत आहे. अशा या थोर संताने ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शके १९१२ , शुक्रवारी निजानंदगमन केलं.ते आजही दर्शन देऊन भक्तांना आनंदाचा लाभ करून देतात. त्यांची पुण्यतिथी यावर्षी शुक्रवारीच आली आहे, हा विलक्षण योगायोग आहे. त्यांच्या पावन स्मृतीला ही शब्दसुमनांजली श्रद्धापूर्वक

 

अर्पण करण्याचं भाग्य मला लाभलं, ही त्यांचीच कृपा !

जय श्री विष्णुदास । दत्तगुरू श्री विष्णुदास ।

श्रीपाद वल्लभ विष्णुदास । नृसिंह सरस्वती विष्णुदास ॥

- कौमुदी गोडबोले

@@AUTHORINFO_V1@@