दारुड्या पतीने केला पत्नीचा खून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

मुलगा बचावला : करगाव येथील सकाळी ६.१५ वाजता थरार


 
चाळीसगाव, २७ जून:
कामधंदा न करता दारुचे व्यसन जडलेल्या दारुड्या पतीने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात लोखंडी जाड पट्टी मारुन खून केल्याची घटना २७ रोजी सकाळी ६.१५ वाजता तालुक्यातील करगाव तांडा न ४ येथे घडली. त्यावेळी मुलगा पळून गेल्याने सुदैवाने तो बचावला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खूनी पतीला अटक करण्यात आली आहे.
 
 
प्राप्त माहितीनुसार आत्माराम उर्फ आप्पा काळु जाधव हा पत्नी संगीता उर्फ सरूबाई आत्माराम जाधव व चार मुलांसह राहत होता. आत्माराम यास दारुचे व्यसन जडल्याने तो कसलाही कामधंदा न करता फक्त दारु पित असे. दारु पिण्यासाठी नेहमी पत्नीला व मुलांना मारहाण करीत होता. २६ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून तिचा पती दारु पिवून गावात फिरत असल्याने भयभीत झालेल्या संगीता या ४ मुलांना घेवून शेजारच्या घरात झोपल्या होत्या. बुधवारी त्यांचा मोठा मुलगा चेतन व संगीताबाई हे सकाळी ६ वाजता उठून स्वतःच्या घरी गेले. त्या घरात पाणी तापवत चुलीजवळ बसल्या असतांना पती आत्माराम हा हातात जाड लोखंडी पट्टी घेवून घरात आला आणि दारु पिण्यासाठी त्याने पैसे मागितले. माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यावर त्याचा राग येवून आत्माराम याने त्यांना लाथ मारुन लोखंडी जाड पट्टी त्यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले. एवढ्यावर न थांबता त्याने समोर उभा असलेल्या मुलगा चेतन याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावला, मात्र मुलगा तेथून पळून गेल्याने तो सुदैवाने बचावला. आरोपीने लोखंडी पट्टी अंगणात टाकून सिनेस्टाईल दारात बसून दहशत निर्माण केली होती. जखमी संगीताबाई यांना रिक्षात टाकून चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करुन दुसर्‍या रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
 
 
याप्रकरणी चेतन आत्माराम जाधव (१५) याच्या फिर्यादीवरुन आरोपी आत्माराम जाधव याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरिक्षक राजू रसेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रमेश मानकर करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@