‘आम्ही आणि आमचे संविधान’ पुस्तकास वाचकांचा प्रचंड प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |





नाशिक: ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार रमेश पतंगे यांचे अलीकडेच ‘आम्ही आणि आमचे संविधान’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. सहा हजार प्रतींची पहिली आवृत्ती हातोहात संपली असून दुसर्‍या आवृतीची नोंदणी सुरू झाली आहे. सध्या देशभर संविधान, समता, न्यायालयीन स्वातंत्र्य इत्यादी विषयांवर उलटसुलट चर्चा चालू असते. यासाठी आपले संविधान काय आहे, संविधान सभेची निर्मिती कशी झाली, संविधानाचा ध्येयवाद कोणता आहे, संविधानाचा आत्मा कशात आहे, लिखित संविधानाचा इतिहास कोणता? संविधानाने आपल्याला काय दिले? राजकीयदृष्ट्या देश एक ठेवण्यात संविधानाची भूमिका कोणती? संविधान आणि लोकशाही यांचा संबंध काय? संविधान बदलण्याचे प्रयत्न यापूर्वी कसे झाले, न्यायालयाने आपले स्वातंत्र्य कसे रोखलेले आहे इत्यादी विषयांची माहिती वेगवेगळ्या लेखातून या पुस्तकात दिलेली आहे. सामाजिक चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांना आताच्या काळात संविधान हा विषय नीट समजून घेणे आवश्यक आहे.

 

‘संविधान’ ही केवळ चार अक्षरे नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे. तो कोणता? तसेच संविधानासंबंधी कार्यकर्त्यांना पडणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात नक्कीच सापडतील. राज्यातील ज्येष्ठ विचारवंत म्हणून गणले जाणारे रमेश पतंगे यांचे शिक्षण एम.ए. (राज्यशास्त्र,अर्थशास्त्र) असून सा.’विवेक’चे संपादक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. ते बालपणापासून संघ स्वयंसेवक असून संघकामाच्या विविध जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. वैचारिक वाङ्मयतेत भर घालणारी त्यांची अनेक पुस्तके आहेत.

 

त्यात समरसता, संघर्ष महामानवाचा, बहुस्पर्शी विवेकानंद, महामानव अब्राहम लिंकन इत्यादी पुस्तकांचा समावेश होतो. सामाजिक समरसता मंच, भटके-विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक सदस्य आहेत. आजघडीला हिंदुस्थान प्रकाशनसंस्थेचे अध्यक्ष, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालयाचे सदस्य या जबाबदार्‍या ते सांभाळत आहेत. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे सा. विवेक, हिंदी विवेक, शिल्पकार चरित्रकोश, पुस्तक विभाग असा सर्व मोठा प्रकाशनाचा व्याप आहे. पतंगे यांच्या ‘आम्ही आणि आमचे संविधान’ या इच्छुकांनी पुस्तकाच्या नोंदणीसाठी सुधाकर नेवे (9881265592), नितीन बिबिकर (9665778497) आणि सदाशिव वालझाडे (9423555 868) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

भारतीय संविधानावर 3 जुलै रोजी व्याख्यान

भाजपचे नेते, नाशिक मनपातील विरोधी पक्षनेते स्व. प्रभाकर शंकर तथा बंडोपंत जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दि.3 जुलै रोजी संध्या. 6 वा. प्रख्यात विचारवंत आणि हिंदुस्थान प्रकाशनाचे अध्यक्ष रमेश पतंगे यांचे ’भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रसाद मंगल कार्यालय, नाशिक येथे होणार्‍या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवदत्त जोशी आणि परिवाराने केले आहे. व्याख्यानाच्या स्थानीदेखील ’आम्ही आणि आमचे संविधान’ हे पुस्तक उपलब्ध असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@