कॉंग्रेसच्या फलकावर संघाचे निमंत्रण.....!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

 
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय) या दोन भिन्न विचारधारा आहेत. या दोघांचे एकत्र येणे मोठी बाब मानली जाते. मात्र जळगाव येथे या दोन्ही संघटनांत चक्क समन्वय साधलेले दिसून आले. काँग्रेसच्या फलकावर संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण समस्त जळगावकरांना वाचायला मिळाले आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू साम्राज्य दिनाचा दरवर्षी संपन्न होणारा कार्यक्रम असतो. नेहमी प्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण शाखा परिसराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आमंत्रित करण्यासाठी २४ जून रोजी, त्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी आमंत्रण दिले. जुने जळगाव परिसरातील शनिपेठ येथे ते आमंत्रण काँग्रेसच्या फलकावर देखील लिहिले गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वांना बोलाविणे हाच त्यामागील हेतू होता, असे तेथील संघ कार्यकर्त्यांनी महाएमटीबी सोबत बोलताना सांगितले.
 
 
दरम्यान राष्ट्रीय पातळीवर या संघटनांमध्ये मतभेद असले तरी देखील स्थानिक पातळीवर मात्र कुठलाही विरोध नसतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळाले. नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हजेरी लावली, त्यात वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळाल्या होत्या. जळगावच्या या घटनेने त्यात नवीन भर घातली आहे. यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, किंवा विरोध देखील दर्शवलेला नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@