चंद्रपुरच्या एव्हरेस्टविरांची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून चंद्रपुरच्या एव्हरेस्टविरांना कौतुकाची थाप


 
 
 
नवी दिल्ली : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर जगातील सर्वात उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणारे चंद्रपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले व या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
 
डोंगर कपारीत राहून काटक झालेल्या व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने थेट एव्हरेस्ट सर करणाऱ्या, या विद्यार्थ्यांनी आज आपल्या कतृत्वाने रायसिना हिल्स स्थित प्रशस्त व देशाची शान असणाऱ्या राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. मनीषा धुर्वे ,कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम आणि प्रमेश आडे या एव्हरेस्ट वीर विद्यार्थ्यांचा प्रचंड आत्मविश्वास पाहून राष्ट्रपतींनीही त्यांच्याशी मनमोकळया गप्पा मारल्या. या विद्यार्थ्यांचे एव्हरेस्ट सफरीतील विविध किस्से जाणून घेताना राष्ट्रपतींची मुद्रा गंभीर व भावूक होत असल्याचे आज राष्ट्रपती भवनाने अनुभवले. 
 
 
 
चंद्रपूर येथील ४८ अंश सेल्सिअस तापमानात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट वरील उणे ४५ अंश सेल्सिअस वातावरणात शिखर सर केले, ही कौतुकास्पद व अभिमानाची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले. हे सर्व विद्यार्थी अतिशय गरीब व हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत केवळ इच्छाशक्ती व धाडसाच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी करु शकले. त्यांची ही कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी कौतुकाची थाप दिली.
 
केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील व एव्हरेस्ट वारीसाठी निवड झालेले मात्र काही कारणास्तव एव्हरेस्ट सर करताना माघार घ्यावी लागलेले इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर, छाया आत्राम आणि आकाश मडावी हे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले.
 
 
आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्षमतांची ओळख करून त्यांना मोठी स्वप्न पाहण्याचे, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला. शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ‘आंतरिक सामर्थ्याची सिध्दी, अर्थात मिशन शौर्य’ या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व चंद्रपूर प्रशासनाच्या मदतीने चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेच्या ५० विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड केली. पुढे वेगवेगळ्या चाचण्यांनंतर अंतिम फेरीत १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली .
 
 
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांमधील उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी देशातील प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित केले. या खडतर प्रवासात अंतिमत: मनीषा धुर्वे, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, आणि प्रमेश आडे या ५ विद्यार्थ्यांनी १६ मे २०१८ रोजी एव्हरेस्ट सर करीत महाराष्ट्रासह, भारत देशाचे नाव इतिहासात कोरले. त्यांच्या या धाडसाची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली. 
 
 
प्रधानमंत्री मोदी यांची शुक्रवारी एव्हरेस्टवीर घेणार भेट 
 
राजधानीत आज राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेवून आशिर्वाद व मार्गदर्शन् घेतलेले हे विद्यार्थी, येत्या शुक्रवारी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच प्रधानमंत्री यांनी चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या एव्हरेस्ट चढाईचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधताना कौतूक केले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये प्रधानमंत्री मोदी यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@