कफपरेड : ‘सेंट्रलपार्क’मुळे भूमिपुत्रांवर गदा ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |




 

मुंबई : मुंबईतील कफपरेड येथे महानगरपालिका प्रशासनाने ‘सेंट्रलपार्क’ बनविण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पामुळे मासेमारी करणाऱ्या भूमिपुत्रांच्या व्यवसायावर गदा येणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी या उद्यानाच्या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली असून आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

 

कफपरेड येथील समुद्रात भराव टाकून सेंट्रलपार्क उभारण्याकरिता मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कामासाठी खोदण्यात येणार्‍या भुयारांमधून निघणार्‍या मातीसह इतर प्रकल्पांमधून येणारी माती व मुरुम वापरले जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने तयार केलेल्या मूल्यमापन अहवालाचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्यासाठी आणि निविदेचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आता महापालिकेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कार्यादेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निविदेचा खर्च ३.८७ कोटी इतका आहे.

 

कोस्टल रोडच्या बांधकामातून निघणारी माती वापरून कफ परेडमध्ये महापालिकेने तब्बल ३०० एकर जमिनीवर उभारल्या सेंट्रलपार्कसाठी भराव टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या परिसरात ५ वस्त्या असून त्यामध्ये २५००० लोक राहतात. या मच्छिमारांच्या सुमारे ४०० बोटी असून या उद्यानामुळे बोटी लावण्यासाठी जागेचा प्रश्न उपस्थित होणार आहे असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल सांगितले. १९८० साली कफ परेड येथे भराव टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु त्याला कफ परेडच्या मच्छिमारांनी तीव्र विरोध केला होता त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुंबईत इतरत्र भराव टाकण्याचा निर्णय घेतला होता असे त्यांनी सांगितले. तसेच, ही जागा पालिकेची नाही तर एमएमआरडीएची जागा आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या समुद्रातील मोठ्या लाटा दादर येथे चैत्यभूमी ,महापौर बंगला याठिकाणी धडकल्यामुळे त्यांचे नुकसान होते त्याप्रमाणेच थीमपार्क केल्यास येथेही हे मोठ्या प्रमाणावर होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

 

..तर कोस्टल रोडला विरोध

सेंट्रलपार्कमुळे या भागातील मच्छिमारांचे नुकसान होणार आहे. कोस्टल रोड केल्यासही नुकसान होणार आहे परंतु, मुंबईच्या विकासासाठी आम्ही कोस्टल रोडला आम्ही विरोध केला नाही. सेंट्रलपार्कमुळे भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा येईल. परंतु तरीही हा प्रकल्प राबविला तर आम्ही कोस्टल रोडला तीव्र विरोध करणार आहोत.

- दामोदर तांडेल , अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष

मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

कोळी मुंबईचे भूमिपुत्र आहेत .थीमपार्कमुळे त्यांना मासेमारीसाठी बोट उभा करायला जागाच मिळणार नाही. तसेच थीमपार्कमुळे खारफुटी नष्ट होणार आहेत त्यामुळे छोट्या माशांचे प्रजनन होणार नाही. यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

- प्रवीण तांडेल , उपाध्यक्ष सर्वोदय सोसायटी

@@AUTHORINFO_V1@@