आता उरलो प्लास्टिक पिशवीपुरता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |



 

आज प्लास्टिकच्या पिशव्यांवर बोलणारे राज ठाकरे गेले अनेक दिवस निरनिराळे विषय उचलून काहीतरी घडवायचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, लोकांचा त्याला प्रतिसाद मिळत नाही. सातत्याने केलेला अपेक्षाभंग हेच त्यामागचे खरे कारण आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नरेंद्र मोदींच्या विकासकामांचे गुजरात पर्यटन ते प्लास्टिकबंदी इथपर्यंत अनेक विषय काढण्याचा आणि ते चालविण्याचा राज ठाकरेंनी पुरेपूर प्रयत्न केला. पण, आता गंमत अशी की, या सगळ्या काळात एक करिश्माई नेता म्हणून राज ठाकरेंनी आपले माध्यमातले चाहते कायम राखले. वास्तवातले त्यांचे चाहते मात्र हळूहळू त्यांना सोडून गेले. नियतीचा काव्यगत न्याय असा की, ज्या दिवशी ते नरेंद्र मोदींच्या विरोधातले कार्टून काढत बसले होते, त्याचवेळी त्यांचे जळगावमधील नगरसेवक त्यांना सोडून चालले होते. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक फोडल्यानंतर वस्तुत: राज ठाकरेंना जाण येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याची फारशी दखल राज ठाकरेंनी घेतलेली दिसत नाही. जोरदार मुसंडी मारून वर आलेला पक्ष ते भ्रमनिरास करणारा पक्ष,’ असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्णन करावे लागेल.

 

वस्तुत: महाराष्ट्रात युतीचे सरकार आले तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंचा वारस म्हणून लोकांनी राज ठाकरेंकडे पाहायला सुरुवात केली होती. स्वत: राज ठाकरेदेखील भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून मराठी तरुणांमध्ये लोकप्रिय होते. महाविद्यालयीन राजकारणात जे काही घडते, त्याचे केंद्रबिंदूच राज ठाकरे होते. शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी जे काही केले, ते इव्हेंटम्हणून इतके देदीप्यमान होते की, लोकांनी राज ठाकरेंकडे मोठ्या अपेक्षेने पाहायला सुरुवात केली होती. खर्‍या नाट्यमय घटनांची बीजे ही इथेच रूजली जात होती. फरक एवढाच की, अद्याप उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांचा प्रवेश यात झाला नव्हता. अपेक्षित अनपेक्षितपणे तो नंतर झालाच! बाळासाहेबांनी आपल्या मुलाला शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्याची जबाबदारी खुद्द राज ठाकरेंनाच सोपविली. आता राज ठाकरेंची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. मात्र, तिथे कार्यकर्त्यांना या दोन्ही भावांनी जे काही दाखविले, त्याचे पितळ नंतर २००५-०६ साली उघडे पडले. विठ्ठल बडवेवगैरे टीका करीत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली.

 

हा सगळाच काळ मोदी व भाजपच्या राजकारणाच्या आधीचा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप अशा सर्वच पक्षांनी यावेळी आपल्या हद्दी निश्‍चित केल्या होत्या. महाराष्ट्राच्या चौकोनी राजकारणातला हा पाचवा कोन राज ठाकरेंनी निर्माण करण्यात यश तर नक्कीच मिळविले. मग राज ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळू लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला लोक कंटाळले होते. भारतीय राजकारणातल्या मोदीपर्वाला सुरुवात व्हायची होती. राज ठाकरे आपले कलाकाराच्या शैलीतून महाराष्ट्राच्या भविष्याचे चित्र रंगवायला लागले. एखादा चित्रकार जसा आपल्या मनातले चित्र कागदावर उतरवतो, त्याप्रमाणे राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला चित्रे दाखवायला सुरुवात केली. यात जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी होता. मराठीतून उत्तम शिक्षण होते, मराठी माणसासाठी उत्तम नोकर्‍या होत्या आणि न जाणे काय काय होते... या सगळ्याची एक ब्ल्यू प्रिंटही होती. मात्र, ती कधीच लोकांसमोर आली नाही. २००६ साली स्थापन झालेल्या या पक्षाला अनपेक्षित असे यश मिळत गेले आणि त्याच गतीने लोक हा पक्षही सोडून गेले. याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द राज ठाकरेच!

 

हत्तीची सगळी ताकद त्याच्या पायात असते, अशी एक म्हण आहे. सबकुछ राज ठाकरेअसलेल्या या पक्षाची मुख्य समस्याही राज ठाकरेच झाले. लोकांच्या अतोनात वाढविलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण न करू शकलेले राज ठाकरे हेच मनसेचे खरे स्वरूप होते. मात्र, ‘महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वेगळा आयाम देऊ शकणारा नेताम्हणून माध्यमांनी त्यांचे चित्र रंगविल्यामुळे तमाशा मात्र सुरूच होता. शिवसेनाही अखेर घराण्याचाच पक्ष असल्याने कुठल्याही घराण्याच्या पक्षात जे होते तेच झाले. अत्यंत नाट्यमय प्रसंगात उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरेंनी यातून घेतलेला बोध उत्तम होता. स्वत:चा पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केली व यश टिकवून ठेवले. लहानमोठ्या सत्ता त्यांच्याकडून शिवसेनेकडे गेल्या. मात्र, मुंबई महानगरपालिकेसारखी मोठी महानगरपालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहिली. आता भाजपने शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केलेले असले तरीही आजही महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात आहे. या उलट राज ठाकरेंचा घसरता क्रम सुरूच आहे. तो काही केल्या थांबायला तयार नाही. राजकीय चाहते काहीही स्वप्ने पाहात असले तरीही राजकीय कार्यकर्ते राजकीय पक्षात येतात ते राजकीय यश मिळविण्यासाठी आणि त्यातली धुंदी अनुभवण्यासाठी. राज ठाकरेंनी त्यांच्या आडनावामुळे ती पुरेपूर अनुभवली. मात्र, त्यांच्यासाठी निवडून आलेल्या लोकांना मात्र ती कधीच अनुभवता आली नाही. राजकीय भाषेतच बोलायचे तर रामदास आठवले, महादेव जानकर वगैरे लहान पक्षाचे लोक राजकीयदृष्ट्या अधिक चाणाक्ष निघाले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या सहवासात बरोबर नेले. इथे मात्र जे घडले ते उलटेच म्हणावे लागेल. ज्या चौकोनी राजकारणाच्या विरोधात जाऊन त्यांनी काम केले, त्याच चौकोनी राजकारणातल्या निरनिराळ्या लोकांबरोबर राजकारण करण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आहे. आपण कधी शरद पवारांची मुलाखत, अजितदादांचे कौतुक, मोदी-फडणवीसांची नक्कल अशाच कामात आता राज ठाकरे गुंतले आहेत. गेले अनेक दिवस राज ठाकरे निरनिराळे विषय हाताळायचे प्रयत्न करीत असले तरीही लोकांचा प्रतिसाद मात्र काही केल्या मिळत नाही. सातत्याने केलेला अपेक्षाभंग हेच त्यामागचे खरे कारण आहे.

@@AUTHORINFO_V1@@