समर्थ विचारांचा प्रभाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |




रामदासांनी जातीव्यवस्थेसाठी काय सुधारणा केल्या, असे विचारणे गैर आहे. त्यात कालविपर्यासाचा दोष आहे. महाराष्ट्रात जातिविशिष्ट समाजरचना पूर्वापार अस्तित्वात होती. आजही ती चालू आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात काही फरक पडत नाही.

समर्थकालीन समाजाचा महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता शिवरायांचा आणि रामदासस्वामींच्या विचारांचा विलक्षण प्रभाव त्या काळच्या जनमानसावर होता. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा विचार देऊन लोकांना त्यासाठी लढण्याची व दीन होऊन जगण्याऐवजी स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. मावळ्यांना हाताशी घेऊन स्वपराक्रमाने लोकांना एक नवी दिशा दाखवली, तर इकडे रामदासस्वामींनी बलोपासना, क्षात्रधर्माची महती सांगून लोकांना आश्‍वासित केले. नीतीवर आधारित स्वराज्य कल्पना समजावी म्हणून लोकांना हनुमानाची व श्रीरामाची उपासना सांगितली. तसेच स्वराज्यासाठी लागणारा स्वामीनिष्ठ मावळा तयार करायला मदत केली. स्वामींनी प्रत्यक्ष लढाई किंवा राजकारण केले किंवा नाही, त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य चळवळीत कितपत सहभाग होता, याबाबतीत विद्वानांत एकमत नाही. या मतमतांच्या गलबल्यात आता तरी पडण्याचे कारण नाही. काही जातीयवादी टीकाकारांनी स्वामींना ब्राह्मणांचे कैवारी ठरवून त्यांच्या विचारांचे, तत्त्वज्ञानाचे आसनच हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 

तथापि आजच्या राजकीय सौदेबाजीत जातीय द्वेषाचे भांडवल करून निवडणुका जिंकता येतात, असा एक मतप्रवाह आहे. लोकमान्य टिळकांनी फार पूर्वी एके ठिकाणी लिहिले आहे की, एखाद्या मतदारसंघात ज्या जातीचे आधिक्य असते, त्या जातीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा करावा लागतो आणि तोच निवडून येण्याची शक्यता अधिक असते. आजही तीच परिस्थिती आहे, परंतु शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांना एकसंघ चारित्र्यसंपन्न विश्‍वासू, स्वामीनिष्ठ असा समाज तयार करायचा होता. तसा समाज घडविण्याचे कार्य दोघांनीही आपापल्या परीने केले. रामदासांच्या राजकीय सहभागाचा विचार तूर्तास बाजूला ठेवला तरी सामाजिकदृष्ट्या रामदासस्वामींचा त्याकाळच्या जनमानसावर प्रभाव होता, हे नाकारता येत नाही. त्याला कारण स्वामींचे व्यक्तिमत्त्व तसे प्रभावी होते.

 

प्रखर बुद्धिमत्ता, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निःस्वार्थी वृत्ती, चारित्र्यसंपन्नता, तत्त्वज्ञान व धर्मनिष्ठा, बलोपासना, प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा उपदेश, निरपेक्ष संघटना चातुर्य इत्यादी गुणांमुळे त्यांच्याबद्दल तत्कालीन समाजात आदराची भावना होती. त्या काळात मुसलमानांच्या धाडी येत. विध्वंस, नासधूस, तरुण स्त्रियांना बळजबरीने पळवणे असले प्रकार चालू होते. या कृत्यांचा निषेध करणारा, क्षात्रधर्माची महती सांगणारा, हनुमान व श्रीरामाची भक्ती करायला सांगून त्याद्वारा धैर्य व चारित्र्य यांची शिकवण देणारा, प्रपंच विज्ञान सांगणारा एकमेव संत म्हणजे रामदासस्वामी होते. वारकर्‍यांनी स्वामींना धारकरी ठरवून त्यांना बाजूला ठेवले असले तरी वारकर्‍यांचे व महाराष्ट्राचे दैवत विठोबाबद्दल रामदास स्वामींना तितकाच आदर होता, पूज्यभाव होता. राम आणि विठ्ठल हे त्यांनी कधीच वेगळे मानले नाहीत. स्वामींनी पंढरपूरला भेट दिली त्यावेळी विटेवर उभा असलेला पांडुरंग पाहून त्यांना रामाची आठवण झाली. विठ्ठल त्यांना रामरूपच दिसला. विठ्ठल राम यांचा अद्वैत साक्षात्कार झाल्याने त्यांनी सरळ पांडुरंगाला विचारले-

येथे का तू उभा श्रीरामा ।

मनमोहन मेघश्यामा ॥

त्याच काव्यात तत्कालीन संदर्भ डोळ्यांसमोर येऊन त्यांनी व्यथा व्यक्त केली.

काय केले धनुष्यबाण । कर कटावरी ठेवून ।

कोठे गेला हनुमंत । येथे उभा पुंडलिक ॥

या ठिकाणी उपासनांमधला फरक नव्हता, तर त्यामागे मानलेल्या तत्त्वज्ञानाचा फरक होता, ही गोष्ट महत्त्वाची आहे. या ठिकाणी रामदासांना विठ्ठलभक्तीचा उपहास करायचा नव्हता, तर भगवंताच्या प्रत्येक अवताराचे प्रयोजन त्या त्या काळानुसार वेगळे असते, हे सांगायचे होते. प्रत्येक काळाला अनुसरून उपासना केली तर ती जास्त फलदायी होते. अखेरीस सारेजण त्याच एका परब्रह्माची उपासना करीत असतात. रामदास पंथभेदात अडकणारे नव्हते किंवा माझेच दैवत श्रेष्ठ, इतरांचे कनिष्ठ असे मानणार्‍यांपैकी नव्हते. त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वसामान्य हिंदू समाज होता. त्या समाजाला संरक्षण कसे मिळेल याची त्यांना चिंता होती. गिरिधर स्वामींनी ‘समर्थप्रताप’ या समर्थ चरित्रात लिहिले आहे की, दूरदूरच्या प्रांतातून लोक समर्थांना भेटायला चाफळला येत असत. त्यावेळी समर्थांच्या मनात हेच चाललेले असे की, यांचे हाल कसे कमी होतील. ते यासाठी कोणाकडे पाहात असतील?, ही जनसामान्यांविषयीची तळमळ त्यांच्या मनात होती.

 

हनुमान व श्रीरामाची उपासना लोकांना सांगून त्यांना धर्मरक्षणार्थ तयार करावे, त्यांना हनुमानाच्या ठिकाणी शौर्य, पराक्रम तसेच नम्रता व स्वामिनिष्ठा हे गुण प्रकर्षाने दिसत होते. रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतीत काही वीर हनुमान तर काही दास हनुमान आहेत. वीर हनुमान गदा उंचावून, शेपूट वर उचललेला आणि पायाखाली राक्षस चिरडणारा दाखवला आहे, तर दासमारुती हा हात जोडून रामाच्या आज्ञेची प्रतीक्षा करणारा स्वामिनिष्ठ असा आहे. हनुमानाच्या या तत्त्वज्ञानाचा तत्कालीन समाजात योग्य त्या प्रेरणा देण्यासाठी उपयोग झाला.

 

आपल्या धर्माच्या आणि देवदेवतांच्या रक्षणासाठी राजकारणात सहभागी झाले पाहिजे, ही क्रांती रामदासांच्या मनात तीर्थाटन करीत असताना झाली असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी लोकांना ‘मना श्रेष्ठ धारिष्ट्य जिवी धरावे,’ असे सांगितले, तेव्हा घाबरट लोकांना स्वतःची लाज वाटली असेल. क्षात्रधर्माची महती सांगताना ते म्हणतात, ‘मारिता मारिता मरावे । तेणे गतीस पावावे ।’ हे तत्त्व ज्यांच्या ठिकाणी भिनले होते ते बाजीप्रभू देशपांडे लढत लढत गेले. इतकेच नव्हे तर शीर धडापासून वेगळे झाल्यावरही लढत राहिले! स्वामींनी लोकांना सांगितले की, ‘सदाचार हा थोर सांडू नये तो ।’ तेव्हा काही लोकांना स्वतःची लाज वाटली असेल व ते सदाचाराकडे वळले असतील. स्वामींच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा प्रभाव तत्कालीन महाराष्ट्र समाजावर निश्‍चितपणे होता, असे म्हटल्यास त्यात गैर नाही.

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@