मुल्ला फजलुल्ला : दहशतीच्या एका पर्वाचा अस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |



 

फजलुल्लाचा जन्म पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात झाला. तेहरिक-ए-नफज-ए-शरीयत-ए-मोहम्मदचा सदस्य म्हणून फजलुल्लाने दहशतवाद्यांच्या दुनियेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘तेहरिक-ए-नफज-ए-शरीयत-मोहम्मद’चा शब्दश: अर्थ होतो, इस्लामी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले आंदोलन. तेव्हा, पाकिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करणे, हाच या संघटनेचा मूळ उद्देश होता.

 

अखेरीस दहशतीचा आणखी एक चेहरा इतिहासजमा झाला. पाकिस्तानी तालिबानने त्याच्या जागी एका नवीन नेत्याच्या नियुक्तीची घोषणा केली आणि त्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी जगासमोर कबूल केले की, त्यांचा प्रमुख म्होरक्या मुल्ला फजलुल्ला अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे. १३ जून रोजी फजलुल्ला त्याच्या चार अन्य कमांडोंसोबत सकाळी ११ वाजता एका वाहनातून प्रवास करताना अमेरिकेच्या ड्रोनने त्याच्यावर अचूक निशाणा साधला आणि फजलुल्लाला यमसदनी धाडले.

 

२३ जून रोजी जाहीर केलेल्या अधिकृत वक्तव्यात तेहरिक-ए-तालिबान-पाकिस्तानचा (टीटीपी) प्रवक्ता मोहम्मद खुरासानीने फजलुल्लाच्या मृत्यूची पुष्टी केली. हा तोच फजलुल्ला होतो, ज्याने पाकिस्तानमधील मुलींच्या शिक्षणहक्कांकरिता लढा देणाऱ्या मलाला युसुफझईवर २०१२ साली निर्घृणपणे गोळ्या झाडल्या होत्या. खुरासानीच्या या वक्तव्यावरूनही टीटीपीची धर्मांधता प्रतिबिंबित होते. कारण, त्यात तो निर्लज्जपणे म्हणतो की, “तेहरिक-ए-तालिबान-पाकिस्तानच्या सर्व नेत्यांनी काफिरांशी लढताना हौतात्म्य पत्करले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” या जाहीर वक्तव्यात हकीमुल्ला महसूद आणि बैतुल्लाह महसूद या फजलुल्लाच्या दोन पूर्वसुरींचाही समावेश आहे, जे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात असेच मारले गेले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, हकीमुल्ला महसूदच्या मृत्यूनंतर ७ नोव्हेंबर २०१३ रोजी फजलुल्लाला टीटीपीचा नवीन ‘अमीर’ (प्रमुख) म्हणून नियुक्त केले गेले. पण, त्याचबरोबर टीटीपीचे माजी प्रवक्ता एहसानुल्ला एहसानच्या मते, मुल्ला फजलुल्लाची टीटीपीच्या प्रमुखपदी नियुक्ती ही केवळ एका लकी ड्रॉच्या माध्यमातून झाली होती.

 

टीएनएसएम आणि निजाम-ए-अदल

 

फजलुल्लाचा जन्म पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात झाला. तेहरिक-ए-नफज-ए-शरीयत-ए-मोहम्मदचा सदस्य म्हणून फजलुल्लाने दहशतवाद्यांच्या दुनियेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘तेहरिक-ए-नफज-ए-शरीयत-मोहम्मद’चा शब्दश: अर्थ होतो, इस्लामी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले आंदोलन. तेव्हा, पाकिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करणे, हाच या संघटनेचा मूळ उद्देश होता. या संघटनेची स्थापना १९९२ मध्ये सूफी मोहम्म्द याने केली होती. दि. १२ जानेवारी २००२ साली पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी या संघटनेवर बंदी आणली आणि सूफी मोहम्मदला तुरुंगात डांबले. त्यानंतर सूफी मोहम्मदचा जावई असलेल्या मुल्ला फजलुल्लाने या संघटनेची धुरा सांभाळली. ही संघटना पाकिस्तान-अफगाणिस्तानचे सीमावर्ती क्षेत्र, विशेषत्वाने दीर, स्वात, मालकंद, दरगाई, चेनागईसह इतरही क्षेत्रांमध्ये सक्रिय होती. त्याचबरोबर शेजारच्या अफगाणिस्तानातील तालिबानचे समर्थनही या संघटनेला प्राप्त असल्यामुळे ‘पाकिस्तानातील एक सर्वात धोकादायक धार्मिक दहशतवादी समूह’ म्हणूनही ही संघटना तशी कुविख्यात. या संघटनेच्या प्रभावाचा इतका व्यापक परिणाम होता की, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अली जरदारींच्या सरकारला पाकिस्तानात एक अत्यंत मूलतत्त्ववादी, कट्टर कायदा पारित करणे भाग पडले.

 

पाकिस्तानी सरकारने १६ फेब्रुवारी २००९ रोजी मलकंद क्षेत्रात शरिया कायदा किंवा ‘निजाम-ए-अदल’ लागू करण्याची घोषणा केली. या कायद्याने मलकंद क्षेत्राला मध्ययुगीन मानसिकतेच्या दरीत जणू ढकलून दिले. या कायद्यान्वये, विवादात सहभागी संप्रदायांना न्यायालय शरिया कायद्यानुसार न्यायदान करते आणि पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाच्या मोबदल्यात सूफी मोहम्मदद्वारा प्रस्तावित युद्धविरामाची अंमलबजावणी करण्यास फजलुल्लाने सहमती दर्शविली.

 

रेडिओ मुल्ला

 

फजलुल्लाने २००६ साली खैबर-पख्तुनख्वाच्या स्वात खोऱ्यात एक बेकायदेशीर एफएम चॅनेल सुरू केले. या एफएमच्या माध्यमातून फजलुल्ला इस्लाममधील पाप-पुण्याच्या संकल्पना, पाश्चिमात्त्यांचा विरोध आणि जिहादी विचारधारेचा प्रचार-प्रसार करीत असे. ‘जिहाद’चे विखारी विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा फजलुल्ला प्रमुख स्त्रोत म्हणून वापर करू लागला आणि त्यामुळे तो ‘रेडिओ मुल्ला’ किंवा ‘मौलाना रेडिओ’ या नावानेही ओळखला जाऊ लागला. मोटारसायकल आणि ट्रकवर लावलेल्या मोबाईल ट्रान्समीटर्सवरून या रेडिओचे सिग्नल प्रक्षेपित केले जात होते. फजलुल्लाच्या रात्रकालीन रेडिओच्या प्रसारणादरम्यान निषिद्ध गोष्टींना नियमित स्वरूपात प्रतिबंधित केल्याची घोषणा केली जात असे. त्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या नावांचीही यादी जाहीर व्हायची आणि आदेशांची अवाज्ञा करणाऱ्यांचे शीर थेट धडापासून वेगळे केले जायचे.

 

काय आहे तेहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान?

 

२००७ मध्ये पाकिस्तानच्या आदिवासी क्षेत्रातील समान विचारधारेचे मिलिशिया (शस्त्रधारी किंवा लष्करी शिक्षण घेतलेल्यांचा समूह) बैतुल्ल्हा मेहसूदच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. नंतर विविध दहशतवादी संघटनांच्या आघाडीच्या स्वरूपात ‘तेहरिक-ए-तालिबान’ किंवा ज्याला ‘पाकिस्तानी तालिबान’ म्हणूनही ओळखले जाते, ते संघटन अस्तित्वात आले. वास्तविक, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेनजीकच्या फाटा आणि खैबर पख्तुन्ख्वा या आदिवासी क्षेत्रातील सक्रिय दहशतवादी समूहांची एक प्रमुख संघटना (अम्ब्रेला ऑर्गनायझेशन) आहे.

 

कोण आहे नूर वाली मेहसूद?

 

मुल्ला फजलुल्लाचा उत्तराधिकारी म्हणून मुफ्ती नूर वाली मेहसूदची नियुक्ती करण्यात आली. फजलुल्लाच्या मृत्यूनंतर लगेचच टीटीपीच्या केंद्रीय समितीच्या एका बैठकीत मुफ्ती नूर वालीची निवड करण्यात आली. ४० वर्षीय मेहसूद इस्लामचे गाढे अभ्यासक-जाणकार असून त्यांनी पाकिस्तानातील अनेक मदरशांमध्ये अध्ययन केले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तोंच्या हत्येला जबाबदार असलेल्या पाकिस्तान तालिबानचा नेता बैतुल्लाह मेहसूदच्या हाताखालीही काम केले आणि भुत्तोंच्या हत्याकांडावर आधारित एका पुस्तकाचेही लेखन केले. असे म्हटले जाते की, मेहसूदने १९९० च्या दशकात अफगाणिस्तानच्या उत्तरी आघाडीच्या विरोधात अफगाण तालिबानच्या वतीने युद्धात उडी घेतली आणि त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याविरोधी हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हा नवीन नेताही त्याच्या आधीच्या दोन कमांडर्स प्रमाणे मेहसूद आदिवासी जमातीशी संबंधित आहे, ज्यांचा उत्तर-पश्चिम पाकिस्तान आणि उत्तर-दक्षिण वजीरिस्तानच्या जिल्ह्यांवर विशेषत्वाने प्रभाव आहे. दोन्ही आदिवासी जिल्ह्यांना अफगाण तालिबान आणि त्यांचे सहयोगी हक्कानी नेटवर्कचाही गड मानला जातो. त्यामुळे मेहसूदचे हक्कानी नेटवर्कसोबत घनिष्ट संबंध असणे अगदी स्वाभाविक आहे.

 

फजलुल्लाच्या दहशतवादी कारवाया

 

फजलुल्ला हा एक क्रूर लढवय्या म्हणून कुविख्यात असून शांतिवार्तेच्या पूर्णपणे विरोधी भूमिकांचे त्याने वेळोवेळी समर्थन केले. पाकिस्तान तालिबानचा नेता म्हणून अनेक हल्ल्यांच्या योजना, दहशतवादी कटाचा तो मास्टरमाईंड. मलालावरील हल्ल्याचा वर उल्लेख केल्यानुसार, फजलुल्ला आणि तालिबानची भूमिका ही महिलांची साक्षरता आणि त्यांच्या अधिकारांविरोधी राहिली असून बुुरसटलेल्या विचारांची ती अभिव्यक्ती दर्शविते. २०१४ साली पेशावरच्या सैनिकी शाळेत बंदूकधारींनी निष्पाप मुलांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४८ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये १३२ मुलांचाच समावेश होतो आणि या निर्दयी हल्ल्याचा सूत्रधारही होता फजलुल्ला... साऊथ एशिया टेरेरिझम पोर्टलच्या आकडेवारीनुसार, टीटीपी आणि अन्य सशस्त्र समूहांच्या हिंसक कारवायांमुळे ७४८ नागरिक आणि सुरक्षाकर्मी मृत्युमुखी पडले आणि २०१२ साली जेव्हा या हिंसाचाराने कळस गाठला, तेव्हा तब्बल ३७३९ जणांना जीवाला मुकावे लागले होते.

 

अमेरिकेचे निर्बंध

 

मुल्ला फजलुल्लाच्या दहशतवादी कारवाया या फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपुरत्या मर्यादित नव्हत्या. २०१० साली अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये कारमधील बॉम्बहल्ल्याचा आरोपही याच संघटनेवर होता. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनुसार फजलुल्लाचे अल-कायदाशी घनिष्ट संबंध होते आणि टाइम्स स्क्वेअर हल्ल्याचा सूत्रधार फैसल शहजादला स्फोटके पुरविण्याचे आणि प्रशिक्षण देण्याचे कामही मुल्ला फजलुल्लानेच केले होते. म्हणूनच फजलुल्लाला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते व त्याच्यावर पाच दशलक्ष डॉलरचे बक्षीसही ठेवले होते.

 

निष्कर्ष

 

मुल्ला फजलुल्लाच्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यातील मृत्यूने पाकिस्तानी सरकार आणि तेथील माध्यमांनाही आता खोटेनाटे पसरविण्याचा आणि टीटीपीकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर स्प्रिंगबोर्डसारखा करून उलट पाकमध्येच दहशतवादी कारवाया करण्यासाठी होत असल्याचा अपप्रचार सुरू आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानात दहशतवाद पसरविण्यासाठी टीटीपीचा उपयोग भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’, तसेच ‘एनडीएस’ आणि अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा करत असल्याचा आरोपही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे पण, हे पाण्याइतकं स्पष्ट आहे की, टीटीपीला बळ देण्यामध्ये सर्वार्थाने ‘आयएसआय’ आणि पाकिस्तानातीलच कट्टरपंथी संघटनांची भूमिका सक्रिय राहिली आहे.

 

फजलुल्लाच्या खात्म्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा नवीन उर्जेसह सक्रिय झालेल्या अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या समूळ नाशाला बळ प्राप्त झाले आहेच. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधाच्या कारवाईला अधिकाधिक गती प्राप्त झाली आहे आणि त्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेच्या मध्य आणि द. आशियाच्या विशेष दूत एलिस वेल्स यांनी नुकतेच दिले. त्याचबरोबर पाकिस्तानी तालिबानमध्ये एक महत्त्वपूर्ण परिवर्तन होईल, अशी अपेक्षाही वर्तविली जात आहे. कारण, पाकिस्तानी तालिबानचे नेतृत्व पुन्हा मेहसूद आदिवासी जमातीच्या हाती आले आहे. फजलुल्ला मेहसूद आदिवासी समाजातील नसल्यामुळे त्याचे नेतृत्व अनेकांना फारसे रुचले नव्हते. तेव्हा, सद्यस्थितीत टीटीपीच्या अंतर्गतच जातीय तणाव निर्माण होऊन संघर्षाची ठिणगी पडू शकते. तेव्हा, आजघडीला पाकिस्तान तालिबानची स्थिती कमकुवत झाली असली तरी या संघटनेचे समूळ उच्चाटन हे पाकिस्तानच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही तितकेच अवलंबून आहे, हे कदापि विसरून चालणार नाही.

- संतोषकुमार वर्मा

[email protected]

(अनुवाद : विजय कुलकर्णी)

@@AUTHORINFO_V1@@