घेण्यावाचुन देणे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018   
Total Views |
 

 
 
‘सर, माझ्या बहिणीला AB+ रक्ताची गरज आहे. त्यासाठी या रक्तगटाच्या काही रक्तदात्यांचे संपर्क क्रमांक मला आपल्याकडून मिळु शकतील का ?’ फ़ोनवरुन एक तरूण माझ्याशी बोलत होता.
 
’आम्ही आपणास नक्कीच मदत करू. पण रक्तदात्यांचे संपर्क क्रमांक घेऊन पुढील सर्व सोपस्कार करण्यापेक्षा AB+ रक्तगटाचे तपासण्या वगैरे करुन तयार असलेले रक्तच आम्ही तुम्हाला देऊ शकतो की.’ मी या तरुणाला माहिती दिली.
 
’अच्छा. हो का ? मग मी जरा डॉक्टरांना एकदा विचारुन तुम्हाला पुन्हा फ़ोन करतो.’ त्या तरुणाने प्रतिक्रिया दिली. मीही ’नक्की फ़ोन करा’ असे सांगत त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
 
कमी-अधिक फरकाने साधारणपणे याच प्रकारचे अनेक फोन आजवर मला आलेले आहेत. त्यातील अनेकजण नंतर जनकल्याण रक्तपेढीतून आवश्यक ते रक्तघटक घेऊनही गेले आहेत. रक्तसंक्रमण या विषयाशी सर्वसामान्य व्यक्तीचा क्वचितच संबंध येत असल्याने जेव्हा आपल्या जवळच्या कोणाला तरी रक्त द्यायचे असते तेव्हा त्या रक्तगटाचा रक्तदाताच शोधायला हवा, अशी त्या व्यक्तीची ठाम समजूत असते. अर्थात यात काही चुकीचे आहे असे मुळीच नाही. परंतु एखाद्या रुग्णास रक्ताची गरज उत्पन्न झाल्यानंतर त्या गटाच्या व्यक्तीचा शोध घेण्यापेक्षाही सर्व रक्तगटांचे रक्त आधीच उपलब्ध असणे हे अधिक हितावह नाही का ? रुग्णाचे आरोग्य व त्यांच्या नातलगांची सोय या दोन्ही दृष्टीने विचार करता, म्हणजेच रुग्णाचे शारीरिक अस्वास्थ्य व त्याच्या नातलगाचे मानसिक अस्वास्थ्य या दोन्हीसाठी ’ऐन वेळी रक्तदात्यांना बोलावण्याची वेळ येणे’ हे निश्चितच गैरसोयीचे आहे. पण बहुतेक ठिकाणी हे असेच चालते हे मात्र वास्तव आहे. बऱ्याचदा तर आवश्यक असलेल्या रक्तगटाचे रक्त रुग्णालयात उपलब्ध असतेही. तरीदेखील रुग्णाच्या नातलगांना ’काही रक्तदाते लागतील’ असे सांगितले जाते. मग हे रक्तदाते कोणत्याही रक्तगटाचे (किंवा त्यावेळी तेथील रक्तपेढीने मागणी केल्यानुसार विशिष्ट गटांचे) असु शकतात. याचे कारण इतकेच असते की, तेथील रक्तकोषामध्ये काही भर पडली पाहिजे. अर्थात या निमित्ताने काही जणांनी पुढे येऊन रक्तदान करणे हे चांगलेच असले तरी संबंधित रुग्णाच्या नातलगांना मात्र याकरिता खूप धावपळ करावी लागते हेही नक्की. त्यात हा रुग्ण बाहेरगांवचा असेल तर आणखी पळापळ.
 
काही वेळा डॉक्टरांकडुनच ’फ्रेश ब्लड’ लागणार आहे, म्हणून तातडीने अमुक गटाचे रक्तदाते बोलवा’ असे सांगितले जाते. काही अपवादात्मक प्रसंगी ’अगदी नजिकच्या काळात संकलित झालेले रक्त’ देणे हे रुग्णाच्या दृष्टीने हिताचे ठरु शकते हे खरे असले तरी ’रक्तदात्याचे रक्त काढा आणि लगेच रुग्णाला द्या’ असे मात्र आता होऊ शकत नाही. बऱ्याच चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे रक्तसंक्रमण दाखविले गेलेले असल्यानेही ’रुग्णाला अशाच प्रकारे रक्त दिले जात असावे’, असा समज कदाचित लोकांच्या मनात पक्का झाला असावा. काहीही असो, मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, रक्त संकलित झाल्यानंतर त्यावर एच.आय.व्ही., काविळ (बी आणि सी), मलेरिया, गुप्तरोग असे संसर्ग शोधण्यासाठीच्या चाचण्या या कराव्याच लागतात. शिवाय त्यानंतर संकलित झालेल्या रक्ताचे विघटनही करावेच लागते. कारण विघटन न करता दिल्या गेलेल्या संपूर्ण रक्तापेक्षा आवश्यक तेवढाच रक्तघटक रुग्णाला दिला जाणे हे केव्हाही हिताचे, असा तर आधुनिक वैद्यकशास्त्राचा अनुभवसिद्ध निर्वाळा आहे. रक्ततपासणी आणि विघटनाबरोबरच रक्तगट आणि रक्तजुळवणी याही गोष्टी महत्वाच्या आहेत. ’गट समान आहेत पण रक्तजुळवणी होत नाही’ असेही काही वेळा होऊ शकते. अशा वेळी त्याच गटाच्या दुसऱ्या रक्ताची जुळवणी करावी लागते. या सर्व गोष्टींसाठी वेळ द्यायला हवा असतो. यातली कुठलीही पायरी गाळुन चालत नाही. म्हणूनच रुग्णाच्या गरजेसाठी ऐन वेळी रक्तदाते बोलावले गेले तर ते निश्चितच गैरसोयीचे ठरु शकते आणि केवळ एखाद्या रक्तपेढीत नवीन रक्ताची भर पडावी म्हणून करायला सांगितलेले रक्तदान हे रुग्णाच्या आधीच्या मनस्तापातही भर ठरु शकते.
 
जनकल्याण रक्तपेढीचे हे वैशिष्ट्य राहिलेले आहे की, रुग्णाला – म्हणजेच रुग्णाच्या नातलगाला कुठल्याही रक्तगटासाठी अथवा रक्तघटकासाठी कधीही ’बदली रक्तदान’ (replacement donation) करायला सांगितले जात नाही. याचे एकमेव कारण म्हणजे वर्षातील प्रत्येक महिन्यात आणि प्रत्येक दिवशी सर्व रक्तगट आणि सर्व रक्तघटक कायम उपलब्ध राहतील यासाठी केले गेलेले नियोजन. वर्षभरात ’रक्तदान शिबिर नाही’ असे दिवस फार थोडे असतात. त्यामुळे जवळपास रोजच नवनवीन रक्ताची भर रक्तपेढीमध्ये पडत जाते. त्यांच्या तपासण्या, विघटन हे चक्रही अविरत चालु राहते. परिणामी येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आवश्यक असणारे रक्तघटक कुठल्याही धावपळीविना सहजपणे उपलब्ध होतात. अर्थात हे सर्व होऊ शकण्यामागचे खरे नायक हे सातत्याने रक्तदान करत राहणारे रक्तदाते आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करणारे संयोजक हेच आहेत, हे नि:संशय. बऱ्याचदा असाही अनुभव येतो की, एखाद्या रुग्णासाठी रक्ताची गरज आहे म्हणून रुग्णाचा नातलग आपल्या सोबतच काही तरुणांना घेऊन येतो आणि ’आमच्या रुग्णासाठी अमुक गटाचे हे रक्तदाते आणले आहेत, यांचे रक्त घ्या’ असे सांगतो. परंतु अशाही वेळी आमच्याकडील एखादे डॉक्टर त्यांना व्यवस्थित समजावून सांगतात की, ’आपल्या रुग्णाला लागणारे रक्त आमच्याकडे उपलब्ध असल्याने आपण लगेचच रक्तदान करण्याची आवश्यकता नाही. मात्र नंतर कधीही आपल्या सवडीने रक्तदान मात्र अवश्य करा आणि तेदेखील इथेच करायला हवे असे नाही तर आपल्या सोयीने अन्य कोणत्याही रक्तपेढीमध्ये आपण ते करु शकता. रक्तदान महत्वाचे, रक्तपेढी नाही.’ सिंगल डोनर प्लेटलेट (SDP) सारखा रक्तघटकदेखील – जो मिळविण्यासाठी रक्तदाते विशेष तयारीचे असावे लागतात – कुठल्याही बदली रक्तदानाची अपेक्षा न ठेवता इथे वर्षभर उपलब्ध राहील याची काळजी घेतली गेलेली आहे. असे होण्यासाठीही सुमारे पाचेकशे प्लेटलेटदाते जनकल्याण रक्तपेढीशी जोडले गेले आहेत, जे सातत्याने आणि निरपेक्ष भावनेने आपले दानाचे कर्तव्य बजावीत असतात.
 
रक्तदाते, प्लेटलेटदाते आणि शिबिरसंयोजक हे समाजातील सर्व श्रेणींचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. यात आय.टी. व्यावसायिक आहेत, महाविद्यालयीन तरुण आहेत, सामाजिक संस्था आहेत, गृहसंकुले आहेत, धार्मिक संघटना आहेत – यातील सर्वजण एका शुद्ध भावनेने प्रेरित आहेत. कुणा अज्ञात रुग्णाला त्याच्या गरजेच्या वेळी आवश्यक तो रक्तघटक सहजपणे मिळावा आणि त्याचे सात्विक समाधान आपणास मिळावे, ही ती शुद्ध भावना आहे. ही शुद्ध भावना आणि त्या भावनेपोटी घडणारी रक्तदानाची कृती हजारो रुग्णांना ’घाबरु नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे मूक आश्वासन देते आहे.
 
कुठल्याही ’घेण्यावाचून देणे’ सातत्याने शक्य होते, हे आमचे कर्तृत्व नव्हे तर त्यामागे उभ्या असलेल्या या आश्वासक जनशक्तीचे मोठेपण आहे.
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@