‘सारथी’च्या माध्यमातून रोजगाराबरोबरच मानव संसाधन निर्मिती निश्चित होईल - मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |


 
 
 
पुणे : छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ ही संस्था निश्चितपणे महत्त्वाची भूमिका पार पाडेल आणि रोजगाराबरोबरच मानव संसाधनाची निर्मिती करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
 
सेनापती बापट मार्गावरील बालचित्रवाणीच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर सिंबायोसिसच्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते.
 
 
 
 
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार भीमराव तापकीर, आमदार विजय काळे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, सारथी समितीचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार, सदस्य सचिव उमाकांत शेरकर आदी उपस्थित होते.
 
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआयएसएसएमएस कॅम्ससमधील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपल्या संस्थानामध्ये वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, शिक्षण आणि रोजगार हेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठीचे महत्वाचे घटक आहेत. मानवसंसाधन आणि ज्ञान हेच २१ व्या शतकाचा मंत्र असून मराठा समाजाला मानव संसाधनात परावर्तीत करण्यासाठीच “सारथी”ची निर्मिती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. एका बाजूला राज्यकर्ता समाज आणि दुसऱ्या बाजूला समाजाचा मोठा वर्ग आर्थिक आणि सामाजिक रुपाने मागासलेला आहे. त्यामुळेच समाजात अस्वस्थता असणे हे स्वाभाविक आहे. मराठा समाजात शिक्षण, रोजगार रूजत नाही, समाज नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाची निर्मिती केली. न्यायमूर्ती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शिक्षण आणि रोजगार हेच आरक्षणाचे उद्दिष्ट असते, सारथीच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून अनेक मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रोजगार आणि स्वयंरोजगारावर भर देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरूज्जीवन राज्य शासनाने केले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
शाहू महाराजांच्या स्वप्नातील युवक घडविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकामुळे जगभरात भारताची नवी ओळख निर्माण होईल. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगडाची पुननिर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना एकत्र करून पुढे जाण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नातील समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले, मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्व जिल्ह्यात शासकीय वसतिगृह निर्माण करण्यात येत आहे. मराठा समाजाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्री मंडळाच्या उपसमितीची निर्मिती करण्यात आली आहे. या उपसमितीला निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या हितासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शाहू महाराजांच्या जयंती दिनी ही संस्था कार्यान्वित होत आहे, याचा अधिक आनंद आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, सारथी संस्थेची उद्दिष्टे, ही छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत होती. बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका सारथीच्या माध्यमातून राज्य शासनाने घेतली आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. मराठा समाजाचे प्रश्न कालबध्द पध्दतीने सोडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रास्ताविक भाषणात डॉ. सदानंद मोरे म्हणाले, मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सारथी संस्था राज्य शासनाने स्थापन केली आहे. कुणबी, मराठा आणि शेतकरी समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नत्ती करण्यासाठी ही संस्था कायम कटीबध्द राहील.
यावेळी “सारथी” संस्थेच्या निर्मितीची आणि उद्दीष्टांबाबतची चित्रफित दाखविण्यात आली. उपस्थितांचे आभार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी मानले.
सारथी : ठळक वैशिष्ट्ये - 

· मैसूर येथील कुशल कारागिरांनी बनविलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काष्टशिल्पाचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले.
· सारथी संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले.
· सेनापती बापट रोड, पुणे येथील 'बालचित्रवाणी' इमारतीमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) कार्यालय कार्यान्वित.
· इमारतीचे क्षेत्रफळ - सुमारे ३९२ चौरस मीटर.
· दुमजली इमारत - दोन्ही मजल्यावर प्रत्येकी ११ खोल्या म्हणजेच एकूण २२ खोल्या.
· इमारतीत ३० ते ३५ आसनक्षमतेचे सभागृह, व्यवस्थापकीय संचालक, निबंधक यांचा कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय व स्वच्छतागृहांची सोय.
· एकूण १०० कर्मचारी व अधिकारी यांची बैठक व्यवस्था.
· सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांना एम.फील व पीएचडी साठी शिष्यवृत्ती देण्यात येणार.
· विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत मोफत देण्यात येणार.
@@AUTHORINFO_V1@@