व्यापारयुद्धामुळे गुंतवणूकदार चिंतेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

चीनमधून आयात मालावर अमेरिकेने लादले जबर शुल्क, चीनचेही प्रत्युत्तर
अमेरिकेला खरी भीती चीनकडून तंत्रज्ञान लाटले जाण्याचीच....

 
 
संरक्षणवादामुळे अखेर अमेरिकेचे नुकसानच
भारतीय रुपयाचे विक्रमी अवमूल्यन शक्य
अमेरिका व चीनदरम्यान सुरु झालेल्या व्यापार युद्धामुळे जगातील गुंतवणुकदार चिंतेत पडले आहेत. अमेरिकेने चीनमधून आयात होणार्‍या मालावर जबर शुल्क (हेवी इंपोर्ट ड्युटी) आकारल्याने चीननेही त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन मालावर शुल्क आकारणी केलेली आहे. तसेच विकसनशील देशातील बाजारपेठांना मजबूत डॉलर, अमेरिकन फेडरल बँकेचे वाढीव व्याजदर तसेच सर्वसमावेशक जागतिक नाणे धोरणाला अमेरिकेने दिलेली सोडचिठ्ठी यांचा चांगलाच फटका बसणार आहे. वस्तुत: अमेरिकेला खरी भीती आहे ती चीनकडून आपले प्रगत तंत्रज्ञान लाटले जाण्याचीच..
 
 
तसे झाले तर चीन अमेरिकेला ‘लय भारी’ पडण्याची शक्यता राहणार आहे. तो अमेरिकेलाही मागे टाकूत जगातील इकॉनॉमिक सुपरपॉवर (आर्थिक महाशक्ती) बनू शकतो. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्येच अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या व्यापार कार्यालयाला चीन हा अमेरिकन तंत्रज्ञान कसे आत्मसात करु पाहत आहे यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार चीन हा त्याच्या देशातील तसेच अमेरिकेतील अमेरिकन कंपन्यांच्या माध्यमा तून तंत्रज्ञानाचे हस्तांतर करवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले होते. चीनच्या या आक्रमक धोरणामुळे अमेरिका हादरली आहे.
 
 
त्याचाच एक परिणाम म्हणून ट्रंप यांनी चीनमधून आयात करण्यात येणार्‍या १३०० विविध वस्तूंवर ५० अब्ज डॉलर्सचे शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या मालात रसायनांपासून जेट विमानांचे सुटे भाग, औद्योगिक उपकरणे, यंत्रे, दूरसंचार उपग्रह, विमानांचे भाग, वैद्यकीय उपकरणे, ट्रक्स तसेच हेलिकॉप्टर्स, अण्वस्त्र सामग्री, रायफल्स, बंदुका आणि तोफा यांचा समावेश आहे.
 
 
 चीननेही याला तोडीस तोड म्हणून अमेरिकेतून आयात होणार्‍या मालावर शुल्क लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच या व्यापार युद्धाचा बिगुल वाजू लागलेला आहे.
 
 
यावर काहींनी सवाल केला आहे की, अशा प्रकारे अडथळे (बॅरिअर्स) उभारुन अमेरिका आपली स्पर्धाक्षमता कायम राखू शकतो काय? याचे उत्तरही तयार असून ते नकारात्मकच आहे. वस्तुत: चीनला अमेरिकन तंत्रज्ञानाची गरज असली तरी अमेरिका मात्र चीनवर अवलंबून नाही. मार्च २०१८ अखेरीपर्यंत चीनवरील अमेरिकेचे कर्ज एक ट्रिलियन १९ अब्ज डॉलर्स इतके आहे. तरीही चीनचे पारडे जडच आहे. कारण चीनने जर आपल्यावरील कर्जाच्या बोज्याचा काही भाग विकण्याची धमकी दिली तर अमेरिकेचे व्याजदर वाढून अर्थव्यवस्थेची गती थंडावणार आहे. याचाच अर्थ असा की, केवळ संरक्षणवादा(प्रोटेक्शनिझम)वर भर दिल्याने अमेरिकेलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जागतिक व्यापार संघटने (डब्ल्युटीओ)ला धाब्यावर बसविण्याच्या प्रयत्नामुळे शुल्क वाढीस उत्तेजन मिळून या संरक्षण वादापोटी अमेरिकेच्या मालाची निर्यात ठप्प होणार आहे. जगातील या सर्वात मोठ्या दोन्ही अर्थव्यवस्थांनाही त्याची झळ बसणार असून अमेरिकेला चीनच्या बाजारपेठेत अधिक वाव मिळणार तर नाहीच, शिवाय चीनलाही अमेरिकेत गुंतवणूक करणे अवघड जाणार आहे.
 
 
योगाचार्य रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ या एफएमसीजी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने मोठ्या प्रमाणावर (सुमारे ५० हजार) नोकर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने म्हटल्यानुसार याच महिन्यात या जागा भरल्या जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ४० ते ५० सेल्समनच्या जागा भरल्या जातील. ते कंपनीद्वारा तयार करण्यात येत असलेले अन्नपदार्थ उदा. आटा, तांदूळ, ज्यूस, खाद्य तेल, बिस्किटे आदी माल घरोघर पोहोचवणार (होम डिलिव्हरी) आहेत. तसेच त्या मालाची जागेवर विक्रीही करतील. यादृष्टिने त्यांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असून एफएमसीजी क्षेत्राचा किमान एक ते दोन वर्षे अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. भारतीय रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत असून ते थोपविण्यासाठी भारतीय रिझर्व बँक विदेशी चलन बाजारात काही प्रमाणात हस्तक्षेपही करीत आहे. पण डॉलरची सतत वाढत जाणारी किंमत ही रिझर्व बँकेची डोकेदुखी ठरलेली आहे. तरीही बँक डॉलर्सची खरेदी करण्यासह अनेक उपाययोजना करीत आहे. किमान रुपयाचे अवमूल्यन एकदम न होऊ देता ते थोडे संथपणे होत जाईल या दृष्टिने बँक प्रयत्नशील राहणार आहे. रुपयाला ६६ रु. प्रति डॉलर या किंमतीवर प्रतिकार असून ६८ रु. १० पैशांपर्यंत आधार आहे. हा आधार तुटल्यास रुपयाचे आणखी अवमूल्यन होत जाऊन त्याची विक्रमी पातळीवरील घसरण होणार आहे. ती प्रति डॉलर किमान ६९ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंतही होऊ शकते असे भाकित तज्ञांनी केले आहे. ती रुपयाची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत राहणार आहे.
 
शेअर बाजार घसरला, दोन्ही निर्देशांकात घट
गेल्या शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार वधारल्यानंतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मात्र तो घसरला. त्याच्या दोन्ही महत्वाच्या निर्देशांकात लक्षणीय घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) शुक्रवारच्या बंद ३५ हजार ६८९ बिंदूंवरुन सकाळी ३५ हजार ७८३ बिंदूंवर उघडत ३५ हजार ८०६ बिंदूंच्या उच्च तर ३५ हजार ४३० बिंदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) शुक्रवारच्या बंद १० हजार ८२१ बिंदूंवरुन सकाळी १० हजार ८२२ बिंदूंवर उघडून १० हजार ८३१ बिंदूंच्या वरच्या तर १० हजार ७५३ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन परतला. दिवसअखेरीस सेन्सेक्स २१९ बिंदूंनी घटून ३५ हजार ४७० बिंदूंवर तर निफ्टी ५९ बिंदूंनी कमी होऊन १० हजार ७६२ बिंदूंवर बंद झाला. सोन्याच्या किंमतीत ९६ रुपयांची वाढ होऊन ते ३० हजार ७०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@