मराठा विद्यार्थ्यांसाठी औंध आयटीआयमध्ये वसतिगृह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी 


 
 
 
पुणे : मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्फत पुण्यात सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथील वसतिगृहाच्या इमारतीची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट देऊन पाहणी केली. इमारतीची पाहणी करून येत्या महिनाभरात हे वसतिगृह सुरू करण्याचे निर्देश पाटील यांनी यावेळी संबंधितांना दिले. 
 
मराठा समाजाच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. पुण्यात सध्या ‘सारथी’ संस्थेच्या अंतर्गत पुण्यातील औंधमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील इमारतीत मुलींसाठी हे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. सुमारे ४५० चौमी क्षेत्रफळात ही इमारत असून सध्या येथे ९ खोल्या निवासासाठी उपलब्ध आहेत. तसेच वसतिगृह अधीक्षकांसाठी एक, जेवणाच्या हॉलसाठी एक खोली उपलब्ध आहे. तसेच ८ स्वच्छतागृहे व ८ स्नानगृहे आहेत. सुमारे ५० मुलींच्या राहण्याची येथे व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी पलंग, गादी, टेबल खुर्ची आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
 
या इमारतीची पाहणी महसूलमंत्री पाटील यांनी आज केली. वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच या परिसरातच लवकरच मुलांसाठीही वसतिगृह सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@