अनधिकृत बांधकामासंबंधी उच्च न्यायालयाचा मनपाला इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : "नवीन नाशिकमधील घरांच्या अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण काढताना कायद्याची चौकट मोडू नका,” अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नाशिक महानगरपालिकेला सुनावले आहे. नवीन नाशिकमधील २५ हजार घरांना केवळ लाल फुल्या मारून तीच अंतिम नोटीस समजून अतिक्रमण हटविण्याच्या नाशिक महापालिकेच्या निर्णयाविरोधात नाशिक पश्चिमेच्या आ. सीमा हिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्या. शंतनू खेमकर व न्या. नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी करीत मनपाला कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिल्याने तूर्तास नवीन नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 

मे महिन्यात नाशिक महापालिकेकडून नवीन नाशिकमधील २५ हजार घरांचे वाढीव बांधकाम अनधिकृत ठरवून त्यावर लाल रंगाच्या फुल्या मारण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला स्थानिक नागरिकांसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यासह अनेक संघटना व संस्थांनी विरोध केला होता. त्याला अनुसरून आ. हिरे यांनी याविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईला स्थगिती मिळवली होती. मात्र मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत स्पष्ट आदेश नसल्याचे म्हणत कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. अखेर आ. हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. न्या. शंतनू खेमकर व न्या. नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अॅ्ड. संजीव गोरवाडकर यांनी बाजू मांडली.

 

मनपा कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाईपूर्वी नागरिकांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मात्र नवीन नाशिकच्या बाबतीत मनपाने कारवाई सुरू करून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा आ. हिरे यांच्या वतीने करण्यात आला. मनपाच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. मात्र न्यायालयाने महापालिकेचा युक्तिवाद फेटाळून लावत अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने कायद्याचे पालन करावे, असे निर्देश दिले आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

बाजू मांडायला संधी मिळणार!

 

न्यायालयाचा निर्णय अंतिम असून न्यायालयाने महापालिकेची भूमिका चुकीची व अन्यायकारक असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नवीन नाशिककरांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.

आ. सीमा हिरे
@@AUTHORINFO_V1@@