वटसावित्रीचे व्रत:नवीन वैज्ञानिक दृष्टिकोनातून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

 

 

कोण ही सावित्री? कोण हा सत्यवान? कोण हा अश्वपती? आणि कोण द्युमत्सेन? कुठे आला हा मंद्र देश? त्याचा आणि आमचा आज काय संबंध? आज या गोष्टीचं काही स्वारस्य उरलं आहे का? आपल्या पतीदेवांचं आयुष्य वाढो, त्यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून आजही वडाला फेर्‍या घालाव्यात का? चला ही गोष्ट नव्याने वाचू आजच्या वटपौर्णिमे दिवशी.

 

मद्र देशाचा एक राजा होता. त्याचं नाव होतं अश्वपती. अश्वपतीची मुलगी सावित्री. तिने द्युमत्सेनाच्या मुलाला, सत्यवानाला वरलं. सत्यवान लग्नानंतर एका वर्षात मरण पावणार हे माहीत असूनही. याच सावित्रीने नंतर सत्यवानाला मृत्युमुखातून बाहेर काढलं. सध्या कुठल्याही गोष्टीचं नीट आकलन होण्यासाठी आपण वेगवेगळे तक्‍ते वापरतो. आपले पूर्वज आपली माहिती व ज्ञान चित्ररूपात, कथारूपात जतन करून ठेवत होते. चित्ररूपात रुपांतरित केलेल्या त्या माहितीचं ‘डिकोडिंग’ ही तितकंच आवश्यक आहे. कोण हा राजा अश्वपती? अश्व म्हणजे घोडा. घोडा हे वेगाचं आणि प्रचंड ताकदीचं प्रतीक मानलं गेलं आहे. आजही आपण अश्वशक्ती हे शक्ती मोजायचं परिमाण म्हणून वापरतो. सूर्यप्रकाशाचा प्रचंड वेग जाणून आपल्या पूर्वजांनी वेगाला चित्ररूप आणि कथारूप देताना सूर्यप्रकाशाचा प्रचंड वेग चौखूर उधळलेल्या सात अश्वांनी दाखवला. सूर्याच्या रथाचे सात श्वेत अश्व हे पांढर्‍याशुभ्र सूर्यकिरणांचं प्रतीक आहेत. सूर्यप्रकाश सात रंगांचा बनला आहे, हे सांगण्यासाठी सात अश्व. हे सात रंग एकत्रित येऊन पांढरा रंग बनतो म्हणून हे सातही अश्व पांढरेशुभ्र आहेत. या सप्तरंगी किरणरूपी अश्वांचा मालक अश्वपती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यच आहे. सूर्य आणि त्याचे किरण किंवा सूर्य आणि त्याचा प्रकाश हे एकमेकांपासून वेगळे कसे असू शकतील? हा अश्वपती मंद्र देशाचा म्हणजे ईशान्येचा मालक जिथे भारतात सूर्य प्रथम उगवतो.

 

अश्वपती सूर्याला सवितृ म्हणतात. म्हणजे असंख्य असंख्य किरण असलेला. सावित्रीचा अर्थच सूर्यकिरण. तीच ही अश्वपतीची मुलगी सावित्री. गोष्टीमध्ये सावित्री देवीच्या नवसाने झालेली मुलगी म्हणून तिचे नाव सावित्री ठेवल्याचा उल्लेख आहे. सावित्रीदेवी म्हणजे ब्रह्माणी. ज्या ब्रह्मदेवाने सर्व जीवसृष्टीची निर्मिती केली त्याची पत्नी. म्हणजे निर्मितीची देवता. सूर्यामुळेच आज पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी निर्माण झाली त्या सौरऊर्जेचे प्रतीक ही सावित्री. अजून एक राजा होता पृथ्वीवर द्युमत्सेन नावाचा. ‘द्यु’ म्हणजे दिवस, प्रकाश. द्युमत्सेन म्हणजे प्रकाशमान, कीर्तिमान, पराक्रमी इ.इ. असा हा पराक्रमी राजा आंधळा झाला. डोळे बिघडले म्हणजेच माणूस आंधळा होतो असं नाही तर तो अज्ञानाने, अहंकाराने, अतिलोभानेही अंध होतो. मग त्याला योग्य काय अयोग्य काय, ते कळत नाही. त्यातच त्याची घसरगुंडी चालू होते. या अंध द्युमत्सेनालाही त्याच्या शेजारी राजाने हाकलवून लावलं. आपल्या पत्नी मुलासह तो जंगलात राहू लागला. त्याचाच मुलगा सत्यवान. सत्याचं आचरण असलेला. नेकीने काम करणारा. आपल्या कहाणीतील सत्यवान एकेकाळी ऐश्वर्यसंपन्न असलेल्या राजाचा पुत्र. एका पिढीने डोळसपणाने वागलं नाही की दुसर्‍या पिढीवर काय संकट येतं त्याचीच ही कहाणी. साम्राज्य गमावलं आणि काहीही हाती न राहिलेल्या सत्यवानावर आपल्या मागील पिढीचा आणि वर्तमान पिढीचा सांभाळ करायची जबाबदारी येऊन पडली. सत्यवान सत्याच्या मार्गाने चालणारा, पण जंगलात राहून नवीन तंत्रज्ञानाची माहिती नसलेला आदिवासी. या गोष्टीतील सत्यवान हे पात्र जंगलात राहून वृक्षतोड करणे, वनजमिनीचा कस घालवणारी कामे करणार्‍या सर्वांचं प्रतीक आहे.

 

आत्तापर्यंत कुठल्याही पुराणात राजाने आपल्या मुलीला (सावित्री सोडून) असं देशोदेशी वरसंशोधनाला पाठविल्याचा उल्लेख नाही. पण सावित्रीच ती. सूर्याचा किरण सूर्याला स्वतःभोवती थोडाच गुंडाळून ठेवता येतो? पृथ्वीवर कुठेही पोहोचायची क्षमता त्याच्यात आहे. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेली, ब्रह्माणीचा अंश असलेली सावित्री, सौरऊर्जेचं महत्त्व जाणणारी सावित्री वर शोधायला निघाली. अनेक समृद्ध राज्य सोडून तिने वनात राहून कशीबशी उपजीविका चालविणार्‍या सत्यवानाचीच निवड केली. सत्यवानाला या नव्या सौरऊर्जेच्या तंत्रज्ञानाची गरज जास्त होती. नारदमुनींनी सत्यवानाची म्हणजेच या आदिवासी लोकांचे चुकीच्या मार्गाने शेती करण्याचे, वनसंपदेचा नाश करण्याचे काम पाहूनच हे फार काळ टिकू शकणार नाही आणि सत्यवान जेमतेम वर्षभर तग धरू शकेल, हे भाकीत केलं. सावित्रीने ते अमान्य केलं. लग्न केलं त्याच्याशी म्हणजेच सत्यवानाला तरी सौर शक्तीचं महत्त्व पटलं आणि त्याने तिचा अंगीकार केला किंवा सावित्री जी सौर शक्ती वापरण्यात निष्णात होती, तिने सत्यवानाला हात दिला. वनात राहून जंगलतोड करणारा, जंगलं उजाड करणारा हा सत्यवान झाडाची फांदी कापताना झाडावरून पडतो. झाडं कापण्यामुळे त्याच्या झालेल्या दशेचं हे वर्णन. अशा वेळेला त्याच्या मदतीला येते सावित्री. या सौरशक्तीचा वापर करून अनेक वर त्या वेळच्या माणसाला लाभले. तेच ते सावित्रीने यमाकडून मागून घेतलेले वर. यम म्हणजे अत्यंत नियमाने वागणारा. प्रत्येक कृतीचे परिणामस्वरूप फळ देणारा.

 

पहिल्या वरानुसार सत्यवानाच्या बापाचे द्युमत्सेनाचे डोळे उघडले. आंधळा झाला होता, तो परत डोळस झाला. एकदा का अहंकाराने, अतिलोभाने आलेला अंधपणा गेला की तुम्ही तुमचे राजेच असता. सर्व इंद्रिये तुमची दास होतात. सावित्रीने अजून एक वर मागितला, शंभर पुत्र हवे असा. यम ‘तथास्तु’ म्हणाला. जशी एखादी परीक्षा कोणी दिली ही त्याची ओळख न पाहता पेपर तपासला जातो आणि ती ‘क्ष’ किंवा ‘य’ व्यक्ती कोण आहे, हे न बघता तिला जर गोल्ड मेडल असेल तर द्यावेच लागते. त्याप्रमाणे नियमांनी वागून कष्ट करणार्‍या व्यक्तीला यमालाही बक्षीस/वर द्यावेच लागतात. सत्यवानासारखे सौरउर्जेचा वापर करणारे १०० सत्यवान या मियाबिबींनी तयार केले सवंगड्यांनो. सत्यवानासारखे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे १०० जण तयार झाल्यावर सत्यवानाची ‘वन बचाव मोहीम’ आणि नवीन तंत्र वापरून शेतीचे प्रयोग ही मोहीम फत्ते न झाली तरच विशेष.

 

मैत्रिणींनो, म्हणजे वटपौर्णिमा हा सूर्य आणि झाडांची पूजा करायचा दिवस. सूर्यकिरण झाडाच्या हिरव्या पानांवर पडले की झाडं अन्न बनवितात. या अन्नावरच पृथ्वीवरील एकूण एक प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असतो. शेतकरी या झाडांची काळजी घेतो. तो अन्न तयार करायला मदत करतो पण तो प्रत्यक्ष अन्न तयार करू शकत नाही. अन्न तयार करायचं काम फक्त झाडं आणि सूर्य यांच्या एकत्र काम करण्यानेच साध्य होऊ शकतं. याच सूर्यनारायणाप्रति आणि हिरव्या झाडांप्रति कृतज्ञता व्यक्त करणार्‍यासाठी योजलेला हा सण. झाडांना तोडू नका, नाहीतर आपत्ती कोसळेल. झाडाला मातीत बांधून ठेवा, असा संदेश झाडाभोवती दोरा गुंडाळून दिला गेला. रोज त्याच्यापाशी येऊन चहूबाजेने बघा ते ठीक आहे ना. आज आपण फक्त आण वडाची फांदी बाजारातून, गुंडाळ दोरे, नाहीतर घाल फेर्‍या इतपतच संकुचित झालो.

 

५ जून हा जरी ‘जागतिक पर्यावरण दिन’ असला तरी प्राचीन भारतात वर्षातून तीन वेळा ‘पर्यावरण दिन’ पाळले जातात. पहिला आहे जानेवारी संपता संपता फेब्रुवारीच्या सुरुवातीस वसंतपंचमी. थंडी हळूहळू माघार घेऊ लागते. त्यावेळेला अनेक झाडं छान येतात. अनेक बिया तेव्हाच रुजतात. जी झाडं, ज्या बिया फेब्रुवारीत येत नाहीत, ती हमखास जुलैत पेरली तर चांगली उगवतात. जूनमध्ये थोड्याशा पावसाच्या सरी बरसून गेल्या की, तापलेली जमीन शांत होते. तिचा कडकपणा मावळतो. नवीन वृक्षारोपणाला हा काळ चांगला असतो. शेवंती वर्गातील झाडांचे छाट, गेल्या वर्षीच्या झाडाचे वरचे वरचे पाच सात पानाचे तुरे आत्ताच लावून बघा. तर नारळी पौर्णिमा हा तिसरा भारतीय पर्यावरण दिवस. समुद्र शांत होतो. समुद्रात टाकलेले नारळ समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन हळूच किनार्‍याला लागतात आणि तेथेच रुजतात. तुम्हा सर्वांनाच वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

- अरुंधती दीक्षित

 
@@AUTHORINFO_V1@@