मुंबई, पुण्यासह कोकणात पावसाची दमदार हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |
 


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मान्सून राजाने राज्यात पुन्हा एकदा आपली दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काल दिवसभरात मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोकणात अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा देखील वेगाने वाढू लागला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु असून येत्या २४ तासांमध्ये विदर्भात देखील पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

काल सकाळपासून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे मुंबई आणि कोकणामध्ये पावसाने सकाळपासूनच जोर धरण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला होता. यानंतर संध्याकाळ मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. मुंबई उपनगरसह संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. तसेच कोकणातील नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या असल्यामुळे कोकणातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


मुंबईमध्ये पाणीच पाणी :

दरम्यान प्रत्येक वेळी प्रमाणे आता देखील मुंबईला या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. नेहमीप्रमाणे या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठले असून  रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी  वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर देखील याचा परिणाम पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून मुंबई महापालिकेवर निशाणा साधला जात आहे.



 
 
@@AUTHORINFO_V1@@