‘आश्रय-माझे घर’ चे कार्य उदात्त व उत्तुंग...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |

विशेष मुलामुलींच्या पालकांचे,समाजाचे प्रबोधन व्हावे, नीला सत्यनारायण यांचे ‘संवाद स्वत:शी’ उपक्रमात आवाहन

जळगाव, २४ जून :
केशवस्मृती सेवासंस्था समुहाने निरपेक्ष भावनेने मतिमंद मुलांची देखभाल करुन त्यांचा विकास करण्यासाठी सुरु केलेल्या ‘आश्रय-माझे घर’ या उपक्रमाचे कार्य उदात्त व उत्तुंग आहे. त्याद्वारे विशेष मुलामुलींच्या पालकांचे आणि सार्‍या समाजाचे प्रबोधन व्हावे, अशी अपेक्षा निवृत्त आय.ए.एस.अधिकारी आणि ‘डाऊन्स सिन्ड्रोम’ ग्रस्त मुलाचा सांभाळ करणारी आई अशी भूमिका बजावणार्‍या नीला सत्यनारायण (मुंबई) यांनी आज येथे व्यक्त केली.
 
 
‘आश्रय-माझे घर’ या उपक्रमाच्या एक वर्षपूर्तीनिमित्त रविवारी २४ जून रोजी सायंकाळी ५ वा. कांताई सभागृहात ‘ संवाद स्वत:शी’ या उपक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर त्यांच्यासह ‘आश्रय’चे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ.प्रताप जाधव आणि दानशूर, उद्योजक तसेच जैैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष कस्तुरचंदजी बाफना होते.
प्रारंभी ‘आश्रय’ संबंधीची माहितीपर ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. डॉ. जाधव, संचालिका रेखा पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ.जाधव यांनी प्रास्ताविक केले.१५ जुलैपासून आश्रयसोबतच सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात ‘डे केअर’ सेंटर सुरु केले होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
 
कस्तुरचंदजी बाफना यांनी समयोचित कविता सादर करीत या उपक्रमाचा गौरव केला. नीला सत्यनारायण यांनी संवादाच्या प्रारंभी ‘आश्रय’ ला दिलेली भेट आणि तेथील समाधानकारक, दिलासादायक वातावरणाबाबत गौरवोद्गार काढले. पगारासाठी काम करणार्‍यांकडून अशी सेवा होऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी ‘आश्रय’ मधील काळजीवाहकांच्या सेवावृत्तीची प्रशंसा केली. आपल्या चैतन्य या ३५ वर्षीय विशेष मुलाबाबतचे अनुभवही त्यांनी विशद केले, अशा मुलांची आई ही सामर्थ्यशालीच, तिची सर कुणाला येणे शक्य नसते. राग, द्वेष, मत्सर नसलेली ही मुलं पूर्ण आहेत, अनेक दोष व मनोविकार असलेले आपण अपूर्ण आहोत, त्यांना सर्व भावना कळतात, असे मार्मिक विधान करीत त्यांनी या मुलांना सन्मानाची, प्रेमाची वागणूक चांगल्या पद्धतीने द्या.., ती आनंदी झाली की, निरोगीही होतील. आईचे प्रेम व स्पर्शही त्यांना मोठा आधार ठरतो, हा विचारही त्यांनी अधोरेखित केला. त्यांनी काही विलक्षण अनुभव, प्रसंग व समर्पक दाखलेही संवादाच्या ओघात दिले. सूत्रसंचालन संचालिका कविता दीक्षित आणि आभारप्रदर्शन कृणाल महाजन यांनी केले. सर्व स्तरातील जिज्ञासू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
सुदृढ, सोशिक समाज घडवू या...
या विशेष मुलांना सवंगडी असावेत, प्रेमळ शब्द व स्पर्शाची गरज आहे. संवेदना जागृतीचे काम करते...लाज न बाळगता त्यांना सोबत न्या, आपल्या आनंद व चैतन्याच्या व्याख्या बदला...नात्याची वीण घट्ट करा... ‘आश्रय’ची जागोजाग गरज आहे, सुदृढ, सोशिक समाज घडवू या...’ असे कळकळीचे आवाहनही नीला सत्यनारायण यांनी केले.
 
 
प्रारंभी ‘आश्रय-माझे घर !’ संबंधीची माहिती आणि तेथील मतिमंद मुलांच्या आनंदी दिनक्रमाबद्दलची चित्रफित दाखवण्यात आली. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर भव्य व सप्तरंगी रांगोळी होती. मंचावर मोजकेच मान्यवर आणि मोजकी भाषणे हे कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले. नीला सत्यनारायण आणि ‘आई’ या नात्याने चैतन्य या आपल्या मुलाबद्दलचे काही हृद्य व विलक्षण अनुभव, प्रसंग व समर्पक दाखलेही संवादाच्या ओघात दिले. ‘आश्रय-माझे घर’ सारख्या संस्थांना पद्मपुरस्कार देऊन गौरवले पाहिजे पण ते होत नाही, अशी अपेक्षा आणि खंतही त्यांनी व्यक्त केली. शेवटी शंकानिरसन सत्रात काही पालकांनी आपल्या विशेष पाल्यांबद्दल मार्गदर्शन मागितले. त्यातील काहींच्या वेदना व स्वर उपस्थितांचे मन गलबलून टाकणारा ठरला. कस्तुरचंद बाफना यांनी ‘आश्रय-माझे घर !’ ला २५ हजार रु. देणगी घोषित केली. सभागृहाबाहेर प्रतिक्रिया संकलनासाठी ‘ फिडबॅक बॉक्स’ ठेवण्यात आला होता. त्यात श्रोत्यांमधील अनेकांनी कार्यक्रम आणि ‘आश्रय-माझे घर !’ ला आपण काय योगदान देणार याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. हा उपक्रम खूप काही नवीन जाणीवा निर्माण करणारा आणि मन, संवेदना आणि दृष्टी विशाल करणारा ठरला, असा प्रतिक्रियात्मक सूरही उमटला.
@@AUTHORINFO_V1@@