ठाणे, कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |



 

नुकसान टाळण्यासाठी महापालिका सरसावल्या


ठाणे :जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संबंधित महानगरपालिकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते अशा ठिकाणांचा अभ्यास करुन या ठिकाणी कायमस्वरुपी तोड़गा काढ़ण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. यासाठी नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधयक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचणारी एकूण १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये नौपाड़ा प्रभाग समिती अंतर्गत ठामपा प्रशासकीय भवना जवळ ड़ॉ. अल्मेड़ा रोड़ येथील ड़ेबोनार सोसायटी, वंदना सिनेमाजवळ लाल बहादुर शास्त्री मार्ग, राम मारुती रोड़ येथील गजानन महाराज मंदिर व गड़करी पथ चौक, गोखले रोड़ येथील देवधर हॉस्पिटल, जिजामाता मंड़ई जवळ मासुंदा तलाव शिवाजी पथ, एम.जी.रोड़ येथील पंपिंग स्टेशन-चिखलवाड़ी, एल.बी.एस. मार्ग येथील चव्हाण चाळ, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत वृंदावन सोसायटी तसेच श्रीरंग सोसायटी, माजिवड़ा-मानपाड़ा प्रभाग समिती अंतर्गत घोड़बंदर रोड़ येथील पंचामृत सोसायटी जवळ रिलायन्स फ्रेश, घोड़बंदर रोड़ येथील आय.सी.आय.सी.आय. बँके जवळ, कळवा प्रभाग समिती येथील विटावा रेल्वे पुलाखाली बेलापूर रस्ता, तर मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत दिवा गांव आदी ठिकाणांचा समावेश आहे.

या ठिकाणी नगर अभियंता यांनी अभ्यास करुन काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर अहवालाच्या अनुषंगाने पुढ़ील कार्यवाही करण्यात येईल,” असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

कल्याण- डोंबिवली महापालिका परिसरात रविवारी जूनपासून संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या ४८ तासांत सरासरी २०० मिली. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. महापालिका क्षेत्रात १३ वेगवेगळ्या ठिकाणी झाडे कोलमडली असून अग्निशमन व उद्यान विभागामार्फत सदर झाडे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली.

डोंबिवली (प.) येथील साईलिला या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराचे प्लास्टर पडले आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन विभाग व प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे उपस्थित होते.

अ प्रभागक्षेत्रांतर्गत बल्याणी येथे, क प्रभागक्षेत्रांतर्गत शिवाजी चौक व व्हर्टेक्स कॉम्प्लेक्स, फोर्टिस रुग्णालय, ब प्रभागक्षेत्रांतर्गत उंबर्डे व चिकणघर येथील दत्त मंदिर परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सदर तक्रारींचे निराकरण संबंधित प्रभाग कार्यालयांमार्फत करण्यात आले आहे. ह प्रभागक्षेत्रांतर्गत म. फुले रोड, लोटेवाडी तर, आय प्रभागक्षेत्रातील आडीवली-ढोकळी येथे तसेच ड प्रभाग क्षेत्रातील तिसगांव येथे पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने तक्रारींवर प्रभागक्षेत्र अधिकार्यांनी कामगारांमार्फत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई केली आहे.

मिलापनगरमधील मोठ्या नाल्याच्या संरक्षण भिंतीला तडा पडल्याने तेथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने ते पाणी मिलाप नगरमध्ये शिरू लागले आहे. यास्तव महापालिकचे शहर अभियंता तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रमोद कुलकर्णी यांनी कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांना तातडीने उपाययोजना करण्याबाबत कळविले आहे तर लोढा हेवन कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याने तेथील तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश प्रभाग अधिकार्यांना देण्यात आले आहेत.

पाणी कपात रद्द होण्याची शक्यता

पावसाने सोमवारी दमदार हजेरी लावल्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सखल भागात पाणी साचले होते, तर बारवी डॅम क्षेत्रात आतापर्यंत २५८ मिलिमीटर पाऊस पडला असून असाच पाऊस जर बरसत राहिला तर पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणार्या बारवी डॅममधील पाणीसाठ्याचे जुलै पर्यंतचे नियोजन करण्यासाठी सध्या पाणी कपात लागू करण्यात आली आहे. डॅममधील पाण्याची एप्रिल महिन्याची आकडेवारी पाहता डॅममध्ये १११ .४९ दशलक्ष घनमीटर (४७ टक्के ) पाणी उपलब्ध होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा सुमारे २ टक्यांनी कमी झाला होता. दरवर्षी धरणातील पाणी साठ्याचे जुलै महिन्यापर्यंत नियोजन करण्याकरिता पाणी कपात लागू केली जाते. सध्या ही पाणी कपात लागू असून महापालिका क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा मंगळवारी व एमआयडीसी भागात शुक्रवारी बंद ठेवला जात आहे. मात्र, जून महिन्यापासून सरु झालेल्या पावसाचा एकंदरीत अंदाज घेता या भागात दर दिवसा ५२ मिलीलिटर इतका पडत असल्याची माहिती बारवी धरणाचे प्रमुख प्रकाश चव्हाण यांनी दिली. या धरणाची सध्याची क्षमता ५७ .१८ टक्के इतकी असून जर सुमारे सरारी ६८.६० टक्के इतका पाणी साठा झाल्यास हे धरण भरून वाहण्याची शक्यता असल्याचे ही त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@