मतांच्या राजकारणापलीकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |




जातीसमूह हे केवळ मतांचे गठ्ठे आहेत, असे मानणाऱ्या लोकांना ‘डिक्की’चे मिलिंद कांबळे काय म्हणतायत हे कधीच कळणार नाही.

 

अनुसूचित जाती-जमातीतील सुमारे २ कोटी ७५ लाख युवक-युवतींना मुद्रा योजनेचा फायदा झाला असून त्यांच्या आयुष्यात भराभराटीचे ‘अच्छे दिन’ येऊ लागल्याची ग्वाही खुद्द मिलिंद कांबळे यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या मुद्रा योजनेतून सुमारे १२ कोटी लोकांनी कर्जे घेतली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर लघु उद्योजक आहेत. असे लघु उद्योजक, जे लघुउद्योगाच्या नावाखाली चालणाऱ्या छान छान कार्यक्रमातदेखील पोहोचू शकत नाहीत. यात नारळपाणी विकणारे आहेत, भाजीवाले आहेत, चहा विकणारे आहेत, ज्या पकोड्यावरून काँग्रेसने घाणेरडे राजकारण केले ते पकोडा विकणारेही आहेत. या क्रांतीचे दृश्य स्वरूप आज दिसत नसले तरी ते कधी ना कधी दिसणारच आहे. मौन साधकाप्रमाणे राबविल्या जाणाऱ्या या योजना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविणाऱ्या असणार आहेत. यातून जे साध्य होईल त्याचे दूरगामी परिणामच पाहायला मिळतील.

 

आपली ऐन भरातील राजकीय कारकीर्द सोडून अनुसूचित जाती-जमातीतील तरुण-तरुणींनी व्यवसायात यावे म्हणून मिलिंद कांबळेंनी स्वत:ला झोकून दिले. त्यातून ‘डिक्की’सारखी संस्था उभी राहिली. आजच्या घडीला ‘डिक्की’च्या माध्यमातून लाखो अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना व्यवसायाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि आत्मभान तर मिळालेच आहे, पण व्यवसायाचे व्यासपीठही मिळाले आहे. ‘डिक्की’ केवळ प्रबोधन प्रशिक्षण मिळवून देत नाही, तर आपल्या मोठमोठाल्या प्रदर्शनातून उद्योजकांना व्यवसायाच्या संधीही मिळवून देते. ‘डिक्की’च्या पहिल्याच प्रदर्शनाला पुण्यात खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतातल्या अग्रगण्य कॉर्पोरेट हाऊसेसनी यात आपला सहभाग नोंदविला होता आणि आपल्या उत्पादनातील लहान-मोठ्या गरजांची पूर्ती सहभागकर्त्या उद्योजकांकडून करून घेण्याचेही मान्य केले होते. हा सिलसिला पुढे सुरूच राहिला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या पदरात काही तरी पडेल, अशा प्रकारच्या अपेक्षेने जगणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्यांच्या आवाक्याबाहेरचे हे काम होते. मिलिंद कांबळेंनी हे शिवधनुष्य लिलया पेलले. सरकार आणि सरकारी विभाग सरकारी योजनांतून अनुसूचित जाती-जमातीच्या देशबांधवांसाठी काय केले गेले हे तर सांगतच आहे, पण त्याचबरोबर जेव्हा मिलिंद कांबळेंसारखे लोक यावर शिक्कामोर्तब करतात, तेव्हा त्यातून येणारा संदेश निराळा असतो, हे ध्यानात घेतले पाहिजे.

 

ज्या पार्श्वभूमीवर हे सगळे घडत आहे, ती आधी नीट समजून घेतली पाहिजे. जातीसमूहांना मतांचे गठ्ठे मानणे हाच जिथला शिरस्ता होता, त्या पार्श्वभूमीवर हे सगळे घडते आहे. तथाकथित विचारवंत आणि सत्ताधारी यांची युती या देशात कायम होती. समाजातले ज्वलनशील विषय पद्धतशीरपणे सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला कसे नेऊन बांधायचे याचे उत्तम खेळ आपल्याकडे चालत. सत्तेची पदे तुम्हाला, तर वैचारिक क्षेत्रे आम्हाला, अशी ही सरळ वाटणी होती. जोवर काँग्रेसचे सरकार होते तोपर्यंत ही सगळी खिचडी उत्तम शिजत होती. विकासाचा ‘वि’ देखील उच्चारला गेला नाही तरी चालेल, पण सरकारविरोधी वातावरण होऊ द्यायचे नाही असा हा सौदा. अनुसूचित जाती-जमातीतील मंडळी तर यांच्यासाठी राजकारणात वापरायची प्यादीच होती. त्यातले काही आपले मानायचे आणि त्यानंतर मते मिळवून त्यांना विसरून जायचे, हा शिरस्ता कायम होता. या देशात अनुसूचित जातीच्या मंडळींना काही झाले तर त्याच्या इतक्या बातम्या चालवायच्या की जणू काही या देशातले सर्वच घटक संकटात आहेत. रोहित वेमुला प्रकरणात तर अनुसूचित जातीच्या नसलेल्या रोहित वेमुलाला अनुसूचित जातीचा म्हणून सादर केले गेले. त्याच्या मृत्यूचे इतके भांडवल केले गेले की, मृत्यूलाही लाज वाटावी. यातून जे काही झाले ते धक्कादायकच होते. रोहितच्या आईलाही नंतर गावोगावी फिरविण्याचे उद्योग झाले. एक उच्चशिक्षीत तरुण आत्महत्या करतो हे कुणाही संवेदनशील माणसाला धक्कादायकच वाटावे, पण त्याहून असंवेदनशील या देशातले तथाकथित विचारवंत आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात खोट्या गप्पा मारणारे झाले.

 

रोहित वेमुलाच्या आईने गेल्या आठवड्यात जी कथा सांगितली ती तर अंगावर काटा आणणारी आहे. मुस्लीम संघटनांनी तिला केरळमध्ये फिरविले आणि घर घेण्यासाठी म्हणून जे धनादेश देण्याचे वायदे केले ते कधीच न वठणारे होते. एकुलता एक मुलगा गेल्यावर एक माऊली राजकीय हेतूसाठी कशी दारोदार फिरविली जाते, ते या निमित्ताने पाहायला मिळाले. हा सगळाच प्रकार इतका किळसवाणा आहे की, कल्पनाही करू शकत नाही. या सगळ्याच्या मागे जे कुटील राजकारण सुरू आहे ते तर त्याहून भयंकर आहे. महाराष्ट्रातही अनुसूचित जातीच्या तरुणांना भडकविण्यात आणि या सरकारच्या विरोधात उभे करण्यात शहरी माओवाद्यांना चांगले यश मिळाले आहे. ‘कबीर कला मंचा’सारख्या माध्यमातून बुद्ध व बाबासाहेबांच्या मार्गापासूनच आंबेडकरी युवक भरकटावा, असा डाव खेळला जात आहे. प्रकाश आंबेडकरांसारखे लोक यात सहभागी होतात, याहून वेगळी ती शोकांतिका काय? राज्यकर्त्यांच्या जाती सांगून जो काही गलिच्छ खेळ खेळला जात आहे तो निव्वळ भयंकर आहे. शरद पवारांसारखे लोक आता त्यात अग्रभागी आहेत. हे सगळेच राजकीय लाभासाठी केले जात आहे, हे भयंकरच, पण त्याहून अधिक म्हणजे हे समाज दुभंगण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. याची यांना जाण नाही. मिलिंद कांबळेसारखे लोक आज जे सांगत आहेत त्याला मुख्य माध्यमात स्थान नाही. तो मथळाही नाही आणि मथळ्याच्या लायक बातमी आहे, असे या मंडळींना वाटतही नाही. कारण, यातून होणार असलेल्या आमूलाग्र बदलांची पुसटशीही कल्पना त्यांना येणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@