यशवंत ठकार यांचे पुणे येथे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |


 

 
 
 
पुणे : सामाजिक, राजकीय तसेच आर्थिक विषयांचे अभ्यासक व कार्यकर्ते, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड प्लानिंग रिसर्च, पुणे केंद्राचे संचालक यशवंत ठकार यांचे रविवारी पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

यशवंत ठकार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्याच आठवड्यात त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. मात्र, रविवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचे निधन झाले. पुणे येथे जन्म झालेल्या यशवंत ठकार यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले. स. प. महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आदी महाविद्यालयांतून एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर ठकार सामाजिक कार्यात सक्रीय झाले. म्हैसाळ प्रकल्पावर त्यांनी दोन वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केले. ग्रामायण या सामाजिक संस्थेचे ते स्थापनेपासूनचे कार्यकर्ते होते. ग्रामविकास, पाणलोट क्षेत्रविकास तसेच जलसंधारण आदी विषयांतील अनेक प्रकल्पांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. भटके व विमुक्त विकास परिषदेच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांपैकी ते एक होते. यमगरवाडी प्रकल्पाच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी १९९६ मध्ये शासनातर्फे स्थापन केलेल्या भटक्या व विमुक्त जाती-जमातींवरील संशोधन समितीमध्ये ठकार सदस्य होते.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुणे येथील सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड प्लानिंग रिसर्च या केंद्राचे ते संचालक होते. या केंद्राच्या जडणघडणीमध्ये गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे. त्यांचा मुलगा विदेशात असल्यामुळे ते पुण्यात परतल्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. यशवंत ठकार यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून, नातू तसेच भाऊ व बहिण असा परिवार आहे.

@@AUTHORINFO_V1@@