दाऊदचा हस्तक रामदास रहाणेला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

मुंबई पोलीस गुन्हे शाखेची मोठी कारवाई 




मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखाने आज एक जोरदार धक्का दिला आहे. दाऊदचा प्रमुख हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास रहाणे याच्या आज मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून अहमदनगरमधील त्याच्या राहत्या घरातून आज रहाणेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी रामदासकडून एक पिस्तुल देखील जप्त करण्यात आली असून येत्या ३० तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


भारतातल्या एका व्यावसायिकाने दुबईमध्ये मित्राच्या साथीने हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायामध्ये सुमारे ५ लाख दिरहम (दुबईचे चलन) इतकी गुंतवणूक करण्यात आली होती. दाऊदकडून या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन येत होते. पण, व्यावसायिकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दाऊदच्या इशाऱ्यावरून व्यवसायिकाच्या मित्राला २००१ साली ठार करण्यात आले. या धक्क्यानंतर व्यावसायिकाने हॉटेल विकून दाऊदला पैसे दिले. त्यानंतर देखील व्यावसायिकाला ५० लाखांच्या खंडणीसाठी पाकिस्तानातून फोन येत होते. शिवाय, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली जात होती. त्यामुळे व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिले होते. या साऱ्या घटनेमागे रामदास रहाणे असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून खंडणी विरोधी पथकाने रामदास रहाणेला बेड्या ठोकल्या.

मुंबईतील गोळीबारात रहाणेचा हात

मुंबईतील व्यावसायिक ढोलकिया यांच्या कार्यालयावर २०११ साली गोळीबार झाला होता. रामदास रहाणे हा त्यातील प्रमुख आरोपी आहे. रामदास रहाणेवर मुंबई आणि गुजरातमध्ये मिळून ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शिवाय, अनेकजण रामदास रहाणेच्या रडारवर देखील होते. त्याच्या अटकेमुळे पुढील अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. दरम्यान, रहाणेला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दाऊदला जोरदार धक्का बसला .

@@AUTHORINFO_V1@@