प्लास्टिकला पर्याय आहेत प्लास्टिकबंदीला पर्याय नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018   
Total Views |



प्रबोधन हा जरी उत्तम आणि बिनसंघर्षाचा मार्ग असला तरी भारतात प्रबोधनाला प्रतिसाद देण्याची लोकांची वृत्ती अत्यंत कमी आहे. प्लास्टिकचे पर्यावरणीय आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सगळ्यांना माहीत आहेत. ते वेगळे सांगण्याची गरज नाही, पण आपणहून आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची तयारी प्लास्टिकबंदीपूर्वी किती नागरिकांनी दाखवली होती?


बोरीवली पश्चिमेला वझिरा नाक्यावर ‘मन्सुरी डेअरी फार्म नामक एक सुप्रसिद्ध डेअरी आहे. गेली पंचवीस-तीस वर्षे बोरिवलीकर त्या दुकानातून दूध घेतात. नालासोपार्‍याला यांचा गाई-गुरांचा तबेला आहे. तिथून दररोज शेकडो लिटर दूध बोरिवलीत येतं. घरगुती म्हणून त्याला भावही चांगला आहे. प्लास्टिकबंदीपूर्वी काही लोक घरातून किटली आणून त्यातून दूध घेऊन जात, तर बहुतांश लोक प्लास्टिक पिशव्यांतून दूध नेत असत. प्लास्टिकबंदी लागू झाली त्या दिवशी संध्याकाळी त्या दुकानाच्या मालकाशी पंधरा मिनिटं गप्पा मारल्या. अनेक लोक किटलीतून दूध घेऊन जात होते, तर पिशवीतून दूध मागणार्यांना सरळ घरचा रस्ता दाखवला जात होता. “प्लास्टिकबंदीबाबत आपलं मत काय?” असं विचारलं असता तो म्हणाला, “प्लास्टिकबंदीचा निर्णय एकदम चांगला आहे. यामुळे आमच्या धंद्यावर थोडे दिवस परिणाम होईल, आमचं दूध फुकटही जाईल, पण एकदा लोकांना किटली आणायची सवय झाली की, मग परत सगळं पूर्ववत होईल.”

एका दुकानदाराने प्लास्टिकबंदीचं समर्थन करणं हे विशेष होतं. जे लोक पूर्वी प्लास्टिक पिशवीतून दूध घेऊन जात ते आता मुकाट्याने रोज दुधासाठी किटली घेऊन येतील. तेव्हा माझा प्लास्टिकबंदीवरचा विश्वास अधिक दृढ झाला. लोकांच्या सवयीत झालेला हा बदल प्लास्टिकबंदीशिवाय झाला असता का? कुठलाही बदल घडवून आणण्याचे दोन मार्ग असतात. एक म्हणजे प्रबोधन आणि दुसरा म्हणजे कायदेशीर कारवाई. प्रबोधन हा जरी उत्तम आणि बिनसंघर्षाचा मार्ग असला तरी भारतात प्रबोधनाला प्रतिसाद देण्याची लोकांची वृत्ती अत्यंत कमी आहे. प्लास्टिकचे पर्यावरणीय आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सगळ्यांना माहीत आहेत. ते वेगळे सांगण्याची गरज नाही, पण आपणहून आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची तयारी प्लास्टिकबंदीपूर्वी किती नागरिकांनी दाखवली होती? सरकारी वा खासगी सभांमध्ये व्यासपीठावर मान्यवरांसमोर बिसलरीच्या बाटल्या ठेवलेल्या असतात, तेव्हा त्यातला एकही मान्यवर बाटल्यांऐवजी तांब्या-भांडं ठेवण्याचा आग्रह धरत नाही. चहापानासाठी सर्रास प्लास्टिक वा थर्माकोलच्या प्लेट्स आणि ग्लासेस वापरले जातात. तेव्हा त्यामुळे होणारं प्रदूषण माहीत असूनसुद्धा एकही माणूस त्याला विरोध करत नाही. शहरातला अगदी उच्चशिक्षित माणूससुद्धा पाच वेगवेगळ्या भाज्या आणण्यासाठी पाच वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्या दुकानदाराकडून घेतो. त्याला प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत नसतात, असं नाही, पण स्वत:हून बदल करायची तयारी नसते. आपण काहीतरी बदल केला पाहिजे, असं बर्याच जणांना वाटतंही, पण प्रत्यक्षात ते हातून घडत नाही. हे सगळं चित्र पाहिल्यावर एका गोष्टीची खात्री पटते ती म्हणजे हा प्रश्न फक्त प्रबोधनाने सुटणारा नाही. शब्दांचा मार जिथे अपुरा पडतो तिथे काठीचा मार द्यावाच लागतो. ‘गुटखा-तंबाखू-सिगारेटच्या पाकिटांवर कर्करोगाची छायाचित्रं टाकल्यापासून त्यांचं सेवन कमी नाही का झालं? तसंच प्लास्टिकच्या बाबतीत नाही का होणार?’ असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. पण गुटखा-तंबाखू सिगारेट यांच्या सेवनाचे स्वत:च्या आरोग्यावर काही गंभीर दुष्परिणाम आहेत म्हणून लोक त्याला जरा तरी गांभीर्याने घेतात. प्लास्टिकचं तसं नाही. प्लास्टिकचे दुष्परिणाम हे परिसंस्थेवर होतात,वैयक्तिक जीवनात नाही आणि प्लास्टिकचं उपयोगमूल्यही जास्त असल्याने त्याचे दुष्परिणाम तेवढे गांभीर्याने घेतले जात नाहीत आणि आज या घडीला प्लास्टिकचा वापर आणि प्रदूषण इतकं कळसाला पोहोचलेलं आहे की, काहीतरी कडक पाऊल उचलणं गरजेचंच होतं. एका बाजूला प्रबोधनावर भरवसा ठेवून दुसरीकडे प्लास्टिकचे ढीग वाढवत राहणं परवडणारं नव्हतं.

 
 
 
बोरिवलीचं ‘मन्सुरी डेअरी फार्म’ येथे किटलीतूनच दूध दिले जाते. 
 
मी केवळ लोकांना दोष देत नाही. लोकांमध्ये मी स्वत:सुद्धा आलो. प्लास्टिकचा वापर टाळायचा माझा कितीही दृढनिश्चय असला तरी कधीकधी, किंबहुना बर्याचदा निष्काळजीपणामुळे तो मोडला जायचा, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. घरातून कापडी पिशवी न्यायला विसरल्यामुळे प्लास्टिकची पिशवी नाईलाजाने दुकानदाराकडून घेतली जायची. ‘पुढच्या वेळेपासून नेऊ असं म्हणून वेळ भागवली जायची. ही पुढची वेळ कधीच येत नाही. जोपर्यंत ‘घरातून कापडी पिशवी नेली नाही तर मला बाजारात एकही वस्तू मिळणार नाही, हात हालवत परत यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत लोकांना शिस्त लागणार नाही. उपभोग हा बर्याच अंशी उपलब्धतेवर अवलंबून असतो.

प्लास्टिकचा बहुतांश वापर हा ‘गरज म्हणून नव्हे तर सहज उपलब्धतेमुळे आहे. ही उपलब्धताच बंद झाली की आपोआपच लोकांना बदल करणं भाग पडेल. अनेक लोकांशी प्लास्टिकबंदीबाबत बोलताना असं लक्षात आलं की, स्वत:ला शिस्त लागण्यासाठी लोकांना प्लास्टिकबंदी हवी आहे. ‘सरकारने पर्याय उपलब्ध करून न देता प्लास्टिकबंदी लादली,’ असं म्हणत काही लोक फुगून बसले आहेत. यांना माझं एवढंच सांगणं आहे की, सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपण सरकारवर टाकायची का? प्लास्टिकला उपलब्ध असलेले किती पर्याय आपण स्वत:हून वापरतो? मुंबईतले किती लोक महानगरपालिकेने वरळीला भरवलेल्या प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचं प्रदर्शन पाहायला गेले? पर्याय आपण शोधायचे आहेत आणि वापरायचे आहेत. एक गोष्ट सत्य आहे की, आपल्याला जर पर्यावरणाचा विचार करायचा असेल तर जीवनशैलीत काहीतरी तडजोड करण्याला पर्याय नाही. मग त्याच्यासाठी थोडासा त्रासही सहन करण्याची तयारी हवी. ५० -१०० वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक अस्तित्वातच नव्हतं तेव्हा लोकांचं जीवनमान सुरळीतपणे सुरू होतंच ना?


मुंबई महानगरपालिकेने वरळीला भरवलेल्या प्रदर्शनात कापडी पिशव्या, तागाच्या पिशव्या, बांबूपासून बनवलेले चमचे, मखरं, केळीच्या झाडापासून बनवलेल्या प्लेट्स व ग्लासेस, अशा प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचं उत्पादन करणारे अनेक महिला बचतगट आणि कंपन्या सहभागी झाल्या होत्या. पर्यायी वस्तू-उत्पादनाच्या उद्योगामध्येही मोठी रोजगार निर्मितीक्षमता आहे, हे त्यावरून स्पष्ट दिसत होतं आणि जिथे प्लास्टिकला काहीच पर्याय नाही अशा वस्तू बंदीतून मुक्त केलेल्या आहेत. अन्नपदार्थांचं पॅकिंग मटेरिअल, टपरवेअरचे डबे, जाड पाण्याच्या बाटल्या, दूधपिशव्या अशा काही निवडक वस्तूंवर बंदी नाही. त्यामुळे लोकांनी नोटाबंदी जशी लोकांनी सकारात्मकतेने घेतली तशी प्लास्टिकबंदीही सकारात्मकतेने घेऊन तिला आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करण्याची एक संधी समजावं. निर्णय खूप चांगला आहे. फक्त त्याला राजकारणाचा कलंक लागून तो फसू नये एवढीच सदिच्छा!

@@AUTHORINFO_V1@@