कोकणाचा चित्रमय निसर्गकोश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |



‘निसर्गधन कोकणचे’ या पुस्तकाचे लेखक राम मोने हे ’सह्याद्री निसर्गमित्र’ या नामांकित संस्थेबरोबर गेली पंचवीस वर्षे स्वतः ठिकठिकाणी फिरून कोकणाचा निसर्गशास्त्रीयदृष्ट्या अभ्यासणे, मलबारी धनेश, सागरी कासवे, जलमांजर यासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातींच्या संरक्षण-संवर्धनाच्या कामांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे एका हाडाच्या निसर्गअभ्यासकाकडून हे पुस्तक साकार झालं आहे.


कोकणातल्या ‘सह्याद्री निसर्गमित्र’ संस्थेत काम करणारे निसर्ग अभ्यासक राम मोने यांच्या निसर्गधन कोकणचे’ या पुस्तकाला ‘कोकणाचा चित्रमय निसर्गकोश’ म्हणायला हरकत नाही. २०१५ साली प्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. कोकण आणि निसर्ग हे कप आणि बशी यांच्याइतकेच एकमेकांचे अविभाज्य भाग आहेत. निसर्गाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन असतात. एक म्हणजे निसर्गदृश्यांचा आनंद (Macro View) आणि दुसरं म्हणजे निसर्गातले प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, सूक्ष्मजीव यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास (Micro view). राम मोनेंचं हे पुस्तक हा या दोघांचा उत्तम मिलाप आहे. छायाचित्रांच्या संग्रहामुळे हे पुस्तक दृश्यानंदही देतं आणि प्राणी-पक्षी-वनस्पती यांची संक्षिप्त रूपात शास्त्रीय माहितीही मिळते. राम मोने हे ‘सह्याद्री निसर्गमित्र’ या नामांकित संस्थेबरोबर गेली पंचवीस वर्षे स्वतः ठिकठिकाणी फिरून कोकणाचा निसर्गशास्त्रीयदृष्ट्या अभ्यासणे, मलबारी धनेश, सागरी कासवे, जलमांजर यासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातींच्या संरक्षण-संवर्धनाच्या कामांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे एका हाडाच्या निसर्गअभ्यासकाकडून हे पुस्तक साकार झालं आहे.

 
 

पुस्तकात असलेली बहुतांश छायाचित्रं ही राम मोने यांनी स्वतः टिपलेली, तर काही त्यांच्या सहकार्‍यांकडून घेतलेली आहेत. मुखपृष्ठावरच टॅक्सीसारखा काळापिवळा रंग असलेला आणि म्हशीच्या शिंगासारखी लांब बाकदार चोच असणारा, कोकणाची खास ओळख असलेला धनेश (Malabar Pied Hornbill उर्फ शिंगचोचा) लक्ष्य वेधून घेतो. कोकणचे अधिवास, पक्षी, साप, वनस्पती आणि प्राणी अशा पाच मुख्य प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलं गेलं आहे. निसर्ग हे प्राणी-पक्षी-वनस्पती-कीटक-सूक्ष्मजीव यांचं अफलातून मिश्रण आहे. त्यातला एक एक पदर उलगडत जाणारं हे पुस्तक आहे. प्राणी-पक्ष्यांचा अभ्यास हा विशिष्ट अधिवासाच्या संदर्भात करावा लागतो. पहिल्या अवघ्या तीन पानांच्या प्रकरणात समुद्रकिनारा, खाडी, नदी, खारफुटी, नाले, तलाव, डोंगरउतार, देवराई असे कोकणचे अधिवास छायाचित्रातून स्पष्ट केलेले आहेत. त्यापुढे ‘भरारते कोकण’ या प्रकरणातून आपण कोकणच्या पक्षीजगतात शिरतो. सुरुवातीला पक्ष्यांची वैशिष्ट्ये, त्यांचं स्थलांतर, घरटी बांधण्याच्या पद्धती, पक्ष्यांचे अवयव, पायांचे प्रकार, चोचीचे प्रकार, अशी वैविध्यपूर्ण शास्त्रीय माहिती आहे.

 
 

फोटोग्राफीमध्ये अचूक क्षण टिपणं हे खूप मोठं कौशल्य असतं. या प्रकरणात कोकणातल्या बहुतेक सर्व पक्ष्यांचे शिकार करतानाचे, उडतानाचे, अन्न खातानाचे, भरवतानाचे मनमोहक क्षण टिपले आहेत. सोबत प्रत्येक पक्ष्याचं स्थानिक नाव, इंग्रजी नाव आणि शास्त्रीय नाव आणि त्यांची ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. वैविध्य हे निसर्गाचं वैशिष्ट्य आहे, पण हे वैविध्य किती प्रचंड प्रमाणात आहे, हे या पुस्तकाचं एक एक पान पलटताना कळत जातं. त्यापुढच्या ‘हिरवाई’ या प्रकरणात आपण कोकणच्या वनस्पतीविश्वात प्रवेश करतो. कोकणात गेल्या २५ -३० वर्षांत हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी आर्थिक उत्पन्न मिळवून देणार्‍या झाडांची भरपूर प्रमाणात लागवड झाल्यामुळे वनस्पतीवैविध्य मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. अन्नसाखळीची सुरुवातच वनस्पतींपासून होते. परिसंस्थेच्या रक्षणासाठी वनस्पतीवैविध्याचं जतन अत्यावश्यक आहे. हे वनस्पतीवैविध्य या पुस्तकात सुरेखपणे उलगडून दाखवलं आहे.

 
 

पळस, शेवर, पांगारा, कैलासपती, वड, उंबर, सीता अशोक, सुरमाड, शिवण, बिब्बा, बहावा, सोनचाफा, बिवला, काजरा, सप्तपर्णी, अंजनी, सुरंगी, कुंभा, कदंब, किंजळ, टाकळा, उक्षी, रुई, निगडी, मर्यादवेल, आमरी, तीवर, किर्पा...अशा कोकणातल्या सर्व वनस्पतींची उत्तमोत्तम छयाचित्रे शास्त्रीय नाव आणि ठळक वैशिष्ट्यांसकट दिली आहेत. यात नुसती वनस्पतींचीच छायाचित्रं नाहीत तर एका वनस्पतीच्या प्रत्येक अवयवाची छायाचित्रं आहेत. यामुळे त्यांची ओळख होण्यास मदत होते. यापुढचं प्रकरण आहे ‘आपले साप.’ यामध्ये कोकणात आढळणार्‍या बारा प्रकारच्या सापांची माहितीसकट छायाचित्रे आहेत. त्यापुढे ‘मैत्र जीवांचे’ या प्रकरणात आपण कोकणच्या प्राणिविश्वात प्रवेश करतो. यामध्ये कोकणात आढळणार्‍या कीटकांचे प्रकार, फुलपाखरांचे प्रकार, बेडकांचे प्रकार, कासवांचे प्रकार, पाली-सरडे असं कोकणचं निवडक प्राणिविश्व पाहायला मिळतं.

 
 

असं हे घरबसल्या कोकणच्या निसर्गाची रम्य सफर घडवून आणणारं पुस्तक! वास्तविक कोकणाचा निसर्ग अगाध आहे. तो अशा दीडशे पानांच्या छोट्या पुस्तकात मावणारा नाही, पण त्यातले निवडक घटक लेखकाने वेचलेले आहेत. निसर्गअभ्यासाची आवड असणार्‍यांनी एक संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवावं असं आहे. केवळ मोठ्या माणसांनाच नव्हे तर लहान मुलांनाही निसर्गाची आवड निर्माण करणारं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या शेवटून दुसर्‍या पानावर एक विचार करायला लावणारं, भावुक करणारं चित्र दिलं आहे. त्यात ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ असं ज्याला म्हणतात ते पळसाचं झाड दाखवलं आहे आणि त्यासोबत वणव्याचं चित्र आहे. या चित्रातून प्रत्येक वाचकाला लेखक प्रश्न करतो की, ‘आपल्याला काय हवं? ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ - पळस- उपकारक वनश्री? की फॉरेस्ट ऑन द फ्लेम - वणवा ?”

पुस्तकाचे नाव - निसर्गधन कोकणचे

लेखक - राम मोने

प्रकाशक- सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण

पृष्ठे -१४७,

मूल्य - रु. ३५०

@@AUTHORINFO_V1@@