‘इंडियन हिस्टरी कॉंग्रेस’ यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |

पंचावन्न वर्षांनंतर पुण्यात अधिवेशनाचा योग


 
 
 
पुणे : ‘इंडियन हिस्टरी कॉंग्रेस’ ही इतिहासकारांची अतिशय महत्त्वाची व प्रतिष्ठेची परिषद या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत होणार आहे. ही परिषद तब्बल ५५ वर्षांनी पुण्यात होत आहे.
 
 
‘इंडियन हिस्टरी कॉंग्रेस’ ही स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्थापन झालेली शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने १९३५ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. डेक्कन कॉलेजमध्ये १९६३ मध्ये या संस्थेच्या परिषदेचे आयोजन केले गेले होते. यानंतर पुण्यात ही परिषद प्रथमच होत आहे.
 
पुणे विद्यापीठात इतिहास विभागाची स्थापना सन १९६९ या वर्षी झालेली असून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या संस्थेची राष्ट्रीय पातळीवरील परिषद विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत सहभागी होण्याकरिता देशभरातून सुमारे ३००० इतिहास अभ्यासक येण्याचा अंदाज आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डाँ. राधिका सेशन यांनी दिली.
 
इंडियन हिस्टरी काँग्रेस ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था आहे. १९३५ मध्ये तत्कालीन 'निझाम हाऊस'मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या इतिहासाचे सखोल संशोधन करणे हे होते. संपूर्णतः लोकशाही तत्त्वांवर चालविण्यात येत असलेल्या या संस्थेच्या परिषदेमध्ये कोणत्याही व्यावसायिक इतिहासकारास वा अध्यापकास संशोधन मांडण्याची पूर्णतः मुभा आहे. किंबहुना वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून मांडण्यात आलेल्या संशोधनास संस्थेकडून जास्तीत जास्त उत्तेजन देण्यात येते. या तीन दिवसीय परिषदेमध्ये इतिहास क्षेत्रासंदर्भातील विविध विषयांवर सामान्यतः १५ समांतर सत्रे होतात व यांमध्ये साधारणतः ८०० ‘पेपर’ मांडण्यात येतात. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्यासहित अनेक प्रसिद्ध मराठा कालीन इतिहासाच्या इतिहासकारांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे या परिषदेशी वेगळेच नाते आहे! १९४८ मध्ये स्थापन झालेल्या तत्कालीन 'युनिव्हर्सिटी ऑफ पुना'चे पहिले कार्यालय हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील ‘निझाम गेस्ट हाऊस’ येथे स्थापन करण्यात आले होते. यानंतर १९४९ मध्ये विद्यापीठाचे कार्यालय गव्हर्नर हाऊसमध्ये हलविण्यात आले. इंडियन हिस्टरी काँग्रेसची स्थापनाही याच निझाम गेस्ट हाऊसमध्ये झाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@