मतिमंदांसाठी सक्षम आधार : आश्रय-माझे घर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |

आज वर्षपूर्तीनिमित्त नीला सत्यनारायण साधणार ‘संवाद’!

 
 
जळगाव, २३ जून :
सदैव समाजशील विचार करणार्‍या अन् समाजातील दुःख वाटून घेण्यात सिंहाचा वाटा उचलणार्‍या केशवस्मृती सेवासंस्था समुहाने मतिमंद मुलांची देखभाल करुन त्यांचा विकास करण्यासाठी प्रारंभ केलेल्या ‘आश्रय-माझे घर’ या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झालेय. या वर्षपूर्तीनिमित्त रविवार, २४ जून रोजी सायंकाळी ५ वा. कांताई सभागृहात निवृत्त आय.ए.एस.अधिकारी आणि ‘डाऊन्स सिन्ड्रोम’ झालेल्या आपल्या मुलाचा सांभाळ करणारी आई अशी दुहेरी भूमिका बजावणार्‍या नीला सत्यनारायण ‘संवाद स्वतःशी’ या विषयावर संवाद साधणार आहेत.
 
आपले मूल मतिमंद वा गतिमंद आहे असे डॉक्टरांनी सांगितले की, सर्वप्रथम हादरतात ते अशा मुलाचे आई-वडील आणि त्यानंतर कुटुंबीय. आपल्या ‘निरोगी’ घरात ‘असे’ मूल का जन्मास यावे ? हा निरर्थक प्रश्‍न त्यांना आयुष्यभर छळत असतो. कारण मतिमंदत्त्वामुळे अशा मुलांचा शारीरिक विकास होत असला तरी त्यांचा मानसिक विकास मात्र खुंटलेला असतो. त्यामुळे वयाच्या विपरीत वर्तन ते करतात. अशा मुलांना सांभाळणे, त्यांची देखभाल करणे अत्यंत अवघड होते. पालक मुलांची हेळसांड करतात. खरे तर, मतिमंदत्त्व हा आजार नाही तर ती एक अवस्था आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशात चार सुदृढ बालकांमागे एक मतिमंद बालक जन्माला येते. अशा या विशेष बालकाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या विकासावर त्याचा नकारात्मकच परिणाम होतो. आज देशात १५ लाख अशी विशेष मुले असल्याचे गृहीत धरल्यास, प्रत्येक मुलामागे तीन (आई, वडील व भावंडं) असे एकूण ४५ लाख कुटुंबीय या दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकले असावेत.
 
 
‘आश्रय’ची निर्मिती अशी झाली
अशा पालकांची होणारी अडचण दूर करण्यासाठीच गेल्यावर्षी बदलापूर (मुंबई) येथील ‘आधार’ संस्थेकडून प्रेरणा घेऊन केशवस्मृती सेवासंस्था समुहाने सावखेडा शिवारात निसर्गरम्य शांतीवन परिसरात मातोश्री वृध्दाश्रमाशेजारी ‘आश्रय-माझे घर’ हा १८ वर्षांवरील मतिमंद, गतिमंद आणि विफलांगांच्या पुनर्वसनासाठीचा प्रकल्प सुरू केला. २५ जणांची व्यवस्था असलेल्या ‘आश्रय’मध्ये सध्या ११ मुले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राहत आहेत. आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीही येथे कार्यशाळेद्वारे त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली जाते. त्यातून मिळालेल्या ज्ञानावर त्यांच्याकडून उदबत्ती, राख्या, कागदाची पाकिटे, पणत्या, आकाशकंदील आदी तयार करून घेतले जाते. त्यातून त्यांना सृजनशीलतेचा जसा आनंद मिळतो तसाच त्यांच्यातील क्षमताही कळतात. भविष्यात परिवारातीलच विवेकानंद प्रतिष्ठानच्या ‘श्रवण विकास मंदीर’ या मूकबधीर मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेशी ‘आश्रय’ची सांगड घालून येथे निर्मिती होणार्‍या विविध वस्तूंना स्वतंत्र बाजारपेठ मिळवून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
 
 
विविध उपक्रम
‘आश्रय’मध्ये खेळण्या - बाळगण्याबरोबरच आषाढी एकादशी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, रक्षाबंधन, दसरा, दिवाळीसोबतच या मुलांचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यांची सहलही निघते.
 
 
अनेकांना हातभार
मतिमंद मुलांचे आयुष्य फुलवणारा हा उपक्रम सेवाभावी तत्त्वावर सुरू आहे. त्याला आपणही विविध रूपात सहकार्य आणि मदत करू शकता. त्यामुळे या मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल आणि आत्मनिर्धार करता येईल. त्यादृष्टिने समाजातील अनेक मान्यवर सेवाभावी वृत्तीने झटत आहेत. आपला वेळ, श्रम आणि अर्थसाह्याद्वारे या मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवत आहेत. आपणही आपला खारीचा वाटा उचलू शकता. त्यासाठी ९६०७३०८१९१ या क्रमांकावर संपर्क साधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
 
 
प्रमुख पुरस्कार
* केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कार. * महात्मा गांधी पुरस्कार. * भारत निर्माण पुरस्कार. * महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार. * महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार. * डी.वाय.पाटील विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार. * महाराष्ट्र शासनाचा स्त्री गौरव पुरस्कार आदी.
 
‘संवाद स्वतःशी’
‘आश्रय’च्या वर्षपूर्तीनिमित्त निवृत्त आय.ए.एस.अधिकारी, राज्याच्या प्रथम महिला निवडणूक आयुक्त आणि ‘डाऊन्स सिन्ड्रोम’ झालेल्या मुलाचा सांभाळ करणार्‍या कर्तव्यदक्ष माता नीला सत्यनारायण या ‘संवाद स्वतःशी’ विषयावर आज उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. त्यांनी या मुलाचा सांभाळ कसा केला हे सांगणार्‍या ‘एक पूर्ण अपूर्ण’ या पुस्तकामुळे त्या प्रसिध्द आहेत. त्यांचे मनोगत घरी मतिमंद मूल असलेल्या पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
नीला सत्यनारायण
* १९७२ च्या बॅचच्या आय.ए.एस.
* ४२ वर्षे केले काम.
* १५० वर कविता, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन
* त्यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती. त्याच्या संगीतकारही त्याच होत्या.
* दूरदर्शनच्या ‘सखी सह्याद्री’साठी मालिकांचे लेखन.
* आता ‘आरोही’ शिर्षकांतर्गत त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतील.
 
@@AUTHORINFO_V1@@