आरोपीच्या सुचनेनुसार तपासाधिकारी बदललाच कसा?...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |

आ.एकनाथराव खडसे यांचा पत्रकार परिषदेत सवाल

 
 
जळगाव, २३ जून :
आरोपीच्या सुचनेनुसार तपासाधिकारी बदललाच कसा?... अंजली दमानिया आणि अन्य बड्या हस्तीना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, तो आपण हाणून पाडू... असे खणखणीत प्रतिपादन माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत केले.
 
 
आपल्याला बदनाम करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करण्यामागे अंजली दमानिया असल्याचे निष्पन्न होत आहे. यात कट कारस्थान केल्याप्रकरणी चोपडा अर्बन बँकेच्या माजी व्यवस्थापकसह चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश झालेला आहे. त्यात सृत्रधाराचा शोध आणि या बर्‍याच गोष्टी बाहेर येतीलही. आपण फिर्यादी असलेल्या प्रकरणात मुक्ताईनगरचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्यावर अविश्‍वास दाखवून दुसरा तपासाधिकारी नेमण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक आहे, आपण दाखल केलेल्या खटल्यात आरोपी क्रमांक १ असलेल्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ३ दिवसांपूर्वी पोलीस अधिक्षकांना मेल करुन केलेल्या मागणीचा हा परिणाम आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 
 
आरोपीच्या म्हणण्यावरुन तपासाधिकारी बदलण्याचा हा प्रकार पूर्णत: बेकायदा आणि संबंधित अधिकार्‍यावर अविश्‍वास दाखवणारा आहे...अशी कोणत्याही कायद्यात तरतूद नाही...एकवेळ फिर्यादीची तक्रार असेल, मागणी असेल तर ते एकवेळा ठीक आहे, पण हे कसे?...दमानिया यांनी ३ दिवसांपूर्वी हा मेल पाठवलेला आहे, त्यांच्या दबावामुळे चक्क सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती झाली आहे.
 
 
मोठा आर्थिक व्यवहार किंवा बड्याचा दबाव हे कारण?...
एकतर यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, किंवा कुणीतरी बड्या व्यक्तीच्या दबावामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे. कारण या कटकारस्थानात बडे मासे, भरपूर लोक अडकले असावेत...माझ्यासारख्या संघर्ष करणार्‍या व्यक्तीच्या बाबतीत असे घडू शकते तर सर्वसामान्यांचे काय?...मी न्याय मागायचा कुणाकडे?...असा सवालही त्यांनी केला. याबाबत आपण खंडपीठात दाद मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांना तर बढती मिळेल, पारितोषिकही मिळेल !...
बडे मासे, आरोपींना पाठीशी घालण्यासाठी तपासाधिकारी बदलण्याची मागणी मान्य करीत पोलीस अधिक्षकांनी जी मनमानी आणि बेकायदा कृती केली, त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. कदाचित याबाबत दत्तात्रय कराळे यांना त्यांना बढतीचे पारितोषिकही मिळेल... अशा शब्दात आ.खडसे यांनी जोरदार हल्ला चढवत चिमटे काढले.
 
 
उदय वाघ:चौकशी होईपयर्र्तच्या काळात तरी त्यांचा राजीनामा हवा...
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व जिल्हा बँक संचालक अनिल पाटील आणि भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष उदय वाघ त्यांच्यातील वाद, कथित सीडीसंबंधीच्या वादातील पृच्छेवर आ.खडसे म्हणाले की, मी ४० वर्ष पक्षाचे काम केलेले आहे, माझ्या पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीने जर सीडी खोटी असेल तर मला आनंदच वाटेल आणि तसेच निष्पन्न होवो... पण जर मला आरोपींमुळे मंत्रीपद सोडावे लागत असेल तर चौकशी होईपयर्र्तच्या काळात तरी त्यांचा राजीनामा हवा, त्यांच्यावर आरोप करणार्‍या कंजरला शिक्षा व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पक्षाचे प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करुनच आपण हे बोलत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
लढणे हा माझा स्वभाव आहे, नियमाबाहेर बोलत असेल तर मला शिक्षा करा, असेही आ.खडसे म्हणाले. यावेळी आ. सुरेश भोळे, माजी आ.डॉ.गुरुमुख जगवाणी, दीपक फालक, अशोक लाडवंजारी, विशाल त्रिपाठी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@