आ. सत्तारांचे स्वप्न मोठे पण, कॉंग्रेसची वाट बिकट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |
 
 
जळगाव मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘भोपळा’ फोडण्याचे स्वप्न पाहत कॉंग्रेस पक्ष कामाला लागला असला, तरी त्याची वाट बिकट असणार आहे. शून्याच्या अलीकडे की, पलीकडे कोणता अंक लिहायचा हे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात असेल. त्यासाठीची तयारी मात्र, कसून करावी लागेल. अनुभवी व ज्येष्ठांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत बसवून लोकांमध्ये मिसळून काम करणारे तरुण नेतृत्त्व पुढे आणावे लागेल.  
 
 
पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्त्वात प्रदेश सरचिटणीस व जिल्ह्याचे प्रभारी विनायकराव देशमुख, सहप्रभारी डॉ. हेमलता पाटील, श्याम उमाळकर यांची नियुक्ती केली आहे.  आ. सत्तार यांचा स्वभाव आक्रमक आहे. पक्षाने जबाबदारी सोपविली म्हटल्यावर त्यांना सगळे काही  स्वतःच्या हिशेबाने व्हायला हवे, असे वाटणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनीही जळगावचे तीन वेळा दौरे करून पक्षसंघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या दौर्‍यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ‘भाऊगर्दी’ असतेच. तशी ती यावेळीही होती.
 
 
पक्षात वरवरचे चित्र खूप छान दिसत असले तरी वास्तव मात्र, वेगळे आहे. दिसते तसे अनुकूल नाही. मागचा आढावा घेता असे दिसते की, सन १९८५ मध्ये नगरपालिकेत २२ नगरसेवक, १९९४ मध्ये १८ तर १९९६-९७ मध्ये ६ नगरसेवक कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. याचाच अर्थ क्रमाने संख्या घटत गेली आहे. ती घटण्याचे कारण काय? याचा शोध कॉंग्रेस नेत्यांनी कधी तरी घेतला आहे का? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांनी विचारल्यास त्यांना काय उत्तर देणार? जळगावला सन २००३ मध्ये महापालिका झाली तेव्हापासून तर आजपर्यंत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक महापालिकेत निवडून आलेला नाही. ही पक्षाची ‘भीषण’ स्थिती काय दर्शविते? पक्षात पूर्वी उत्साही उमेदवारांची गर्दी असायची. ते निवडणूक लढवायचे पण यंदा तर इच्छुकांचीही वानवा दिसत आहे. मुळात जळगाव महापालिका क्षेत्रात पक्षाला जनाधार आहे का? हे शोधावे लागले. इथपासून सुरुवात केली तर भविष्यात काही तरी निष्कर्षाप्रत जाता येईल. 
 
 
आ. अब्दुल सत्तार यांना पक्षाला पुढे न्यायची इच्छा मनापासून असेल तर पक्षातील मातब्बरांना थेट मैदानात उतरविले पाहिजे. शहरात लेवा समाजाचे संख्याबळ लक्षणीय आहे. पक्षातील लेवा समाजाच्या नेत्यांनीही तशी इच्छाशक्ती दाखविणे आवश्यक आहे. पक्षाने आग्रहपूर्वक निष्ठावान, स्वच्छ चारित्र्य आणि राष्ट्रीय विचारांचे उमेदवार रिंगणात उतरविल्यास विरोधकांना चाप बसू शकतो. 
 
 
१९ प्रभागातील सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिल्यास पक्षाची ताकद किती आहे हे आजमावता येईल, अशीच आशा कार्यकर्त्यांनाही आहे. खा. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आ. अब्दुल सत्तार कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या मनःस्थितीत नक्कीच असतील. फक्त प्रश्‍न एवढाच आहे की, ‘शून्याच्या अलीकडे की, पलीकडे कोणता अंक लिहायचा याचे ‘लक्ष्य’ आ. सत्तार यांना निश्‍चित करावे लागेल’.
 
 
काम करणार्‍यांना संधीची प्रतीक्षा
प्रदेश उपाध्यक्ष, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार शिरीष चौधरी यांचा भर ग्रामीण भागावर आहे. तेथे त्यांनी मेहनतीने आपली फळी उभारली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैया पाटील हे आपले कार्यक्षेत्र नाही म्हणून अजूनही जळगाव शहरापासून अलिप्त आहेत. शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे यांना निवडणुकीत कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. भंगाळे कुटुंबावर  ‘मल्टी पार्टी’ म्हणून शिक्का बसलेला आहे. ते आपल्याच कुटुंबातील भाजपचे आ. सुरेश भोळे, खाविआचे नगरसेवक विष्णु भंगाळे यांच्या विरोधात आक्रमकपणे कॉंग्रेसची खिंड लढवतील का? असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे. शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून दारू दुकानांवर बंदी, समांतर रस्ते, स्वच्छता मोहीम, आरोग्यविषयक जनजागृती आदी बरीच कामे केली. महापालिका प्रशासनाला वेळोवेळी उघडे पाडण्याचे काम त्यांनी केले. पण ते अजूनही पक्षात चांगल्या संधीच्या शोधात दिसतात. 
@@AUTHORINFO_V1@@