दारी उभ्या विजयाचे स्वागत करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |




२०१२ साली भाजपने पुन्हा संजय केळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे निरंजन वसंत डावखरे यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत संजय केळकर यांचा पराभव झाला होता. निरंजन वसंत डावखरे विजयी झाले होते.

 

देशभरात विविध घटना घडत आहेत. समाजकारण, अर्थकारण ढवळून निघत आहे. जम्मू-काश्मीर सध्या केंद्रबिंदू आहे. आपल्या दैनंदिन कामांची धडपड करणारे समाजमानसही व्यक्त होत आहेत. क्रिया-प्रतिक्रियांचा कोलाहल वाढत आहे. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणाऱ्या घटना वेगाने व्हायरल होत आहे. याच सगळ्या गदारोळात कोकण पदवीधर मतदार संघासाठी उद्या, दि. २५ जून रोजी होत आहे. कोकणातील पदवीधर मतदार स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देत मतदान करतील. मात्र, कोकण विकासासाठी प्रभावी उमेदवार निवडताना अन्य राष्ट्रीय मुद्द्यांचा हे सुशिक्षित मतदार निश्चित विचार करतील असे जाणवत आहे. कोकण पदवीधर निवडणुकीत विजय भाजपच्या दारात उभा आहे. केवळ दार उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे. भाजपला त्या विजयाचे स्वागत करण्यासाठी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कठोर परिश्रम करावे लागतील. मेहनतीने मिळवलेला विजय अधिक आनंद देणारा ठरेल.

 

कोकण पदवीधर मतदार संघ अस्तिवात आल्यापासून या मतदार संघाची सहावी निवडणूक दिनांक २५ जून रोजी होत आहे. सलग चारवेळा ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने जिंकली होती. भाजपचे वसंतराव (अप्पा) पटवर्धन, प्रा. डॉ. अशोकराव मोडक, संजय केळकर यांनी यश मिळवले होते. वसंतराव पटवर्धन आणि संजय केळकर यांनी एकदा तर, अशोकराव मोडक यांनी दोन वेळा विजय मिळवला होता. २०१२ साली भाजपने पुन्हा संजय केळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे निरंजन वसंत डावखरे यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत संजय केळकर यांचा पराभव झाला होता. निरंजन वसंत डावखरे विजयी झाले होते.

 

विजयाच्या जवळ असलेले निरंजन डावखरे

 

आता सहा वर्षांनी २०१८ साली संदर्भ कोकण पदवीधर मतदार संघाचे संदर्भ बदलले आहेत. ज्या निरंजन वसंत डावखरे यांनी भाजपाला हरवून विजय मिळवला होते तेच निरंजन डावखरे आज भाजपचे उमेदवार झाले आहेत. ही निवडणूक भाजपा आणि निरंजन डावखरे यांच्यासाठी महत्वाची आहे. पुन्हा जिंकणे दोघांसाठी अत्यावश्यक आहे. निवडणूक जिंकल्यास भाजपाला आपला बालेकिल्ला मिळविल्याचा आनंद घेता येणार आहे. निरंजन डावखरे यांना आपल्या पहिल्या कारकीर्दीवर पसंतीची मोहर उमटवून घेतल्याचा आनंद मिळणार आहे. निरंजन डावखरे यांनी गेल्या सहा वर्षात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचा कोकणच्या पाचही जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. सौम्य, सौजन्यशील वर्तन ही त्यांची जमेची बाजू आहे. उमेदवार म्हणून त्यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा उभी केली आहे. पाचही जिल्ह्यांचा त्यांनी दोन वेळा दौरा पूर्ण केला आहे. मतदारांपर्यंत पोहचलेल त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट परिणामकारक आहे. मिशन एज्युकेशन हे त्यांचे अभियान उपयोगी आहे. आजतरी निरंजन डावखरे यांचे पारडे जड आहे. भाजपच्या विजयाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. कोकणातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला आहे.

 

दिवगंत वसंत डावखरे

 

वसंत डावखरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मतदार संघात पेरलेली नोंदणी निश्चित उपयोगी ठरेल. त्यांची सर्वपक्षीय मैत्री, विविध संस्था-व्यक्तींशी असलेले संबंध कामी येतील. त्यांना आठवून निरंजन डावखरे यांना ठोस समर्थन दिले जाईल. निरंजन डावखरे यांना आपल्या वडिलांच्या कामाचा लाभ होईल.

 

शिवसेना रिंगणात

 

शिवसेनेने पहिल्यांदा कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण आणि शिवसेना यांचे एक वेगळ नातं आहे. मुंबईत स्थापन झालेल्या शिवसेनेची नाळ कोकणाशी जोडलेली आहे. पदवीधर मतदार संघ जिंकून कोकणातील सुशिक्षित मतदार आपल्या बरोबरच असल्याचे सिद्ध करण्याची शिवसेनेची धडपड आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती संजय मोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. उमेदवार संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहेत. ते वागळे इस्टेट येथील शिवसैनिक आहेत. संजय मोरे यांची उमेदवारी ठाण्यातील काही ज्येष्ठ शिवसेना नेत्यांमध्ये काहीशी नाराजी निर्माण करणारी असावी. वागळे इस्टेट मधील शिवसैनिकाची पुन्हा वर्णी लागल्याने शहराच्या उर्वरित भागात कुजबुज होणे गैर नाही. संजय मोरे यांचा प्रवास महापौर पदापर्यंत झाला आहे. त्यांना अन्यही पद मिळाली आहेत. त्यामुळे पुन्हा तेच नाव आल्याने काही जणांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे.

 

राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला

 

राष्ट्रवादी पक्षाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. नजीब मुल्ला हे ठाणे महानगरपालिकेतील हुशार,स्मार्ट नगरसेवक म्हणून ओळखले जातात. ते राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणूनही परिचित आहेत. महत्वाकांक्षी असलेले नजीब मुल्ला केवळ महापालिकेच्या सभागृहात यापुढे फार काळ रमणार नाहित. त्यांनाही विधिमंडळ खुणावत असणार. पण, कळवा-मुंब्रा विधानसभेवर जितेंद्र आव्हाड यांची मोनोपोली असल्याने ते मतदार संघाच्या शोधात आहेत. कोकणातील विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही मुस्लिम मतं मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मुस्लिम उमेदवारीच्या आधारे दलित मतं मिळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करेल. परंतु, राष्ट्रवादीला दलित मतं गृहित धरता येणार नाहित. नजीब मुल्ला यांची उमेदवारी जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या विधानसभेसाठी उपयोगी ठरेल. अर्थात कोकणातील राष्ट्रवादी नजीब मुल्ला यांना पूर्ण समर्थन देणार का? हा कळीचा मुद्दा आहे. नजीब मुल्ला यांच्या जिंकण्याने निर्माण होणारा स्पर्धक राष्ट्रवादीत आज कोणाला हवा आहे ? दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक गट अजूनही राष्ट्रवादीत आहे. त्या गटाला निरंजन डावखरे यांचा विजय सोयीचा ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांचा विजय सुलभपणे झाला होता. त्याची उतराई करण्यासाठी राष्ट्रवादीतील काहीजण भाजपला सहकार्य करतील असे वाटते. कोकणातील शिल्लक असलेली काँग्रेस नजीब मुल्ला यांना प्रथम पसंती देण्याची शक्यता कमी आहे.

 

शेकापचे जयंत पाटील

 

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांची भूमिका महत्वाची ठरते. शिक्षण संस्थासह विविध संस्थांचे रायगड जिल्ह्यात शेकापचे जाळे आहे. शेकापची मत एक गठ्ठा असतात. रायगड जिल्ह्यातील राजकारणाची दिशा शेकाप ठरवते. शेकापची मतदारांवर पकड आहे. जयंत पाटील काय करणार? यावर रायगड जिल्ह्यातील पदवीधर मतं कुणाच्या झोळीत पडणार हे ठरेल.

 

हितेंद्र ठाकूर यांची भूमिका

 

भाजप उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार उभा करणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्वाची ठरेल. दिवगंत वसंत डावखरे यांच्या मैत्रीची आठवण ठेवून ते आपले पाठबळ निरंजन डावखरे यांना देतील असे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातील काही भागातील बविआची मतदार नोंदणी निरंजन डावखरे यांच्या विजयात नेमकी भूमिका बजावेल.

 

नोंदणीवरची पकड महत्वाची

 

कोकण पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणीत भाजपाची यंत्रणा आणि उमेदवार निरंजन डावखरे यांची नोंदणी नेमकी असल्याचे मानले जात आहे. या मतदारांना मतदानाच्या दिवसापर्यंत संपर्क करण्याची योजना कार्यरत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेनेही नोंदणी करण्यात पुढाकार घेतला होता. नजीब मुल्ला यांनी शेवटच्या टप्प्यात नोंदणी केल्याची चर्चा आहे. सदर निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. मतदान पसंतीच्या क्रमाकांने होते. उमेदवार किंवा पक्ष यांनी नियोजित पद्धतीने आपल्या समर्थकांची केलेली नोंदणी या निवडणुकीत उपयुक्त ठरते. मतदार नोंदणीवर ज्याची हुकमी पकड तो या निवडणुकीत वरचढ ठरतो.

 

विजयश्री चे स्वागत व्हावे

 

निवडणूक कोकणातील असो की अन्य कुठल्याही मतदार संघाची त्याचे यशापयश पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले जाते. त्यामुळे कोकणातील भाजपाची जबाबदारी अधिक आहे. यापट्ट्यातील लोकप्रतिनिधीना विशेष लक्ष घालावे लागेल. संघटनेला अधिक काळजी घ्यावी लागेल. समविचारी संघटनांना शेवटच्या टप्प्यात जोडावे लागेल. कोकण जिंकून समर्थकांमध्ये विश्वास जागवावा लागेल. भाजप विरोधकच मतदारांना भाजपचे समर्थन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. विजयश्री भाजपच्या दारात उभी आहे. कार्यकर्त्यांनी केवळ पुढाकार घेऊन स्वागत करण्याची गरज आहे.

मकरंद मुळे

राजकीय-सामाजिक विश्लेषक

mak2244gamil.com

8108000564

@@AUTHORINFO_V1@@