कॉंग्रेस नेत्याचे पुन्हा एकदा 'काश्मीर स्वातंत्र्या'चे विखारी फूत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



श्रीनगर, दि. २२ (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी ‘काश्मिरी लोकांची पहिली प्राथमिकता ही स्वातंत्र्य मिळवणे आहे’ असे धक्कादायक वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. एकीकडे अशांततेच्या विळख्यात सापडलेल्या काश्मीर खोऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या काश्मीरमधील ज्येष्ठ नेत्याने अशी देशद्रोही गरळ ओकल्याने सोझ यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.

सैफुद्दीन सोझ म्हणाले की, काश्मीरच्या लोकांची पहिली प्राथमिकता ही स्वातंत्र्य मिळवणे आहे. हे माझे वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले.काश्मिरी लोकांना त्यांना ना भारतात राहायचे आहे ना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे आहे. काश्मीरच्या लोकांना शांततेची गरज आहे,असेही त्यांनी सांगितले. आपल्या या वक्तव्याशी काँग्रेसचा काहीच संबंध नसून मी वैयक्तिकरित्या काश्मीरच्या लोकांच्या वतीने हे बोलत असल्याचेही सोझ यांनी स्पष्ट केले. सैफुद्दीन सोझ हे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ राजकारणात असून काश्मीरमधील तसेच केंद्रीय स्तरावरील काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. सोझ हे मनमोहनसिंग सरकारच्या काळात केंद्रात मंत्री होते तसेच जम्मू व काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. तसेच दीर्घकाळ ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही सक्रीय आहेत.

पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांनी नुकतेच, ‘मतदानाची वेळ आली तर काश्मीरचे लोक भारत किंवा पाकबरोबर जाण्यापेक्षा स्वतंत्र राहणे पसंत करतीलअशा आशयाचे वक्तव्य केले होते. मुशर्रफ यांच्यासारख्या नेत्याच्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष समर्थन सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या एका ज्येष्ठ आणि जबाबदार काँग्रेस नेत्याने केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मिडियावर सर्वसामान्य नागरिकांनीही या देशद्रोही वक्तव्यावर टीका केली असून यामुळे सोझ यांच्यासारखे नेते व काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आल्याचीच भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हे ना‘पाक’ इरादे कधीही सफल होणार नाहीत !

सैफुद्दीन सोझ यांच्या या विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील विशेषतः काश्मीर खोऱ्यातील जनता भारतापासून विलग होण्याच्या भूमिकेत आहे, हा त्यांचा भ्रम आहे. गेल्या अनेक निवडणुकांत अतिरेक्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलेले असतानाही खोऱ्यात जनतेने नेहमीच भरभरून मतदान केले होते. त्यामुळे सोझ यांच्यासारख्या नेत्यांचे ना‘पाक’ इरादे कधीही सफल होणार नाहीत. तसेच, नुकत्याच हुतात्मा झालेल्या औरंगजेबासकट देशातील जवानांनी काश्मीरसाठी सांडलेले रक्त वाया जाणार नाही, असा आम्हाला विश्वास वाटतो.”

-आ. अतुल भातखळकर

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भाजप

@@AUTHORINFO_V1@@