मनाला भिडणारी संवेदनाः झिपर्‍या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



अरुण साधू यांच्या लिखाणातून सर्वच समाजाचे प्रतिबिंब पडलेले आपणास जाणवेल. त्यांनी त्यांच्या लिखाणात समाजातील विविध घटकांना सामावून घेतले आहे.

झिपर्‍या ही सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांची वास्तवाला धरून लिहिलेली वास्तववादी कादंबरी.रेल्वे स्टेशनवर बूटपॉलिश करणार्‍या मुलांचे जीवन व्यथित करणारी, मनाला भिडणारी खरीखुरी संवेदना ’झिपर्‍या’मधून जाणवते. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये ‘झिपर्‍या’ ला पाच नामांकने मिळाली.

 

अरुण साधू यांचे लिखाण हे मनाला भिडणारे, मानसिकतेला हात घालणारे आणि विचार करायला लावणारे आहे. मुंबईमधील उच्च वर्ग असो किंवा सर्वसामान्य माणूस असो, त्यांच्या लेखातून, कथा-कादंबरीतून त्याचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्याच ‘झिपर्‍या’ या गाजलेल्या कादंबरीवर ए. आर. डी. प्रॉडक्शन आणि दिवास प्रॉडक्शन या चित्रपट संस्थेतर्फे ‘झिपर्‍या’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून निर्मिती रणजीत दरेकर यांची आहे. प्रस्तुतकर्त्या अश्विनी रणजीत दरेकर या असून सहनिर्माता अथर्व पवार क्रिएशन आहे. कथा अरुण साधू यांची असून पटकथा-संवाद-दिग्दर्शन केदार वैद्य यांचे लाभले आहे. संगीताची बाजू समित सप्तीस्कर- ट्रोय- अरिफ यांनी सांभाळली आहे. संकलन देवेंद्र मुर्डेश्वर आणि पार्श्वसंगीत तौफिक कुरेशी यांचे आहे. छायाचित्रण राजेश नडोने यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अमृता सुभाष, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर हे कलाकार असून त्यांनी आपापल्या व्यक्तिरेखा उत्तम साकारलेल्या आहेत.
 
 

माणूस कुठे जगतो त्यापेक्षा तो कसा जगतो याचे चित्रण या सिनेमात बघायला मिळेल. अनेक माणसे परिस्थितीशी झगडून, त्यांच्यासमोर येणार्‍या संकटाशी सामना करीत जीवन जगत असतात, बूटपॉलिशचा व्यवसाय करणार्‍या मुलांचे जीवन कसे असते, रेल्वे स्टेशनवर त्यांना बूटपॉलिश करावे लागते. सर्वसामान्य माणसाचे जीवन त्यांना जगायचे असते पण परिस्थिती आणि नियती त्याला तसे जगायला देत नाही. अशी एक संवेदनशील कथा ‘झिपर्‍या’ मध्ये मांडली आहे. झिपर्‍या बूटपॉलिश करून जीवन जगतो पण तो कोणाकडे भीक मागत नाही.

 
 

किसना उर्फ झिपर्‍या हा रेल्वे स्टेशनवर बूटपॉलिश करून आपली उपजीविका करीत असतो. त्याला एक लीला नावाची बहीण आणि आई असते. त्याचा मित्र-परिवार हा मोजकाच पण त्याच्यावर प्रेम करणारा असतो. त्याच्या मित्रपरिवारात नार्‍या, असलम, पोम्ब्या, गंजू, दाम्या असे मित्र असतात, सर्वजण बूटपॉलिश करून जे मिळेल ते त्यांचा दादा पिंगल्यादादा याच्याकडे आणून देतात आणि मग पिंगल्या ते पैसे स्वतःकडे जास्त ठेऊन इतरांना वाटून टाकतो. बूटपॉलिशचा धंदा करताना त्यांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागते, आजूबाजूला असलेला इतर कंपू त्यांना त्रास देत असतो, बूटपॉलिशचा धंदा करताना त्यांना परवाना मिळालेला नसतो, त्यामुळे त्यांना पोलिसांचे हप्ते द्यावे लागतात. एक दिवस पिंगल्या आणि झिपर्‍या यांच्यात भांडण होते आणि त्यामध्ये पिंगल्याचा अपघाती मृत्यू होतो. आता झिपर्‍याकडे सारी सूत्रे येतात, पण झिपर्‍या मिळालेल्या पैशाची समान वाटणी करतो. बूटपॉलिश करणार्‍या सर्वांची जबाबदारी झिपर्‍यावर असते.

 
 

झिपर्‍या हा काही दादागिरी करणारा मुलगा नाही. त्याच्या ग्रुपमध्ये नार्‍या नावाचा मुलगा असतो. हा मारामारी करण्यात पटाईत असतो. झिपर्‍या जे सांगेल ते तो ऐकतो, झिपर्‍या ज्या ज्या वेळी संकटात येतो त्यावेळी नार्‍या त्याला मदत करतो, एक दिवस नार्‍याला घेऊन झिपर्‍या घरी येतो, पण तिथे तो टिकत नाही, काही कारणामुळे त्याला तिथून बाहेर जावे लागते. नार्‍या साधाभोळा असल्याने त्याच्यावर ही पाळी येते, असलम हा झिपर्‍याचा दुसरा मित्र. याला सिनेमाचे वेड असते, फिल्मी संवाद म्हणून दुसर्‍यावर छाप मारायची, हे त्याला चांगले जमते. तसा तो बोलबच्चन असतो, झिपर्‍याला लीला नावाची बहीण असते. ती पारसी बाईकडे कामाला असते, पारसी बाई तिला सांगते की, तू ती वस्ती सोडून माझ्याबरोबर राहा, पण लीला काही ऐकत नाही. एक दिवस ती झिपर्‍याला घेऊन पारशी बाईकडे जाते. बाई त्याला सांगते की, तू शाळा शिक. मोठा हो, शिक्षण हे महत्त्वाचे आहे. झिपर्‍या शाळेमध्ये जायला लागतो. तो आपल्या मित्रांनासुद्धा शाळेत घेऊन जातो.

 
 

एक दिवस झिपर्‍याच्या लक्षात येते की, धंदा आपल्याला बंद करावा लागणार, कारण हल्ली कोणीच बूटपॉलिश करून घेत नाहीत, मग दुसरा धंदा करायचा यासाठी तो आपल्या मित्रांना सांगतो की, तुम्ही तुमच्या आवडीचा धंदा करा, कारण आता या धंद्यामध्ये काही राहिलेलं नाही. त्यात त्या रेल्वे स्टेशनमधील पक्या दादाबरोबर त्याचे भांडण होते. ते नेमके काय आणि कशामुळे घडते हे सारे ‘झिपर्‍या’ सिमेनात कळेल.

 
 

मुंबईसह अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूटपॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील. ‘झिपर्‍या’ चित्रपट अशाच मुलांभोवती फिरणारा आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूटपॉलिश करणार्‍या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरीसुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपर्‍याला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपर्‍या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शनमध्ये नेमकं काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात. या कथेत असलेलं एक गूढ आणि त्याभोवती घेरलेलं झिपर्‍याचं आयुष्य आहे, तर दुसर्‍या बाजूला दारिद्य्र, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो धडपड करत आहे. वास्तवदर्शी चित्रीकरण, वेगवान कथानक आणि आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी हे झिपर्‍याचे मुख्य मुद्दे आहेत. झिपर्‍यामध्ये सामाजिक आशय आहे, त्या मुलांची मानसिकता-समाजाकडे बघण्याची भावना त्यांनी आणि समाजाबरोबर जोडलेलं एक वेगळ्या प्रकारचे नाते यामध्ये चित्रित केले आहे. झिपर्‍यामध्ये झिपर्‍याबरोबर नार्‍या, असलम आणि लीला या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारलेल्या आहेत, झिपर्‍यामध्ये सर्वच कलाकारांची कामे सुरेख झाली आहेत. प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिरेखा समजलेल्या आहेत. दिग्दर्शक केदार वैद्य यांनी चित्रपट उत्तम बंदिस्तपणे सादर केला आहे, कथेमधील व्यक्तिरेखा त्या त्या कलाकरांनी फुलवल्या आहेत. बूटपॉलिश करणार्‍या मुलांचे जीवन कसे असते? त्यांना कोणत्या संकटाना सामोरे जावे लागते? हे सारे चित्रण सिनेमात आहे, चिन्मय कांबळी याचा झिपर्‍या, अमृता सुभाष हिने लीला अप्रतिम सादर केली आहे, नार्‍याच्या भूमिकेला सक्षम कुलकर्णी यांनी न्याय दिलेला आहे. त्याचा साधेपणा त्याने छान व्यक्त केलाय, असलमच्या भूमिकेत प्रथमेश परब लक्षात राहातो. याशिवाय नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर यांच्या भूमिका यथायोग्य आहेत. एकंदरीत झिपर्‍या एकदा नक्की पाहायला आवडेल. समाधान देईल.

दीनानाथ घारपुरे

@@AUTHORINFO_V1@@