भारतीय मुस्लीम जगात सर्वोत्तम : राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय मुसलमान जगातील सर्वोत्तम मुसलमान आहे अशी भावना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. ते मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या वतीने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ईद मिलन’ समारंभात बोलत होते. राजधानीत संसद सभागृहाच्या अनेक्सीत हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मंचाचे संरक्षक आणि मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते इंद्रेश कुमार, मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल, गिरीश जुयाल, अबू बकर नकवी, डॉ शहीद अख्तर आणि विराग पाचपोर यावेळी मंचावर उपस्थित होते. तसेच अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ मोहम्मद शब्बीर, केंद्रीय हज कमिटीचे माजी अध्यक्ष तन्वीर अहमद, भाजपा अल्पसंख्य मोर्चाचे अनेक नेते, मंचाचे प्रदेश स्तरावरचे संयोजक आणि प्रतिष्ठित मुस्लीम, ख्रिश्चन आणि अन्य धर्मीय नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते.
 
 
आपल्या छोटेखानी भाषणात गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की भारतातील मुस्लीम हे नाइलाज म्हणून भारतात राहत नसून स्वेच्छेने त्यांनी भारतात राहणे पसंत केले आहे. अन्यथा ज्यावेळी देशाचे विभाजन झाले तेव्हाच ते पाकिस्तानांत निघून गेले असते. पण ते गेले नाहीत. भारतीय मुसलमान हे जगातील मुसलमानांच्या तुलनेत सर्वोत्तम आहेत असे माझे मत आहे असे राजनाथ सिंह म्हणाले त्यावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने आणि ‘भारत माता कि जय’ च्या घोषणांनी दणाणून गेले होते. सिंह म्हणाले की माझ्या या म्हणण्याला आधार आहे. आज जगात २१ मुस्लीम देश आहेत पण इस्लामचे जे ७२ पंथ (फिरके) आहेत ते या २१ देशांत आढळून येत नाहीत तर भारत हा एकमात्र असा देश आहे कि जेथे हे सर्व ७२ पंथाचे मुस्लीम आहेत आणि शांततेने, गुण्या-गोविंदाने राहत आहेत. हीच भारताची शक्ती आहे, भारतीय संस्कृतीची ही विशेषता आहे.
 
 
 
मुस्लीम राष्ट्रीय मंच इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनात समाजाला जोडण्याचे जे महत्वपूर्ण काम करीत आहे त्याबद्दल मंचाचे आणि इंद्रेश कुमारजींचे कौतुक गृहमंत्र्यांनी यावेळी केले. आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाप्रती आपले प्रथम कर्तव्य आहे याची जाणीव देखील त्यांनी यावेळी करून दिली.
 
 
राजनाथ सिंह कार्यक्रमात आले त्याच्या काही तास आधीच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता त्यामुळे त्यासंदर्भात गृहमंत्री काही बोलतात का याकडे सभागृहाचे लक्ष होते. राजनाथ सिंह म्हणाले कि जम्मू-काश्मीर मधील परिस्थितीची कल्पना सर्व देशाला आहे. रमजानच्या महिन्यातील ‘सीझ-फायर’चा निर्णय कसा न्याय्य होता हे सांगतांनाच त्यांनी या पवित्र महिन्यात ज्यांनी हिंसक घटना घडवून आणल्यात ते इस्लामचे आणि मुसलमानांचे ‘मसीहा’ कसे असू शकतात असा प्रश्नही उपस्थित केला. हा कोणता इस्लाम आहे? कुठला इस्लाम आहे? असे प्रश्नही त्यांनी या प्रसंगी उपस्थित केले.
 
  
 
देशातील सर्व नागरिकांनी याबाबतीत अतिशय गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा देश जाती, पंथ, मजहब यांच्या आधारावर चालणार नाही. ज्याला जो पंथ, मजहब मानायचा असेल त्याने त्याप्रमाणे चालावे पण देश पुढे जाईल तो न्याय आणि मानवता यांच्या आधारानेच असे सिंह यावेळी म्हणाले. देशाच्या प्रगतीत कोणत्याही प्रकारची अडचण, व्यवधान निर्माण होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी राहणार आहे. हिंदू जर आपल्या धर्माचे पालन करीत असतील तर त्यांत कोणतेही विघ्न किंवा अडचण येणार नाही याची काळजी जशी मुसलमान समाजाने करायची आहे तसेच मुस्लीम समाजाच्या धर्माचरणात कोणतेही व्यवधान येणार नाही याची काळजी हिंदुनी घ्यायची आहे. मनुष्याचा सर्वात मोठा धर्म हाच आहे असे प्रतिपादन करीत  सिंह यांनी ईद या सणाच्या शुभेच्छा देत आपले भाषण संपविले तेव्हा सारे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने आणि ‘भारत माता कि जय’ च्या घोषणांनी दणाणून गेले होते.
 
 
मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक आणि मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात मंचाच्या विविध सेवाकार्यासंबंधी माहिती दिली. जम्मू – काश्मीरच्या हिंसक वातावरणात मुस्लीम समाजासोबत संवाद प्रक्रिया कशी सुरु झाली त्याचा आढावा घेत ते म्हणाले की प्रत्येकाने आपल्या धर्माचे आचरण करावे आणि दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा हीच मानवता आहे. कुराणात सुद्धा हेच सांगितले आहे. शिक्षण, आरोग्य, तलाक-पिडीत महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पेन्शन योजना आणि मुस्लीम मुलांसाठी शिक्षण सहायता योजना, गरीब लोकांना पुरेसे अन्न मिळावे म्हणून अनाज बँक सारखे प्रकल्प मुस्लीम राष्ट्रीय मंच चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
  
रामजन्मभूमी विवादावर बोलतांना इंद्रेश कुमार यांनी मंचाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुळात हा मुद्दा राम मंदिराचा नसून रामजन्मस्थानाचा आहे. देशात आणि जगातही अनेक राम मंदिरे आहेत पण रामजन्मस्थान मात्र एकच आहे आणि ते अयोध्येत आहे. जसे, जगात अनेक मशिदी आहेत पण मक्का मात्र एकच आहे किंवा अनेक चर्चेस आहेत पण वेटीकन मात्र एकाच आहे. तसेच रामजन्मस्थान ही एकच आहे आणि ते अयोध्येत आहे हीच मंचाची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.
 
 
शिवाय कुराणात असे नमूद केले आहे कि अल्लाहने मानवाच्या कल्याणासाठी वेळोवेळी जगात १ लाख २४ हजार नबी म्हणजे उपदेशक पाठविले आहेत आणि मोहम्मद हा शेवटचा नबी आहे. राम हा त्यापैकी एक आहे आणि रामाचा ‘इमाम-ए-हिंद’ असा गौरवपूर्ण उल्लेख मुस्लीम विद्वानांनी केला आहे. हे जर खरे असेल तर मग अयोध्येत रामजन्मस्थानी भव्य मंदिर उभारण्यास विरोध का आणि कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच इस्लाममध्ये कोणाच्याही व्यक्तिगत नावावर मशीद नाही. बाबर हा आक्रमक होता आणि त्याच्या सरदाराने अयोध्येतील मंदिर पडून तेथे मशीद उभारली आणि त्याला बाबरी मशीद असे नाव दिले हे तर इस्लामी परंपरेच्या विरुद्ध आहे, असे प्रतिपादन इंद्रेश कुमार यांनी याप्रसंगी केले.
 
 
 
मुस्लीम राष्ट्रीय मंचाने मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी शिक्षा सहायता योजना, घटस्फोटित महिलांसाठी गैरसरकारी पेन्शन योजना आणि गरीब परिवारांसाठी अनाज बँक योजना सुरु केल्या आहेत. तसेच गरीब घरातील मुस्लीम मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक मदत करण्याची योजनाही मंचाने सुरु केली आहे. या योजनांना समाजाने आणि मशिदी, दरगाह यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 
 
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, सध्याच्या सरकारने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे कि भारतातील मुसलमानांचे ते ‘खरे आणि सच्चे मित्र’ आहेत. मुस्लीम राष्ट्रीय मंच आज देशातील ‘अजेंडा सेटर’ संघटना झाली आहे. ज्यावेळी या संघटनेची सुरुवात झाली तेव्हा तत्कालीन सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. समाजाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी मुस्लीम समाजाला केले.
 
 
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सभागृहात एकत्रित सर्व मुस्लीम बांधवांना इंद्रेश कुमार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ‘हसत - खेळत योग’ करावयास लावला आणि सर्व उपस्थितांनी केला देखील. मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद अफझाल, अबू बकर नकवी, डॉ शाहीद अख्तर, अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ प्रोफेसर मोहम्मद शब्बीर, तन्वीर अहमद यांनीही या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. मंचाचे दिल्ली प्रांत संयोजक यासिर जिलानी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. 
@@AUTHORINFO_V1@@