सूडभावनेमुळे पाच निष्पापांनी गमावला जीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |





खोपोली : रायगड जिल्ह्यातील महड येथील अन्नातून विषबाधा प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. वास्तूशांतीच्या जेवणातून विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या ४ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू हा या कुटुंबातील नातलग असलेल्या एका महिलेनेच सूडाच्या भावनेने अन्नात विष कालवून झाल्याचे समोर आले आहे.

मानवी क्रौर्याची परिसीमा दाखवणार्‍या या घटनेमुळे रायगड जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. खालापूर व रायगड पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. ज्योती उर्फ प्रज्ञा सुरेश सुरवसे (वय २३ सध्या रा. खोपोली मूळ औसा, मराठवाडा) या महिलेने पंगतीला जेवण वाढत असताना सूडबुद्धीने वरणात विषारी औषध टाकले व पुढील सर्व भयानक प्रकार घडला. पोलिसांनी चार दिवस कसून केलेल्या तपासांती हा घातपातच असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिला ज्योती ऊर्फ प्रज्ञा सुरेश सुरवसे हिला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा तपास व संबंधित सर्व घडामोडीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली.

रायगड जिल्ह्यातील महड येथे वास्तूशांतीच्या जेवणातून विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या ४ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू हा एका महिलेने सूडाच्या भावनेने पेटून अन्नात विष कालवून झाल्याचे खालापूर व रायगड पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. तपास व संबंधित सर्व घडामोडींची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पत्रकार परिषद घेऊन सदरची सविस्तर माहिती दिली.

ज्योती ऊर्फ प्रज्ञा सुरेश सुरवसे (वय २३ ) सध्या रा. खोपोली मूळ औसा, मराठवाडा या महिलेने पंगतीला जेवण वाढत असताना सूडबुद्धीने वरणात विषारी औषध टाकले व पुढील सर्व भयानक प्रकार घडला. पोलिसांच्या चार दिवसांतील तपासात हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिला ज्योती ऊर्फ प्रज्ञा सुरेश सुरवसे हिला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी खालापूर पोलीस व रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने समन्वयाने तपासाची सूत्रे जलद गतीने फिरवली आणि आरोपीपर्यंत पोलीस पोहोचल्याचे अनिल पारस्कर यांनी स्पष्ट केले. महिला आरोपीने कबूल केलेल्या जबानीनुसार शिंदे कुटुंबाशी असलेला जुना कौटुंबिक कलह व सूड भावनेतून हा भयानक प्रकार केल्याचे महिलेने कबूल केले.

पाच बळी व अनेकांना अत्यवस्थ करणारी ही अन्न विषबाधा साधारण घडलेली नाही, हे सदर घटना समोर आल्यापासूनच स्पष्ट होत होते. हा घातपात असावा याबाबत संशय व्यक्त होत होता. आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबानुसार वास्तुशांती होती, त्या घरमालक सुभाष माने यांच्या पत्नीच्या बहिणीची आरोपी सून आहे. त्यांचे नातेवाईक असलेले शाहूराज शिंदे यांच्याशी तिचा जुना वाद असल्याची माहिती पुढे आली आहे. लग्न झाल्यावर शाहूराज यांच्या पत्नीने आपण दिसायला काळी आहोत, आपले दुसर्‍या पुरुषांशी अनैतिक संबंध आहेत, असे वारंवार आपली सासू व पतीला भरवून आपल्याला घटस्फोटित केले व आपला संसार उद्ध्वस्त केला, याचा राग आरोपी महिलेस होता. त्यातून सूड भावनेतून शिंदे कुटुंबाचा काटा काढण्यासाठी तिने संधी मिळताच हा प्रकार केल्याचे कबूल केले आहे.

वास्तुशांतीसाठी अन्न शिजवण्यात आले होते. पंगत सुरू झाली तेव्हा जेवण वाढण्याचे काम आरोपी व इतर चार महिला करीत होत्या. आरोपी महिलेने पूर्वनियोजित हेतूनुसार आपल्याबरोबर सर्प व इतर प्राणी मारण्यासाठीचे दाणेदार विषारी औषध एका प्लास्टिक पिशवीत आणले होते. जेवण वाढत असताना शिंदे कुटुंबातील सदस्य जेवण करण्यास बसलेल्या पंगतीसाठी वापरात येणार्‍या वरणात आरोपीने हे विषारी औषध टाकले व पुढील सर्व अनर्थ घडला. या पंगतीत एकूण १०० ते ११२ जणांनी जेवण केले. त्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात विषबाधा झाली व यात शिंदे कुटुंबातील तीन लहान मुले व इतर दोघांचा मृत्यू झाला.

विषबाधा घटनेच्या तपासाकरिता खालापूर पोलिसांसोबत रायगड गुन्हे अन्वेषण विभागाची टीमही सक्रिय झाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी महड गावात अचानक तपासाला येऊन जलद सूत्रे हलविली. त्यांनी गुरुवारी रात्रीच जेवण वाढत असलेल्या चारही संशयित महिलांना ताब्यात घेतले व त्यानंतर तपासात सर्व प्रकार उघड होऊन मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. शुक्रवारी सकाळीच अतिशय गुप्तपणे सदर महिला आरोपीस महड येथील घटनास्थळी आणून पडताळणी केली गेली व पोलिसी खाक्या दाखविल्यावर तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, खालापूर पोलीस रायगड गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ निरीक्षक जमील शेख व पथकाने हा महत्त्वपूर्ण तपास करून आरोपीस अटक केली.

@@AUTHORINFO_V1@@