जिल्ह्यातील कांद्याला देशातून, परदेशातून मागणी वाढली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या पाऱ्यामुळे तेथे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चांगल्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यात इतर देशांत निर्यातही चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल बुधवारी १६ हजार, ७७५ क्विंटल आवक होऊन व्यापारीवर्गाने ५०० रुपयांपासून ११९१ रुपये बाजारभावापर्यंत कांदा खरेदी केला. काल कांद्याला सरासरी १०८० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. येथील बाजार समितीत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याच्या दरात दररोज ५० ते १०० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी आपला बहुतांशी उन्हाळी कांदा हा ६५० रुपयांनी विक्री केला होता. साधारणपणे २० मे पर्यंत हेच भाव टिकून होते. त्यानंतर सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मे महिन्याच्या अखेरीस कांदा ८०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्या भावाबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या. आपला कांदा हजारी पार करेल, या अपेक्षेने शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी बाजार आवारावर आणत होते. गेल्या तीन महिन्यांत कांद्याच्या बाजारभावाची पातळी ३०० रुपयांनी वाढून आता कांदा सरासरी १०८० रुपयांनी विक्री होत आहे. कांद्याच्या दरात तेजी निर्माण झाली की, केंद्र सरकार महागाई वाढू नये म्हणून तातडीने हालचाल करून वाढलेले भाव पाडण्याचे प्रयत्न करीत असते.

 

गेले तीन-चार महिने आपल्या शेतातील चाळीत साठवलेला कांदा आज विक्रीस आणला जात असल्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळावे, ही रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कांदा दर वाढले, तरी शासनाने हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज १८ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. बरेच दिवस 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटल विकला जाणारा कांदा आज एक हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये साठवणूक झालेल्या कांद्याला तेथील कडक उन्हाचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे. त्यामुळेच त्या दोन राज्यांतून व इतर काही राज्यांतून नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळत असून कोलंबो, दुबई व बांगलादेश या तीन देशांसह अन्य छोट्या देशांमध्ये कांद्याची मागणी चांगल्या प्रमाणात वाढल्याची माहिती मिळत असल्याने कांदा बाजारभावात सुधारणा होत आहे.

 

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट भाव

 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या मध्यंतरी कांदा १००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी जून महिन्यात कांद्याचे सरासरी दर ५५० रुपये इतके होते. त्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र यावर्षी उन्हाळ कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांदा दुप्पट बाजारभावाने विकला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@